अनायसे शहराचे आकर्षण..!
अनायसे शहराचे आकर्षण वाटते अन् मग नकळत शहरं जवळ केली जातात.एक दिवस,दोन दिवस,तीन दिवस अन् मग याही वेळी सोय झाली नाही,म्हणून किती दिवस शहराच्या वाटा भटकत रहायचं ; म्हणून गावाकडच्या परतीच्या वाटेला प्रवास सुरू होतो पुन्हा एकदा..!
जेव्हा हा प्रवास सुरू होतो तेव्हा मनात एकच प्रश्न असतो,अजून किती दिवस माझं हे असे गाव शहर,गाव शहर हेलपाटे चालू राहणार..?
छान वाटतं खरंच इथलं हे जग,कॉर्पोरेट विश्व असो की गुळगुळीत रस्ते,मान वर करून बघत रहाव्या अश्या उंचउंच इमारती..!
एखाद्या जागी आपली आयुष्याची जागा फिक्स होईल असं एकही स्थान का आपल्याला या शहरात इतकं भटकुनही भेटत नाहीये..!
हा विचार मग मनात असंख्य प्रश्न निर्माण करून जातो..!
कधीतरी वाटतं की आपली कुवतच नसावी हे असं चकचकीत शहर बघायची,तिथं वास्तव्य करायची.हल्ली परतीच्या वाटेला लागलं की काहीवेळ पुन्हा बस थांब्यावर थांबून कुठलीशी जाहिरात माझे डोळे शोधत असतात..!
माझ्यासारख्याच कुण्या बेरोजगाराने एक दिवसाचा रोजगार मिळाला म्हणून ती जाहिरात लावलेली असते..!
जाहिरात अशी असते की कमवा महिन्याला १५०००-१८००० रुपये,काम काय तर फक्त ऑफीस वर्क असेल.ती जाहिरात वाचून जीवाला दिलासा भेटतो की,नाही शहरात आपल्याला हक्काची पैसे कमवायची जागा आता मिळाली आहे.हे क्षणिक सुख तेव्हा अजूनच साजरं होतं जेव्हा त्या जाहिरातीवरील टीप मी वाचून घेतो ती..!
टीप अशी असते की,ज्यांना खरच कामाची गरज असेल त्यांनी संपर्क करा,उगाच आमचा वेळ वाया घालवू नका..!
दुसऱ्या मिनिटाला मी संपर्क करतो,कारण त्यांच्यापेक्षा मला गरज असतेना जॉबची.मग त्यांचं ऑफीसला बोलावणं ५० रुपये फिस घेणं,खिश्यात अडचणीच्या वेळेसाठी ठेवलेल्या त्या ५० रुपयांना त्यांच्या माथी मारणं.मग त्यांचं जॉब प्रोफाईल सांगणं जे सगळं फसवाफसवीचं प्रकरण आहे कळून येणं अन् आपलं हो ला हो करत तिथून निघून जाणं..!
कळून सगळं चुकतं पण काम मिळेल ही आशा असते,त्यामुळे असे अनुभव अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या वाट्याला येतात..!
मग परतीच्या वाटा खुणावत राहतात,कधीतरी मनात हा ही विचार येऊन जातो की स्ट्रीट लाईटचा उजेड असलेल्या बसथांब्यावर आजची काळोखाची रात्र तेथील बाकड्यावर पेपर अंथरूण अन् आपल्या डिग्रीच्या कागदाची,शिक्षणाच्या कागदाची उशी करून तिला उश्याला घेऊन खुल्या आसमंतात झोपून रहावं..!
याच आशेचं स्वप्न बघत झोपावं की उद्या या शहरात हक्काची एखादी नोकरी आपल्याला मिळेल..!
अश्यावेळी शहराची दिवसभर भटकंती करून पाय दुखलेले असतात आणि आपण पुढच्या तासाभरात खुल्या आसमंताच्या खाली निवांत झोपून गेलेलो असतो.
चेहऱ्यावर एक उद्याच्या कल्पनेतल्या विचारांनी आलेलं हे हसरे दुःख,चिंता घेऊन आपला चेहरा स्मित करत निवांत पहुडलेला असतो.उद्या या शहरात आपल्याला नोकरी भेटल या वेड्या आशेनं...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा