मुख्य सामग्रीवर वगळा

कंत्राटी कामगार अन् आयुष्य..!

कंत्राटी कामगार अन् आयुष्य..!

कंपनीच्या फर्स्ट शिफ्टच्या कामावर जायचं म्हणून सगळे शहर शांत झोपलेले असताना रूम पार्टनर पहाटे साडे चारलाच उठला. मी रात्री सेकंड शिफ्ट करून आलो असल्याने, वापरलेलं निरोध ज्यात आपलाच अंश असतो. जो एक जीव निर्माण करू शकतो,त्याला जसं माणसं काम झाल्यावर कचराकुंडीत फेकून देतात.

तसा मी कंपनीत दिवसभराच्या कामात इतका वापरून घेतला जातो की, जसं त्या निरोधात वीर्यरूपाने एक जीवाची सुटका करून त्याला सोडून दिलं जातं, तसं मला काही तासांसाठी कंपनीतून सोडून दिलं होतं.
फरक इतकाच होता की तो कायमचा सुटला जातो अन् मी तेरा-चौदा तासांसाठी. 

कॉटवर महिन्याभरापासून पडलेलं मॅक्झिम गोर्कीचं 'मदर' हा बिघडेल मित्र रात्री चारला उठून वाचतोय, हे बघून मी अवाक झालो. हे पुस्तक वाचायला घेतलं की तो झपाटल्यासारखे घंटाभर तीस - चाळीस पाने वाचून घेतो अन् आठ दिवस त्या पुस्तकाला पहातसुद्धा नाही.

साहजिक तो पट्टीचा वाचणारा नाही पण हे पुस्तक त्याला का कुणास ठाऊक इतकं का पसंतीस उतरले. वाचतांना एका हातात सिगारेट अन् कॉटवर पालथा पडून तो पुस्तक वाचत राहतो. अश्यावेळी मात्र  फॉगच्या बाटलीचे झाकण तो अॅश ट्रे म्हणून वापरतो. पुस्तक हातात घेतलं की तासाभरात त्याचा तो अॅश ट्रे सिगारेटच्या थोटकाने,राखेने ओसंडून वाहत राहतो.

पहाटेचे साडेपाच झाले, तो त्याचं आवरून चार दिवसांचे वापरत असलेले सॉक्स आणि दीड किलोचा सेफ्टी शूज घालून तो दरवाजा लोटून,पाय आपटतच निघून गेला. मी पडल्याजागी झोपमोड झाल्याने निपचित पडून होतो.

खिडकीतून बाहेर बघत बसलो होतो, कामगार नगरातील कंत्राटी पद्धतीने काम करणारे चाकरमाने पहाटेच्या कंपनीच्या भोंग्यावर निघाली होती. सायकलवर पेपर टाकणाऱ्या पोरानी तिसऱ्या मजल्यावर आमच्या रूमच्या दिशेनं पेपर फेकला तरीही मी उठायची इच्छा नसल्याने निपचित पडून होतो. पावसाच्या पडत्या पन्हाळाच्या पाण्याने तो ओला नको व्हायला इतकंच.

कॉटवर दोन-चार पुस्तकं इकडे तिकडे लोळत पडली होती. मित्राचा रात्रीचा मेसचा जेवण करून तसाच ठेवलेला डब्बा,त्या खाली अंथरलेला पेपर फॅनच्या हवेने उडत होता.
मित्राचा अॅश ट्रे,अस्तव्यस्त पडलेले कपडे अन् खिडकी बाहेरून खिडकीच्या आत डोकावणारा सूर्य. शरीरात त्रान नसतांनाही उठलो अन् कॉफीचा मग घेऊन खिडकीतून बाहेरचं जग न्याहाळत,पेपर वाचत कॉफी पित बसलो होतो.

आता जनरल शिफ्टचीवेळ झाली होती कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अन् शेजारीच फ्लॅट घेऊन राहणाऱ्या मित्राची होंडा सिटी काढून तो जॉबला निघाला होता. जवळच्या रूममधली आम्हाला सिनियर मुलं म्हणतात आपल्यासारखी मेहनत घेऊन तो आज इथवर पोहचला आहे. 

चला आमच्या जीवाला तितकाच दिलासा, येता जाता तो ही हात उंचावून प्रेमाचे दोन शब्द बोलत असतो. सायंकाळी मी ठेप्यावर असलो की दोघे सोबतच मेसमध्ये जेवायला जातो.

भारी आहे ही जिंदगी पण कधी कधी जरा आयुष्य बरबाद झाल्यासारखे वाटते..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...