मुख्य सामग्रीवर वगळा

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..! 

काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते.

२६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला.

त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्या झोपडीच्या बाजूला असलेल्या एक झोक्यात त्याचा मृतदेह आढळला.

नैसर्गिक पद्धतीने त्याला मृत्यू आलेला होता सांगितलं जाते. सोबतच त्यावेळी त्याच्या शरीराच्या चहूबाजूंनी पक्ष्यांचे रंगीबिरंगी पंख लावलेली होती. त्याचा अंतिम विधीसुद्धा त्याचा शेवट ज्या झोपडीत झाला त्या ठिकाणी करण्यात येणार आहे असं ब्राझील सरकारनं सांगितलं. मृत्यू समयी त्याचे वय अंदाजे ६० वर्षांच्या जवळपास असल्याचे सांगितल्या जाते.

"ऑब्जर्वेटरी फॉर द ह्यूमन राइट्स ऑफ आइसोलेटेड एंड रीसेंट कॉन्टैक्ट इंडिजिनस पीपल्स" (ओपीआई) ने त्या व्यक्तीच्या मृत्यूवर सांगितले की ती व्यक्ती कुठल्या जातीची होती किंवा घराच्या आत केलेल्या खड्ड्यांचा उपयोग ते कश्यासाठी करत हे न कळताच त्यांचा मृत्यू झाला आहे.
(एक संस्कृती,भाषा इतकी सहज संपून जाते हे किती आश्चर्य वाटण्यासारखं आहे.)

द गार्जियन यांच्या मतानुसार, असं रहस्यमय जीवन जगणारी ही व्यक्ती ब्राझीलमधील एका जगाच्या समोर न आलेल्या संस्कृती समूहाची शेवटची सदस्य होती. ती व्यक्ती गेली तिच्या बरोबर आज पुन्हा एका पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा अंत झाला. त्या व्यक्तीच्या जाण्याबरोबर अनेक गोष्टींचे खुलासे होणं राहून गेलं, एक संस्कृती, रीतिरिवाज, भाषा यांचाही त्याच्या बरोबर अंत झाला.

२०१६ साली एका दुसऱ्या घटनेत असेच काहीसे घडलं होते ते इथे देतोय. ज्याची नोंद जगातील भाषा, संस्कृती बद्दल कळवळा असलेल्यांनी घेतली पण फक्त नोंदच घेतली पुढे काहीही होवू शकले नाही. जितक्या सहज कुठला एक विषय गरजेचा नाही म्हणून गुंडाळून ठेवला जातो तसं या विषयाला कायमचे बाजूला सारल्या गेले.

 २०१६ मध्ये अंदमान निकोबार बेटांवर ६५०० वर्षांपासून बोलली जाणारी 'बो' नावाची बोलीभाषा होती. २०१६ मध्ये 'सिनियर बोवा' नावाची  'बो' बोलीभाषा बोलणारी ती म्हातारी मेली. आणि तिच्या बरोबर "बो" नावाची ती बोलीभाषा सुद्धा संपुष्टात आली, नष्ट झाली.

अजून एक उदाहरण काही दिवसांपूर्वी असाच 'ईयाक' नावाच्या भाषेचा अंत झाला, ती ही संपुष्टात आली. झाले काय एक संस्कृती जी हजारो वर्षे हयात होती तिचा अंत झाला. ती कशी होती याचा कुठलाही अभ्यास किंवा लेखन नाही, हे खूप दुःखद आहे. अश्या आपल्या तीन पिढीच्या काळात तब्बल २०० भाषा सोबत संस्कृती नष्ट झाल्या मृत्यु पावल्या.

मरणाऱ्या आदिवासी बोलीभाषा जगाव्यात म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना 'यु.नो' ने २०१९ हे जागतिक आदिवासी बोलीभाषा वर्ष जाहीर केले. महाराष्ट्रात ९४ बोलीभाषा बोलल्या जातात, त्यापैकी ३६ अश्या आदिवासी बोली आहे ज्यांना जपवणे खूप महत्त्वाचे, जरुरीचे आहे. कारण त्या संपुष्टाच्या कगारावर आहेत.

कातकरी,कोलमी,कोकणी,देहबोली,धाणका,हलबी,माडीया,डांग,कोरकु,कोटली,गावित या आणि अश्या अनेक भाषा यांचे संवर्धन व्हावे, लेखन व्हावे या भाषांना जोडून साहित्य निर्मिती व्हावी जेणेकरून या भाषांवर सखोलपणे अभ्यास होईल.

हे सर्व मी गेले तीन वर्ष भाषा, जतन आणि संवर्धन याबद्दल करत असलेल्या लिखाणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलो आहे अन् आपणही माझ्या या लिखाणाला उदंड प्रतिसाद दिला आहे.

परंतु आज अश्या एका व्यक्तीबद्दल लिहावेसे वाटत की जी व्यक्ती अव्याहत माझ्या आस्थेचा विषय असलेल्या या विषयावर गेली साठ वर्ष अभ्यास करत आहे. काही दिवसांपूर्वी 'दूलारी देशपांडे' यांचा लोकसत्तामधील संबंधित विषयावरील लेख वाचण्यात आला. मग त्या विषयवार सविस्तर अभ्यास करून लिहण्याचा विचार मनात आला.

अंदमान-निकोबारमधील काही बेटांवर आजही हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेले सहा आदिवासी जमातींचे समूह राहतात. ज्याप्रमाणे 'मॅन ऑफ द होल' माणसांच्या सहवासापासून कोसो दूर राहून जगणं पसंद करत होता किंवा त्याला माणसांच्या भीती वाटत होती, म्हणून तो हे असं करत होता.

तसेच काहीसे माणसांपासून पूर्णतः दुरी ठेवून 'सेंटिनल बेटा'वरील 'सेंटिनल आदिवासी' आजतागायत राहतात. त्यांना कुणी भेटायला गेलं की ते त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना मारून टाकतात. त्यामुळं आजवर त्यांना भेटायला म्हणून कुणी गेले नाही अन् कुणी मोठ्या मेहनतीने गेलेच तर त्यांना त्यांचा या मोहिमेत यश आले नाही.

अश्या जगापासून वेगळं, अलिप्त जीवन जगणाऱ्या सेंटिनल बेटांवरील आदिवासींना भेटण्यात एका भारतीय स्त्रीला यश आलं होतं. अंदमान येथील आदिवासींसंबंधी महत्त्वाचं संशोधन करणाऱ्या आणि त्यांना भेटणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री मानववंशशास्त्रज्ञ 'मधुमाला चट्टोपाध्याय' या त्या स्त्री ज्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांनीही या आदिवासींशी मैत्री करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र अंदमानपासून पश्चिमेला जवळपास ५० किमीवर असलेल्या नॉर्थ सेंटिनल बेटावरच्या आदिवासींशी आणि अंदमानातल्या जरावा आदिवासींशी संपर्क साधण्यात ब्रिटिशांना सपशेल अपयश आलं होतं. 

१९९१ मध्ये 'मधुमाला चट्टोपाध्याय' या मानववंशशास्त्रज्ञ मात्र तिथं पोहोचल्या. सेंटिनल बेटावरच्या आदिवासींशी आणि जरावांशी मैत्रीपूर्ण संपर्क साधणाऱ्या त्या पहिल्या भारतीय स्त्री मानववंशशास्त्रज्ञ. त्या वेळी त्या ‘अ‍ॅन्थ्रोपॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियात ‘रिसर्च असोसिएट’ म्हणून काम करत होत्या आणि वय होतं अवघं सत्तावीस वर्षांचं. 

अनेक अडचणींचा सामना करत मधुमालांनी सहा वर्ष अंदमानातल्या सहा आदिवासी समूहांवर संशोधन केलं. मधुमालांचा सहभाग असलेल्या सेंटिनल बेटावरच्या दुसऱ्या मोहिमेनंतर अंदमान प्रशासनानं नॉर्थ सेंटिनल बेटावर जाण्यास पूर्णपणे बंदीच घातली आहे. या घटनेला ३० वर्ष होऊन गेलीत नुकतीच, मधुमालांशी संवाद साधण्याची संधी 'दूलारी देशपांडे' यांना मिळाली आणि त्यांनी काही थरारक आठवणी सांगितल्या.  

