शिवनामायच्या कथा..! भाग - १
पहाट सरायला, तसं मी गावच्या एकांगाला असलेल्या, महादेवाच्या देऊळात दर्शनाला म्हणून शिवनामायच्या अंगाला असलेली वाट जवळ करू लागलो. गावातली माय-बाप वडील माणसं पहाटेच काकड्याला म्हणून मंदिराची वाट जवळ करतात. मी बऱ्याच दिवसांच्या उपर गावाला आल्यानं आज देऊळात जावं, म्हणून देऊळाच्या वाटेला लागलो.
गावाला यंदाच्या सालाला चांगलीच बरसाद होवून गेली होती, म्हणून शिवनामाय दुथडी भरून वाहू लागली होती. शिवनामायच्या दोन्ही अंगाला बेसरमाची झाडं डोक्यावरून फिरली होती. त्यात अधूनमधून सापाची पिल्ल खेळतांना दिसायची.
गावची लहानगी मुलं सलगी करून पुलावरून त्यांचा हा खेळ बघत बसलेली असायची. गावचा सगळ्यात वयस्कर आजोबा सोन्या बाबा अजूनही बारा महिने नदीच्या पात्रात नहानं करतो. जोवर तो गावात हाय, जिंदा हाय तोवर गावाला दुष्काळ नाय असं गावची जुनी माणसं, बुडीबापुडे लोकं म्हणतात. कारण विचारलं तर म्हणतात की, सोन्या बाबा म्हशीच्या डोहात उभे राहून दररोज बारा महिने सूर्याला पूर्वेस तोंड करून अर्ध्य देतो, म्हणून सूर्यदेवाची आपल्या गावावर किरपा हायसा. गावला रोगराई नाय की दुष्काळ नाय. अश्या अनेक कहान्या गावातल्या जुन्या लोकांनी गावाशी जोडल्या आहेत.
मी अनवाणी पायानं देऊळाची वाट जवळ करत होतो. तितक्यात सोंग्या आक्काचा मुंज्याजवळ येत नाही, तोच मला सडकीच्या वाटेनं जयवंता नाना, आमचे गावचे पाटील येतांना दिसले. त्यांनी मला हात वर करत थांबायला सांगितले अन् मी थांबलो.
पांढऱ्याफट्ट धोतराचा सोंगा हातात धरून नाना माझ्याशी बोलते झाले.
"काय छोटे सरकार कशे हायसा..? अन् कव्हशीक आलासा गावाला..?"
( त्यांनी मला विचारलं..! )
"काय नाय संमध मजीत हायसा बघा नाना, काल आलो सांच्याला आठच्या महामंडळाच्या लाल डब्यानं. तुम्ही कशे हायसा नाना..? तब्येत भलतीच खराब केलीसा..!"
(मी नानाला म्हंटले)
"काय करतू लका, पिवळा कऊळ होवून गेलासा बघ पंधरधी सरली तेव्हा, पार पोटात शिरला होता.
मग काय चुना खाय, कात खाय, गावचे वैद सोमा आण्णाकडून कऊळ उतरून घे. अंगारे, धुपारे कर असं करून उतरून घेतलासा कऊळ लका. आता बरा लागून राहिला पण तब्येत बहेकली, ती बहेकलीच लेका. काही केल्या तालावर येईना झाली हायसा."
"चालतासा का देऊळाला..!" (मी विचारलं)
"नगो बाबा, आमचं काय रोजचं हाय..! ये तू जावून..!"
असं म्हणत जयवंता नाना पंचायतीच्या ओट्यावर गप्पा झोडायला गेले. मी सोंग्या आक्काच्या मुंज्याचे पाय पडून देउळाच्या वाटेनं निघालो.
पुलावरून तीतर-बितर नजरेने बघणारी लहानगी मुलं एरवी लंगडी खेळत, पळत खूप पुढे निघून गेली होती. सोन्याबाबा म्हशीच्या डोहातून त्यांच नहानं आवरून, एका हातात तांब्या अन् एका हातात वळकटी मारून बांधेललं धोतर धरून मंदिराच्या दिशेनं जातांना दुरूनच मला दिसत होते.
चार साल झाले तसा म्या शिक्षणाकरता गाव सोडला तो सोडलाच. दोन-तीन महिन्याला आलो की, मग सगळा गाव भटकून घेतो, डोळ्यात साठवून घेतो. मायच्या हातचं कोड्यास, भाकर मन भरून खावून घेतो. गावच्या जुन्या लोकांच्या गप्पा पोटभर ऐकून घेतो, तेव्हाच शहराची वाट जवळ करतो.
मी माझ्या विचारात तळपत्या उन्हात, गुलमोहराच्या झाडांच्या सावलीनं वाटेनं चालत-चालत महादेवाच्या देऊळात आलो. सोन्याबाबाचे दर्शन घेतले, त्यांच्याकडे असलेला पितळीचा तांब्या घेऊन शिवनामायमधून पाणी आणलं अन् महादेवाच्या पिंडीवर टाकून दर्शन घेतले.
देऊळाला लागूनच भामासाद महाराजांची समाधी आहे, तिचे पाय पडले. डोळे बंद करून ध्यानस्थ अवस्थेत कितीवेळ बसून राहिलो.
काही वेळाने शिवना मायच्या अंगाला करून, जवळ असलेल्या बाकड्यावर बसून मी शिवना मायला न्याहाळत होतो. तिचं निरंतर वाहणं डोळ्यात साठवून घेत होतो.
बाजूला असलेल्या लिंभाऱ्यावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता, तो ऐकत बसलो होतो. शिवनामायच्या तीरावर पहाटेच बायकांची धुणे धुवायला म्हणून रीघ लागलेली होती, त्यांच्या गप्पा बसल्याजागी माझ्या कानावर येऊ लागल्या होत्या.
यंदाच्या सालाला गावात मोप पाऊस पडून गेल्यामुळे शिवना माय दुथडी भरून, परंतु संथपणाने वाहत होती. शिवना मायच्या तीरावर यशवंतराव चव्हाण दादा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्या सालाला त्यांनी असंख्य दगडी पूल बांधलेली होती. आजही ती चांगल्या स्थितीत होती.
आता गावच्या बायका तिथं रोजचं धुणे घेऊन धुवायला यायच्या, त्यांच्या पारगभर चालणाऱ्या गप्पा. गप्पा कसल्या आपल्याच बालपणीच्या आठवणी, माहेरच्या आठवणी एकमेकींना त्या सांगायच्या अन् घटकाभर तितकंच आपल्या कष्टाळू जगण्याचा त्यांना मग त्यातून विसर पडायचा.
- भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा