मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग-४

शिवना मायच्या कथा..! भाग-४
 
मी एका हातात दूरडी घेऊन घराच्या वाटेला लागलो. थंडीचे दिवस असल्यानं गावात चौका-चौकात शेकोट्या पेटल्या होत्या. एखाद - दुसऱ्या गल्लीतून घराकडे जाताना एखाद्या घरातून काळ्या व्हरवंट्यावर वाटून केलेल्या भाजीला फोडणी देतानाचा येणारा तो सुगंध येत होता. अन् पोटाला लागलेली भूक अजून वाढत होती. गावच्या पिंपळ पारावर आलो तसं गावची बापूडी लोकं धरणीला धरून बसली होती. समोर शेकोटी पेटवलेली, तिच्या धुराचे लोट आसमंतात मिळत होते. इतकी मोठी शेकोटी होती की, सांजेला म्हसनात पेटलेलं एखादं मड आता निखाऱ्यात येईल.त्याच्या चहूबाजूंनी गावातली म्हातारी गावातल्या गप्पा हानीत बसली होती. गप्पा तरी काय त्यांच्या अमक्याच्या शेतात हे झालं तमक्याच्या शेतात ते झालं, या मालाला बाजारपेठ नाही, यंदाच्या उन्हाळ्यात पोरीचं लग्न करून टाकू, जावई चांगले आहे. शहराला नोकरी करत्यात, मोप जमीन हाय अश्या ठराविक विषयांच्या चौफेर त्यांच्या गप्पा असायच्या.मी जरावेळ गप्पा हाणल्या अन् तिथून काढता पाय घेतला.
 
मी गेल्यामुळे तिथं झोल्याआईचा विषय निघला अन् पुढं तो विषय बराचवेळ लोकं चघळत बसली. कारण झोल्याआई कामाशी काम करून सुखी होती. तिला एक आणा कुणाला, कुणासाठी ठेवायचा नव्हता की, तिला मागेपुढे कुणी नव्हतं. त्यामुळं तिचं सर्व ब्येस चालू आहे असं गावच्या हा लोकांना वाटत होतं.
 
मी घरात आलो तसं मायना आवाज दिला."का रं लका कुठं भटकत होतासा, काही पोटाला भाकर-तुकडा पाणी हाय का नाय..!
त्या गावच्या लोकांना काय भेटला नाय का..? शहराहून गावला आला की म्हाताऱ्या माणसांसारखं त्या गावच्या लोकांना भेटाया जात अस्तुया..!''
 
मी अंगणात असलेल्या रांजनातून डेचकीत पाणी घेऊन दगडावर जाऊन हातपाय धुवून, हात हिसळून घेतले आणि मायला बोलता झालो, "माय तुझं सबुत खरं हाय ग; पण शहराला गेलं की, मग कुठली भेटतीया ही माणसं बिचारी.
मग तेव्हडच गावला आलं की, त्यांच्या सुखादुःखाची विचारपूस. त्यांनाही आपलं दुःख ऐकून घेणार कुणी लागतच की. आजचीच गोष्ट घे, झोल्याआई संगतीने आज पारगभर गप्पा झाल्या. तिच्या जगण्यात असलेला दुष्काळ, तिचं सभोवताली असलेल्या माणसांच्या उपस्थितीतही एकटं आयुष्य तिला खायला उठतं अन् तिच्या जगण्याची केहना काय सांगावं अवघड आहे ग माय सगळं.''  तिनं संमध सांगितलं मला आज तिच्या आयुष्यातील दुष्काळ, तिचं पोरकेपण अगदी लुगड्याचा पदर डोळ्यांना लावत, तिनं आसवांना वाट मोकळी करून दिली अन् ती मोकळी होत राहिली माय माझ्या मोहरं, बोलत राहिली, "म्या काय केलं फक्त ऐकून घेतलं, त्याला काय पैका लागतो का..? पण तिला किती मोकळं वाटलं असल म्हणून गावला आलं की, हे भटकणं होतं माय.
शहराला गेलं की, गावच्या माणसांची किंमत कळते इतकंच.''
 
मी हातात असलेली दूरडी मायच्या हातात दिली. हातात देताच ती तिला न्याहाळत बोलू लागली,
झोल्याआईनं दिली का रे छोटे सरकार..?
हाव माय झोल्याआईनं दिली,
तू सांगितलं अस्तीला का तिला..?
 
हा पंधरधी झाली तेव्हा महादेवाच्या देऊळात भेटली अस्ता माझी तुटकी दूरडी पाहून बोलती झाली सा झोल्यामाय.
की, आक्का दूरडी पार तुटलीया, देवाला फुलाला चांगली दूरडी करून देतीया..!
पण पंधरधी सरली तसं कामं इतकी हाय का तिच्याकडे जाणं होईना.
 
मी गालातच हसत ती दूरडी बघू लागलो, अन् मायला म्हंटल
चल आता जेवाया भूक लागली हायसा.मला बापू कूठशिक हायसा.?
माय बोलू लई,
बापू गेलासा मगाशीच भाकर खाऊन सावत्या माळ्याच्या देऊळात हरिपाठ हायसा तिकडं टाळ कुटायला.
 
मी हसू लागलो,आईनं भाकरीचं टोपलं,कोडयासची कढई पुढं आणली अन् मला वाढून ती ही घेऊन जेवायला बसली. दिवसभर वावरात काय केलं ते ती मला सांगत होती अन् मी दिवसभर कुठं भटकंती केली ते मायला सांगत होतो.
 
पिठाच्या डब्ब्यावर ठेवलेला दिवा आमच्या गप्पा ऐकत असावा असा संथपणे जळत होता. त्यात माझा चेहरा अजूनच उजळून दिसू लागला होता की,आजच्या गावातल्या गावच्या माझ्या लोकांच्या भेटीने हे कळायला मार्ग नव्हता..!
 
मायच्या संगतीने मी भाकर खत बसलो होतो. बसल्याजागी जागी सावता माळ्याच्या मंदिरातला हरिपाठ ऐकू येत होता. बाहेर असलेल्या आमच्या बकऱ्या थंडीने कुडकुडत होत्या,त्यांना थंडी वाढल्यानं आता मध्ये बांधायला हवं म्हणून आईच्या अन् माझ्यामध्ये सल्लामसलत चालू होती.
 
भरीस भर म्हणून की काय सोसाट्याचा वारा सुटला होता अन् घराच्या पत्रावर आमच्या शेवग्याच्या झाडास असलेल्या शेंगा टपटप करून पत्रावर पडत होत्या. उद्याच्याला कोडयास म्हणून शेवग्याची काळी भाजी करूया म्हणून मी मायला सांगितले. माझं जेऊन झाल्यावर मी हात धूऊन खाटेवर येऊन अंगावर पांघरून घेऊन झोपलो होतो.
 
झोपल्या जागेवरून चुल्हीतला धूर मोडकळीस आलेल्या खिडकीतून बाहेर जात होता अन् घराला आग लागावी तसं दूरवरून दिसू लागलं होतं.
भाकरीचा लालबुंद झालेला तवा हळूहळू थंड होत होता, हळू हळू शांत होत विस्तव तव्याच्या खाली पडत आकाशातील तारा तुटल्यागत माझ्याकडे बघून हसत होता..!
क्रमशः.
 
भारत सोनवणे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...