अंदमान-निकोबार द्वीपसमूहातल्या आदिवासी जमातींविषयी जाणून घेणं मोठं रंजक आहे. विशेषत: मधुमाला ज्या उत्साहानं हे सर्व उलगडत जातात, त्यामुळे ती केवळ माहिती राहात नाही, तर सुरस कथाच होऊन जाते. या द्वीपसमूहात ३२१ बेटं आहेत, त्यांपैकी फक्त ३८ बेटांवरच मानवी वस्ती आहे. या ३८ पैकी २६ बेटं अंदमानात आणि १२ निकोबारमध्ये आहेत.

या द्वीपसमूहात एकूण सहा आदिवासी जमाती राहतात. निकोबार बेटांवर राहाणाऱ्या सर्वाना ‘निकोबारी’ म्हटलं जातं. ग्रेट निकोबार बेटावर ‘शोम्पेन’ आणि ‘कोस्टल निकोबारीं’ची वस्ती आहे. अंदमानातल्या स्ट्रेट आयलंडवर ‘ग्रेट अंदमानी’ राहतात, तर लिटिल अंदमानातल्या डय़ुगाँग क्रीक आणि साऊथ बे भागात ‘ओंगी’ आदिवासींची वस्ती आहे.

दक्षिण आणि मध्य अंदमानच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘जरावा’ आदिवासी समूह राहातो आणि नॉर्थ सेंटिनल बेटावर ‘सेंटिनलीज’ समूह राहातो. मानववंशशास्त्रानुसार मानववंशाची सुरुवात साधारणत: दोन दशलक्ष वर्षांपूर्वीची. आधुनिकतेच्या बाबतीत आजच्या सेंटिनल बेटावरच्या आदिवासींची संस्कृती ‘निओलिथिक’ म्हणजे नूतन पाषाणयुगीन मानवाशी जुळणारी आहे. सेंटिनल आणि जरावा आदिवासींना ‘निग्रो’ वंशाचं (आताचा प्रचलित शब्द- कृष्णवर्णीय) मानलं जातं.

भारतीय नागरिकांच्या आणि या आदिवासींच्या दिसण्यात मोठाच फरक आहे. असं का, हे विचारल्यावर मधुमाला जगभरातल्या बहुतेक वैज्ञानिकांनी मान्य केलेली ‘आऊट ऑफ आफ्रिका’ थिअरी सांगतात. म्हणजे हे आदिवासी पूर्व आफ्रिकेतून २.७ लाख ते ८०,००० वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित झालेल्या होमो सेपियन मानवाच्या वंशजांपैकी असावेत. दुसऱ्या थिअरीच्या मते, अंदमानातल्या आदिवासी जमाती बाहेरून आलेल्या नसून या मूळच्या तिथल्याच स्थानिक जमाती- म्हणजे ‘अुक्षरॠ्रल्लं’’ असाव्यात. यातही एक मजा अशी की, सेंटिनल, ग्रेट अंदमानी, जरावा, ओंगी आदिवासी कृष्णवर्णीय असले, तरी निकोबारी आणि शोम्पेन आदिवासी पीत वर्णाचे असल्यामुळे ते ‘मंगोलियन’ वंशाचे मानले जातात.

सेंटिनल बेटावरच्या आदिवासींशी आणि जरावा आदिवासींशी झालेल्या मधुमालांच्या भेटीला मानववंशशास्त्राच्या दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे या आदिवासींचं इतर माणसांच्या प्रती असलेलं अतिशय आक्रमक धोरण. १९६६ मध्ये जरावा आणि बांगलादेश व श्रीलंकेतून आलेले निर्वासित यांना संरक्षण देण्यासाठी अंदमानात तैनात करण्यात आलेल्या भक्तवार सिंग या एका ‘बुश पोलिसा’नं जरावांशी मैत्री केली होती.

त्यामुळे ‘अ‍ॅन्थ्रोपॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’तर्फे जरावांना भेटणं मधुमालांना सोपं झालं. यातली अडचण अशी, की तत्पूर्वी ककरण्यात आलेल्या एका प्रयोगात बाहेरून आलेल्या तरुण स्त्रीला पाहून जरावा पुरुष उत्तेजित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला भेटण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला असं निरीक्षण नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे एक तरुणी म्हणून जरावांना भेटणं हे मधुमालांसाठी वेगळय़ाच प्रकारचं आव्हान होतं. सेंटिनल आदिवासी मात्र जवळपास ६०,००० वर्ष इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत आधुनिक मानवी सभ्यतेपासून पूर्णपणे फटकून राहिलेली, अस्पर्श आदिवासी जमात. त्यामुळे मधुमालांनी त्यांची घेतलेली भेट आधुनिक मानव समाजासाठी आणि मानववंशशास्त्रासाठीही ऐतिहासिकच होती. आज ३० वर्ष उलटल्यानंतरही मधुमालांच्या मनात या भेटींचे अनुभव अतिशय ताजे आहेत. त्यांच्यानंतर सेंटिनल आदिवासींना सामान्य नागरिकांपैकी इतर कुणीही भेटू शकलेलं नाही हे विशेष.

१९९० च्या जानेवारीत अंदमानचे लेफ्टनंट गव्हर्नर एक चमू घेऊन सेंटिनल बेटाच्या जवळ गेले होते. तेव्हा सेंटिनल आदिवासींनी मारलेला बाण त्यांच्या थेट छातीत घुसला. या प्राणघातक हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ही घटना ताजी असतानाच १९९१ मध्ये मधुमालांची मोहीम सेंटिनल बेटांवर जाण्यासाठी सज्ज झाली. सेंटिनल आदिवासींनी परक्या माणसांशी इतकं फटकून वागण्यामागे कारणंही तशीच आहेत. 

मधुमाला सांगतात,की पूर्वीच्या काळी इंडोनेशिया-मलेशिया आणि इतरही देशांची जहाजं सेंटिनल बेटाजवळच्या समुद्रमार्गानं ये-जा करत असत. तेव्हा जहाजावरच्या लोकांना एकटा-दुकटा फिरणारा सेंटिनल आदिवासी पुरुष दिसला, की ते त्याला बळजबरीनं पळवून नेत आणि जन्मभर गुलाम म्हणून त्याचा वापर करत.सेंटिनल आदिवासी पुरुष इतके ताकदवान असतात, की एका हातात नारळ धरून कोणत्याही शस्त्राशिवाय ते तो नुसता हाताच्या बुक्कीनं फोडू शकतात. त्यांच्या पीळदार, काटक शरीराचं आकर्षण परदेशी नाविकांना वाटलं नसतं तरच नवल !

अशा बऱ्याच घटना घडल्यानं सेंटिनल आदिवासींच्या मनात बाहेरच्या लोकांविषयी भीती आणि शत्रुत्वाच्या भावनेनं घर केलं. मधुमाला मात्र या सेंटिनल लोकांना दोन वेळा भेटल्या. १९९१ च्या मोहिमेत ‘अ‍ॅन्थ्रोपॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’तर्फे त्या, अंदमान व्यवस्थापनातर्फे एक डॉक्टर, वेळ पडल्यास हवेत गोळीबार करण्यासाठी एक पोलीस असे सगळे मिळून १३ जण होते.

३ जानेवारी १९९१ ला हा चमू रात्री नऊ-साडेनऊला छोटया जहाजात बसून अंदमानहून नॉर्थ सेंटिनल बेटाकडे निघाला आणि सकाळीच बेटाजवळच्या समुद्रात पोहोचला. मधुमाला सांगतात, ‘‘जहाजावरून बेटावरचा निर्मनुष्य समुद्रकिनारा, किनाऱ्यालगतचं दाट जंगल दिसत होतं. सकाळी साडेसातच्या सुमारास जंगलाच्या बाजूनं थोडी हालचाल जाणवू लागली आणि पावणेनऊ वाजता जंगलात एका ठिकाणाहून धूर निघत असलेलाही दिसला. 

