झूल्या आई ..! भाग - तीन
पहाटेची उन्हं मी बसल्याठीकाणी माझ्या डोळ्यावर येऊ लागली होती. शिवनामायच्या वाहत्या पाण्यात ती सूर्यकिरणं पडत अन् तीही आरश्याप्रमाणे डोळ्यावर चमकू लागली होती.
सोन्याबाबा माझ्याजवळ बसल्याजागी फराळाचं करून, खरगटे झालेले भांडे चुल्हीतल्या राखूंड्यानं नारळाच्या काथीनं खसाखस घासत होता. झोल्याआई दूरवर असलेल्या बांबूच्या वनात पोसलेल्या बांबूना खाटकासारखं तिच्या हातात असलेल्या धारदार कत्तीनं बांबूचे खांडं करत होती.
एकनाथ बाबा टूपातून नदीच्या थडीला येऊन आपलं जाळं ओढीत अन् त्यात आलेल्या मासोळ्या,मांगुर मासे,खेकडे डालग्यात टाकत होता. मध्येच जाळ्यात एखादा छोटा साप जाळ्यात अडकून येऊन जायचा मग एकनाथ बाबा त्याची शेपटी धरून जोरात जमीनीवर दोन-तीन वेळा आपटत दुसऱ्या क्षणाला साप मरुन गेलेला असायचा.
मी बसल्या जागेवरून त्यांचं हे चालू असलेलं काम न्याहाळत होतो. अधूनमधून वाऱ्याची झुळूक माझ्या दिशेनं येऊन जायची अन् क्षणिक सुखाचा गारवा मला देऊन जायची. सोमवार असल्यानं गावातल्या बायका,पुरुष मंडळी महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला येत होते. मनोभावे पाणी घालून,बेल पान वाहून धूप दीप प्रज्वलित करून दहा-पाच मिनिटं मंदिराच्या मोहरं असलेल्या बैठकीच्या जागेवर बसून रहायची.
हे सगळं न्याहाळत असतांना झोल्याआईनं मला आवाज दिला.
ओ छोटे सरकार इकडं या की,ही बांबू मला तोलानं झाली हायसा..! इक माझ्या झोपडी पहूर घेऊ लागतूसा का..!
मी होकारार्थी मान हलविली अन् काथीने आवळलेले दोन बांबू ओढीत ओढीत झोल्याआईच्या झोपडी पहूर घेऊन आलो तीपण तीन बांबू ओढीत ओढीत माझ्यामागून आली.
बांबू अंगणात टाकून मी उभा राहिलो होतो,तितक्यात तिनं मला तिच्या झोपडीतून आवाज दिला
ऊ छोटे सरकार या वजेस झोपडी मई..!
मी आपल्याला कोरा चहा करतीसू..!
झोपडीची चौकट माझ्या खांध्याइतकी उंच असल्यानं मी वाकून झोपडीत आलो. झोल्याआईनं चुल्हांग्नात राकील ओतून चुल्हीला जाळ लावला अन् एका पितळी पातील्यात तुटक्या कानाच्या तीन कपांचा अंदाज घेत चहा ठेवला.
मी झोपडी न्याहाळत होतो. झोल्याआईच्या एव्हढ्याश्या झोपडीत एक पिवळा बल्ब चालू होता, एका घडोंचीवर पाच-सहा गोधड्यांची वळकटी करून त्या गोधड्या व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. चार माठांची उथळण रचलेली होती. एका झोपडीला आधार म्हणून असलेल्या लाकडाला जर्मलची केटली टांगलेली होती अन् एक छोटासा देव्हारा होता त्यात दोन-चार फुटू होते.
चहाला उकळी आली होती तिचा सुगंध माझ्या बसल्याजागी मला येत होता. झोल्याआई तिला सांडशीत ते पातेलं धरून त्याला जाळावर हलवीत होती,तसतस चहा उकळी घेत होता. अखेरला तो चहा गाळणीत धरून मला एका तुटक्या कानाच्या कपात चहा देऊन झोल्याआई थाटलीमध्ये चहा ओतून पित बसली अधून मधून आमच्या गप्पा चालू होत्या.
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा