मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग-सहा


शिवना मायच्या कथा भाग-सहा 

आज एकादस असल्यानं पहाटेच नेहमीप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या पालखीची फेरी गावातून निघाली होती. विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गावकरी, लहानगी पोरं पालखीच्या पुढे फेर धरून पावल्या घेत होती. 

एकादशीच्या दिवशी गावात एक जिवंतपणा असल्याची आगळी वेगळी जाणीव होत असते,जी आज होत होती. नाही तर एरवी पहाटेच्या दहाच्या सुमारास सारा गाव रानात कामाधंद्याला निघून गेलेला असतो.
अन् गावची म्हातारी माणसं गावच्या पारावर गप्पा झोडीत बसलेले असतात. गावातल्या म्हाताऱ्या आज्या घराच्या मोहरे असलेल्या ओट्यावर दळणदाना करत बसलेल्या असतात.

सकाळ दुपारच्या पाराकडे कलली की, मग गावच्या सरकारी झेडपीच्या शाळेतली लहानगी पोरं घराच्या दिशेने गावच्या मधल्या गल्लीने पळतच सुटतात. इतक्यावेळ निपचित पडलेलं गाव या लहानग्यांच्या आवाजाने अजून जिवंत होतं.

भर दुपारच्यावेळी नदी संथपणे वाहत राहते. गावात नव्यानं आलेल्या सूना डोक्यावरचा पदर सावरत धुणे घेऊन महादेवाच्या देऊळाजवळ नदी थडीला केलेल्या दगडी पुलावर धुणे धुवत बसतात. हाच काय त्यांना हक्काचा वेळ मग माहेरच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

भरघोस गप्पा होता, एकमेकींना एकमेकींच्या दादल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्या सहज देऊळात झोपलेल्या आजोबापर्यंत ऐकू जात असतात अन् तोही कुणी बोलायला नसल्यानं या गप्पामध्ये प्रत्यक्ष सहभाग न नोंदवता हे निपचित पडल्याजागी ऐकत बसलेल्या असतो.

पालखी मदरीच्या गल्लीतून, धोंडू नाना तेलीच्या गल्लीत आली. चौकात येऊन भाविक फेर रिंगण धरून पावल्या घेत होते. हे सगळं मी बसल्या जागेवरून बघत होतो.
पुढे चौकातून सर्व मंडळी सरळ सावत्या माळ्याच्या देऊळा मोहरच्या गल्लीतून देऊळाकडे निघाली.

ज्याच्या घरापाशी पालखी आली लोकं तिचे पाय पडून चिमुट चिमुट साखर देऊन आपल्या नित्याच्या कामाला लागत होती. विठू नामाच्या गजरात पालखी गावच्या एकांगाला असलेल्या महादेवाच्या देऊळाकडे निघाली होती. अन् हळू हळू गावातली लोकं नजरे आड झाली. गावात एकाकी शांतता पसरली.  

मी ही उठून बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते, सावरत मी घराला लागून असलेल्या लिंभाऱ्याचा एक डगळा तोडून दातून करावं तसं घराला लागून असलेल्या आमच्या पाण्याच्या कुंडीवर उक्खड बसून दात घासत बसलो.

दगडू आज्जा हळूवार उठून ढुंगण खरडीत खरडीत त्याच्या लेवकानं बांधलेल्या लाकडी वाश्याच्या घरात येऊन बसून राहिला. घरात अंधार बुडूक असल्यानं दगडू आज्जा काही दिसंना झाला होता, त्याचं पांढर धोतर अन् त्यानं घातलेली मळकटलेली बंडी मात्र त्या अंधारातही मी बसलो त्या जागेवरून दिसत होती.
अन् अधूनमधून त्याचा खोकलण्याचा आवाज येत होता इतकंच.

मी गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्याना न्याहाळत घंटाभर दात घासत बसलो. इसनाला आलेलं पाणी बादलीत घेऊन, कुंडीतून इसनाला थंड पाणी घेऊन न्हाणी घरात अंघोळीला येऊन बसलो. कव्हरभर माझा हा अंघोळीचा खेळ चालू होता. तो आवरून मी तुळशी वृंदावनात आरसा म्हणून खोचलेल्या फुटक्या काचेत माझा चेहरा न्याहाळत भांगपट्टी करू लागलो .

बोकड्यागत वाढलेले केसांच्या मधून कंगवा फिरावा तसं पाणी निथळत चेहऱ्यावर येत होतं. मी त्याला पालथ्या हाताने पुसत एकदाचा भांग पाडून, डोळ्याच्या दोन्ही भुवईच्या मधोमध अष्टगंध लाऊन मी परसदरच्या चौकटीत गार हवेचा झोका अनुभवत बसून राहिलो.

आता कुठे प्रसन्न वाटू लागलं होतं. काल केलेल्या दिवसभर भटकंतीमुळे रात्री झोपेत पाय ओढू लागले होते, जे आता बरे झाले होते. काहीवेळ काय करावं हा विचार करत बसल्यावर मी न्याहारी करायची म्हणून घरात आलो. शिंकेला लावलेली टोपली दुरूनच नजरेस पडत होती, अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने ती हलत होती.

मी घरात आलो शिंक्यापर्यंत हात पुरत नाही म्हणून पिठाचा डब्बा घेऊन मी त्यावर उभा राहिलो अन् बऱ्याच कसरतीने मी भाकरीचे टोपले काढून. खुंटीला टांगलेल्या कडीच्या डब्ब्यात असलेलं कोड्यास एका थाटलीत ओतलं अन् एक सवती भाकर चुरून खात बसलो.

भाकर खाऊन झाली अन् आता पुन्हा काय करावं या विचाराने मी परेशान झालो. दोन-चार दिवसच आहे घेऊ फिरून मग पुन्हा शहराच्या वाटा जवळ कराव्या लागतील. मग काय तेच कालीज, तीच कंपनी त्यामुळं आहे तोवर भटकून घेऊ म्हणून मी माझं आवरून. कोड्यास, भाकरी व्यवस्थित ठेऊन घराला असलेल्या दोन फाकाच्या दरवाज्याला कडीत अडकवून उटळे लावले अन् उटळे तुळशी वृंदावनाच्या खाली घालून मी भटकायला म्हणून डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जाणाऱ्या वाटेनं निघालो.

गावातली लोकं विचारपूस करत होती, त्यांच्या रोजच्या गप्पांना मी आता कंटाळलो होतो. म्हणून गावच्या बाहेर असलेल्या एक दोघं मित्रांना घेऊन आम्ही डोंगराच्या वाटेनं लागलो. आम्ही वाटेनं कसलं सुधीनं चालतो कोणाच्या बांधावर बोराचं झाड दिसलं तर बोरच तोड, कुठं मक्का दिसली तर तीच तोड उसाचा फड दिसला तर दोन-चार उसाचे टिपरे घेऊन आम्ही खात खात निघालो होतो.


सोबत असलेला सलीम अन् अनवर माझे बालपणीचे सवंगडी होते पण ते सातवी करून पुढे शिकले नाही. आता घरची ढोरं घेऊन ते असे डोंगराच्या पायथ्याला ढोरं चारत असे म्हणून त्यांना या रानाच्या वाटा माहित झालेल्या होत्या, म्हणून अजूनच मज्जा येत होती. ती पुढे मी मागे कधी संगतीने आम्ही चालत होतो. छोटे मोठे ओढे लागले की पोटभर पाणी पिऊन घेत होतो अन् चालत होतो, चालत होतो...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...