तिथे माणसं राहात असल्याची ती खूणच होती. आम्ही दोन लाईफ बोटींमध्ये सोबत नारळाच्या गोणी घेऊन निघालो. नॉर्थ सेंटिनल बेटाच्या किनाऱ्यापासून थोडय़ा दूर अंतरावर असताना किनाऱ्यावर काही आदिवासी फिरताना दिसले. आमच्या सहाय्यकांनी त्यांच्यापासून थोडय़ा दूर अंतरावर नारळाच्या एक-दोन गोणी नेऊन ठेवल्या. आमच्या बोटींचा वेग आम्ही अतिशय कमी ठेवला होता. थोडय़ा वेळानं काही तरुण, काही प्रौढ असे चार-पाच पुरुष गोणी उघडून नारळ काढू लागले. हातानं इशारा करून आणखी नारळ मागायला लागले. उरलेल्या गोणी लगेच त्यांना देऊन टाकल्या तर बरोबर आणलेले सगळे नारळ संपून जातील, म्हणून मग आम्ही गोणीतून एक एक नारळ काढून समुद्राच्या लाटेवर सोडत राहिलो आणि किनाऱ्याकडे वाहात जाणारे नारळ ते लोक गोळा करत राहिले.

बराच वेळ हे सुरू होतं. त्यांच्यातला एक जण आमच्या बोटीजवळ येऊन बोटीला हात लावून कुतूहलानं बघू लागला. त्या दिवशी बहुधा त्यांचा ‘मूड’ चांगला असावा! बाकीची सेंटिनल मंडळी बोटीजवळ आली, तशी आम्ही त्यांच्या हातात नारळ देऊ लागलो. असं करत लाईफ बोटीवरचे सगळे नारळ संपले. आमच्या जहाजावर मात्र नारळाची अजून काही पोती शिल्लक होती. ती आणायला आम्ही बोटी जहाजाकडे वळवल्या. ‘‘हम लोग फिरसे वापस आ रहे हैं.. आप इधरही ठेहरो..’’ वगैरे आमच्या भाषेत जोरात ओरडून त्यांना सांगितलं. त्यांना किती समजलं माहीत नाही, पण पुन्हा परतलो, तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर जवळपास २८ जण जमलेले. पुरुष, स्त्रिया आणि मुलंही.काहींच्या हातात तर धनुष्यबाण. आम्ही गुडघाभर पाण्यात उतरून पुन्हा त्यांच्या हातात नारळ देऊ लागलो. 

किनाऱ्यावर एक पन्नाशीची स्त्री आणि एक विशी-पंचविशीचा मुलगा होता. त्या तरुणानं अचानक धनुष्यबाण ताणून सरळ माझ्यावर निशाणा धरला. ‘‘तीर उठाया.. मारेगा.. बोट पे आ जाओ..’’ आमच्या चमूतलं कुणीतरी ओरडलं. त्या वेळी मला ओंगी भाषा बऱ्यापैकी येत होती. त्या सेंटिनल स्त्रीला मी म्हटलं, ‘‘कायरी इसेरा (मावशी, इकडे ये) नारियाली जबा जबा (खूप नारळ आहेत)’’.
ते ऐकून तिनं धनुष्य-बाण ताणून उभ्या असलेल्या तरुणाचा हात दुसऱ्या दिशेला वळवला आणि पुढच्याच सेकंदाला तो तीर पाण्यात घुसल्याचं सर्वानी पाहिलं! मग त्या स्त्रीनं त्याच मुलाला माझ्याकडून नारळ घेऊन येण्यासाठी पाठवलं. दुपारी तीन-चार वाजेपर्यंत आमचं हे नारळ वाटप चाललेलं होतं.’’ तरुण मधुमालांच्या मनात या प्रसंगानंतरही भीती नव्हती, उलट सेंटिनल लोकांशी मैत्री करण्याचा उत्साहच वाढला.

सेंटिनल लोक जी भाषा बोलतात ती कोणालाच येत नाही, मात्र ओंगी आदिवासींच्या भाषेतले काही शब्द ते वापरताना दिसतात. सेंटिनल आदिवासी रंगानं अतिशय काळे, उंचीनं बुटके आणि काटक. पती-पत्नी-मुलं अशी कुटुंबसंस्था त्यांच्यात आहे. त्यांच्यात पुरुषसत्ताक पद्धत असावी. एकाच झोपडीत पाच-सात कुटुंबं एकत्र, मध्ये भिंत घालून राहातात. झोपडय़ा झावळयांपासून बनवलेल्या. जंगलात सापडणारी कंदमुळं, फळं, बेटावरचे छोटे प्राणी, खेकडे, मासे हे त्यांचं खाद्य. शिकारीसाठी ते भाले, धनुष्यबाण आणि चाकू वापरतात.

