मुख्य सामग्रीवर वगळा

रूम पार्टनर..!

रूम पार्टनर..!

काल रात्री साडे अकराला कामाची शिफ्ट सुटली,कंपनीच्या गेटवर आलो तेव्हा जमिनीला साधळा लागेल असा पाऊस चालू होता.पुन्हा पाऊस वाढेल म्हणून अंधारातच धपाधप पावलं टाकत,जवळजवळ पळतच रस्त्यानं कामगार नगराच्या अन् माझ्या रुमच्या दिशेनं निघालो.एरवी हे रोजचं आहे,त्यामुळे याचं मला कुठलं सोयरसुतक नाही..!

दोन-अडीच कीमीची धावपळ करून अखेर रूमवर पोहचलो,अंगावर शर्ट घामाने की हळूवार पडणाऱ्या पावसाने ओलाचिंब झाला हे काही समजलं नाही.मित्र तिसऱ्या शिफ्टसाठी कंपनीत निघून गेला होता,दरवाज्याला घातलेली कडी खोलली आणि आल्या-आल्या कॉटवर पडलो..!

जीव दिवसभराच्या कामानंतर पार थकून गेला होता,पडल्या पडल्याच एका पायाने दुसऱ्या पायातील बुटाशी खेळ करून दोघांना काढले अन् पायानेच कॉटखाली लोटून दिले.सोक्स हाताने काढून गादीखाली खोचुन दिले अन् काही अर्धा तास निपचित पडून राहिलो,डोळे लावून शांत-शांत..!

खिडकीच्या तावदनातून हळूवार निवांत गार वारा वाहत माझ्यापर्यंत येत होता अन् निपचित पडल्या जागी अंगाला गारवा झोंबत होता.गारव्याने अंगावर शहारे येऊ लागले होते,काही पंधरा-वीस मिनिटांनी जरासे ताजेतवाने वाटले..!

अन् मग कॉफी करायला टाकून मी बेसिंगमध्ये तोंड धुवून मी फ्रेश झालो.काल सांजेला मित्राने एक वेळचा डब्बा वाचावा म्हणून आणलेले पावचे पॉकेट अर्धवट उरलेले होते,त्याच्या कॉटवर तसेच पडलेले दिसले.त्याला घेतले कॉफीचा कप हातात घेऊन कॉफीच्या संगतीने त्याला खात,खिडकीतून हळूवार पडणाऱ्या पावसाला मी न्याहाळत बसलो होतो..!

साडेबारा वाजले होते तिसऱ्या मजल्यावरून दिसणारं शहर शांत-शांत भासत होतं.अर्धा किमीच्या अंतरावर असलेल्या नारळाच्या बागेतील झाडांचा,नारळाच्या झावळ्यांचा वाऱ्याच्या झुळकेनं एक मंद आवाज माझ्यापर्यंत येत होता..!

का माहित नाही पण इतकं सुंदर वातावरण असुनही मला आतून हे सगळं नकोसं झालं होतं.आयुष्याला घेऊन उद्वस्थ होणं काय असावं ते हेच तर नाहीना हे विचार वेळोवेळी मनात येऊन जात होते.नकळतच हातातून खूप काही निसटून गेल्याची जाणीव होत होती..!

ते तितकंच खरंही होतं,कारण ही काळोखाची वेळ माझ्याशी रोजच असा संवाद साधत असते.जिथे मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे ही वेळ मला देऊन जात असते.असं यंत्रवत जगणं आयुष्यभर वाट्याला आलं तर सुखाची झळही आपल्या पोळलेल्या आयुष्याला भेटणार नाही असे वेळोवेळी वाटून जाते.मग मी एव्हढा मोठा आवाका असलेल्या शहरात एका बिंदुसम असलेल्या मला शोधत राहतो..!

कॉफी पिवून झाली,आता बाहेर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसू लागला होता.झोपमोड तर विचारांनी केव्हाच केली होती पण आता जागं रहायला कारण भेटलं होतं.

माझ्या कॉटवर वाचन करतांना अर्धवट वाचलेलं अन् राग आला म्हणून पुन्हा कप्प्यात ठेवून दिलेलं "मॅक्झिम गोर्कीचं" "मदर" हे पुस्तक पडलं होतं.आपल्याच कथा सांगणारं हे पुस्तक कधीही वाचन न करणाऱ्या मित्राने चाळले होते कदाचित..!

कारण आठ दिवसांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा त्याला सांगितलं होतं आपल्या जगण्याच्या कथा या पुस्तकातून लेखकाने मांडल्या आहे.तितक्यात पुस्तकात गाय छापचा एक तुकडा १३८ पान क्रमाकांच्या पानावर सापडला,कदाचित या माझ्या खुळ्या मित्राला पुस्तक आवडलेले दिसते म्हणून तो वाचत असावा...!

मी ते पुस्तक तसेच बंद करून ठेवून दिले अन् पडून राहिलो पुन्हा निपचित..!

दिवसभर सी.एन.सी मशिन्सची,फॉरक्लिपची बेजार करणारी अन् सवयीची आवाजं अजूनही कानात गुणगुणत होती.पत्राला एका फळकटीच्या आधारे पाचर देऊन बांधलेल्या अन् बेरींग गेलेल्या पंख्याखाली झोपून गेलो होतो.
त्याचा तो विचित्र आवाज कानात पुन्हा-पुन्हा गुणगुणत होता अन् आज झोपणं अशक्य आहे असं वाटू लागले होते..!

"मदर" वाचावी असं वाटूनही गेलं पण का वाचावी जिच्या आतच आपल्या जगण्याच्या कथा मांडल्या आहेत,मग का वाचावी..? दुसरी पुस्तकं घेऊन वाचावी तर पैश्याचं सोंग आम्हाला आणता आलं नाही.मग अजून किती बेक्कार असावं आयुष्याने..!

विचाराने आता डोळे लागू लागले होते की,दिवसभराच्या ढोर मेहनतीने कळले नाही ; पण आता झोपल्या जागी निपचित पडून राहिलो होतो,माणूस मेल्यागत..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...