 सेंटिनल बेटाजवळ फुटलेल्या ‘प्रिमरोज’ या जहाजावरून त्यांनी पहिल्यांदा लोखंड हा धातू पळवला. त्यापासून शस्त्रं बनवली. ते अंगावर कोणतेही कपडे घालत नाहीत, पण स्त्रिया कमरेला झाडाची साल बांधतात आणि समोरच्या बाजूस झाडाचं पान लावतात. पुरुष घनदाट जंगलात शिकारीला जाताना छाती-पोटाचं संरक्षण करण्यासाठी छातीभोवती झाडाची साल गुंडाळतात. त्यांची लोकसंख्या आज जवळपास शंभरच्या घरात असावी. ते निसर्गपूजक आहेत, पण वैज्ञानिकांना त्यांचे कलाप्रकार, नाचगाणं, याविषयी काहीही माहीत नाही. 

अंदमानातल्या जरावा आदिवासींना भेटणाऱ्याही मधुमाला पहिल्या स्त्री मानववंशशास्त्रज्ञ. सेंटिनल भेटीनंतर ५ जानेवारी १९९१ ला हा चमू नारळ, लोखंड, कच्ची केळी (जरावा लोक ती भाजून खातात) घेऊन मध्य अंदमानात पोहोचला. मधुमाला सांगतात, ‘‘जरावांचा पूर्वी नोंदवलेला परक्या स्त्रियांबद्दलचा व्यवहार लक्षात घेऊन माझ्या टीममधले पुरुष छोटया बोटीनं बेटावर पुढे निघून गेले. ‘बेटावर यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला काही  झालं तर आमची जबाबदारी नाही,’ असं मला सांगण्यात आलं. काहीही होवो, मी त्यांना भेटणारच, असा विचार मी करतच होते, तेवढय़ात तीन-चार जरावा तरुण पोहत माझ्या बोटीपाशी येऊन पोहोचले.  

मी बसले होते त्या दिशेनं हळूहळू सरकू लागले. ते पाहून नावाडय़ानं मला पाण्यात उडी टाकायला सांगितलं. पण ते मला पाण्यातही सहज पकडू शकतील, या विचारानं मी शांतपणे होते तिथेच बसून राहिले. हे जरावा माझ्याकडे कुतूहलानं एकटक पाहात होते. मी हालचाल करत नाही हे पाहून त्यांचा धीर चेपला. मग त्यातल्या एकानं जवळ येऊन माझे केस ओढायला सुरुवात केली, दुसरा माझी त्वचा हातानं दाबून पाहू लागला. तेवढय़ात एक वयस्कर जरावा स्त्रीही बोटीवर चढली. तिला पाहून मी सुटकेचा नि:श्वास टाकला! तिला मी माझ्याजवळ बसवून घेतलं आणि ओंगी भाषेत ‘मी तुझी मैत्रीण आहे,’ वगैरे बोलायला सुरुवात केली. तिनं स्वत:च्या स्त्री-अवयवांकडे बोट दाखवत माझं लक्ष वेधलं. ‘मीही तुझ्यासारखीच एक बाई आहे,’ असं मी तिला समजावू लागले.तेवढय़ात एक बारा-तेरा वर्षांची मुलगी सरळ येऊन माझ्या कुशीत बसली! बोट किनाऱ्याला लागली, तेव्हा तिथे पन्नासएक स्त्री-पुरुष जमले होते.

मग त्यातल्या स्त्रिया पुरुषांना तिथून हकलू लागल्या. त्यांच्याकडे लाकडाचे गळय़ात आणि डोक्यावर घालायचे दागिने होते, ते त्यांनी मला भेट म्हणून दिले. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा तिथे गेलो तेव्हा मला पाहून जरावा स्त्रिया टाळी वाजवत, पाय दुमडून उडी मारत आणि मग हात मागे नेऊन पार्श्वभागावर आपटत नाचू लागल्या, आनंद व्यक्त करू लागल्या. त्यांनी मला माझ्यासाठी खास बनवलेले शिंपल्यांचे दागिने दिले आणि त्या निघून गेल्या. त्यानंतर एक वयस्कर माणूस तिथे आला. तो जरावांच्या कबिल्याचा सरदार असावा. माझ्या लक्षात राहिलेत ते त्या वयातही मजबूत असलेले त्याचे पांढरेशुभ्र दात! सगळय़ात मजा म्हणजे, केवळ मला- एका ‘बाई’ला जरावांनी भेटवस्तू दिल्याचं पाहून चमूतल्या पुरुषांची तोंडं पाहण्यासारखी झाली होती!’’

आदिवासींच्या जगण्याच्या-वागण्याच्या पद्धती अगदी वैशिष्टपूर्ण असतात. जरावा स्त्रिया आपल्या बाळाला दात येईपर्यंत स्वत:च्या तोंडात अन्नाचा घास घेऊन चर्वण करतात आणि पक्षी जसं चोचीत चोच घालून पिल्लांना भरवतात त्याप्रमाणे जरावा आई आपल्या तोंडातून बाळाच्या तोंडात घास भरवते. लहान मुलाला पाणीही याच पद्धतीनं पाजतात. लहान मुलांना आंघोळ घालतानासुद्धा तोंडात पाणी घेऊन ते पाणी त्याच्या अंगावर फेकतात. लाळ जंतुनाशक समजली जाते. अशा पद्धतीनं आंघोळ घातल्यानं मुलं टुकटुकीत राहातील, असं जरावा स्त्रियांना वाटतं.

सर्वच आदिवासी जमाती निसर्गपूजक. ग्रेट अंदमानीही याला अपवाद नाहीत. ते समुद्राची, भरतीची पूजा करतात. केवळ पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आवाजावरून आता पाऊस पडेल की नाही ते बरोबर सांगू शकतात. अनेकदा त्यांच्याबरोबर असताना आणि धो-धो पाऊस पडत असताना हा पाऊस आता थांबणारच नाही, असं मला वाटायचं. तेव्हा ग्रेट अंदमानी ‘आता लवकरच पाऊस थांबेल’ असं मला आत्मविश्वासानं सांगायचे आणि आकाशातून वाहाणारा नळ कुठल्या तरी अदृश्य हातानं बंद केल्यासारखा धो-धो कोसळणारा पाऊस अचानक थांबायचाही!

जरावांबरोबरची आणखी एक आठवण मधुमाला सांगतात, ‘‘एकदा आमचं जहाज दूर समुद्रात उभं केलं होतं आणि मी किनाऱ्यावर दोन जरावा स्त्रियांबरोबर बसले होते. त्यातल्या एकीला तीन महिन्यांचं बाळ होतं. तिला अचानक काही तरी काम आठवलं आणि तिनं बाळाला सांभाळायला माझ्या हातात दिलं. तिची जरा गंमत करावी म्हणून मी आमच्या जहाजाकडे बोट दाखवत म्हटलं, ‘‘तुझ्या बाळासारखं माझंही बाळ तिथं आहे!’’ त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं, त्या माझ्या जवळ आल्या आणि आपल्या हातांनी माझी कंबर पकडून कंबरेजवळच्या हाडाला चाचपलं. ‘‘काहीही काय सांगतेस! तुझं तर अजून लग्नसुद्धा झालेलं नाही,’’ असं म्हणत त्यांनी हसायला सुरुवात केली.

रूढार्थानं काहीही शिक्षण न झालेले निसर्गाच्या शाळेतले हे विद्यार्थी. आपल्यातलेच, पण सर्वार्थानं खूप दूर राहिलेले. त्यांच्याविषयी जेवढं ज्ञान आपल्याला आहे, तितकंच अज्ञात आहे.
- दूलारी देशपांडे 
पुढे मधुमाला चट्टोपाध्याय यांनी सेंटीनल बेटावर या जमातींच्या सहवासात घालवलेली वेळ आणि त्यांना तिथे आलेले अनुभव त्यांनी केलेलं संशोधन या विषयावर सविस्तर 'Tribes of Car Nicobar' नावाचे पुस्तक रुपात लेखन केलं. जे पुढे आजही खूप महत्वपूर्ण,माहितीपूर्ण दस्तावेज ठरते.

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...