शिवना मायच्या कथा..! भाग -५
तितक्यात काळोखात शिवनामायच्या थडीला असलेलं स्मशान चिरशांत, भयावह भासावं असंही डोळ्यांसमोर येऊन गेलं. स्मशानाला लागून असलेल्या नदीच्या थडीला वाळू माफीयांनी केलेल्या खोल खड्यांमध्ये कुत्रे थंडीच्या या दिवसात रातभर विसाव्याला तिथेच थांबली होती.
कुणी लोळत पडलं होतं; तर कुणी उभ्या मोठ्यानं गावच्या दिशेनं तोंड करून इवळत होतं. तो इवळण्याचा आवाज माझ्यापर्यंत सहज येत होता. सारं गाव आतापर्यंत निपचित पडला असावं असं वाटत होतं.
अधूनमधून कुंभाराच्या आळीत राहणारा दगडु आज्जा खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलायचा. अगदी तासनतास तो खाटेवर खोकलत अंथरुणात अंगावर गोधडी घेऊन बसलेला असायचा. त्यानं तोंडातून फेकलेला बेडका पट्टदेशी आवाज करत जमिनीवर पडायचा. जसं आकाशातून सलगीच्या उन्हाळ्यात टपकन एखादी गार पडावी.
कुण्या दुसऱ्या गल्लीला रात्रीची लाईन असल्यामुळे गव्हाचं रान ओलीता खाली आणायचं म्हणून वावरात जायची कुणाची गरबड चालू असायची. अधून-मधून बकऱ्याचा परसदरच्या भिंतीला लागून फळफळ मुतण्याचा आवाज यायचा अन् नकळत त्याचा इसाडा वासही नाकाला भिडायचा.
घराच्या मोहरं असलेल्या संतुक आबांच्या गाईंच्या गळ्यात असलेल्या तांबी घंट्यांचा कीनकीन आवाज अन् त्यांच्याच म्हशीच्या गळ्यात असलेल्या पत्र्याच्या डब्यात केलेल्या घंटींचा आवाज एखाद्या घड्याळीच्या लोलकासारखा यायचा. अशा बारीकसारीक गोष्टी गावात चालूच असतात.
अशा वेळी मला ऐन रात्री वाहत असलेली शहरं, अंगावर येणारी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेली यंत्रांची घरघर सगळं सगळं आठवतं, मग शहर नकोसं वाटायला लागतं. गाव हवंहवंस वाटू लागतं. शहराकडे जाण्याचा आपलाच अट्टहास अन् त्यामुळं आता पडणारी ही अशी असंख्य प्रश्न माझी झालेली द्विधा मनस्थिती सगळं वाईट्ट आहे.
खरं तर सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासाठी ही असते की, मी जेव्हा माझं गाव सोडत असतो, तेव्हा मी पार पोरका झालेला असतो. गावच्या माझ्या माणसांच्या सहवासात असूनही अन् मग पुढे शहरात येऊनही दोन-चार दिवस हे विचारचक्र डोक्यात फिरत राहते.
अशा या विचारात काळोख मध्यरात्र कशी सरून गेली कळलं नाही. पहाटेच्या तीनच्या सुमाराला दरवाजांच्या फटीतून येणाऱ्या गार हवेने माझे डोळे लागले ते पहाटे मायची घर झाडाच्या लगबगीपर्यंत लागलेच होते.
सूर्योदय झाला अन् डोळे चोळत चोळत उठलो. मायना अंथरूण-पांघरूण घडी घालून घडोंचीवर फेकलं. नुकतंच शेणाने सारवलेल्या घरात शेणाची बारीक कण सूर्याच्या किरणांच्या समवेत समीप होऊन खिडकीशी सलगी करू लागली होती.
मी उठून आमच्या झोपडीवजा घराच्या चौकटीवर येऊन बसून राहिलो. बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते. त्यांना सावरत मी गावातल्या लोकांची कामाची चालू असलेली लगबग बघत बसून राहिलो होतो.
दगडू आज्जा अजूनही खाटेवर निपचित पोटपाय एक करून अंगाचा मुटकळा करून खाटेवर झोपलेला होता. एकांगाला त्यानं रात्री खोकलून खोकलून टाकलेले बेडके अन् त्यावर माशा गणगण करत होत्या. संतुक आबा म्हशी पिळीत होता, त्याचा धाकला लेवुक गोठ्याची झाडझुड करत होता.
रात्री गव्हाला पाणी भरायला म्हणून गेलेली लोकं उजाडायच्या आतच येऊन निपचित झोपली होती. गावातल्या काही लोकांची आखरं शेताला होती ती पहाटेच उठून चारापाणी करायला म्हणून शेतात गेली. अन् आता एका हातात दुधाची क्यान घेऊन तीही गाव जवळ करत होती.
रात्री स्मशानात इवळत असलेली कुत्रे सावत्या माळ्याच्या देवळाजवळ असलेल्या पिंपळ पारावर येऊन निपचित पाय पोटाशी घेऊन झोपून राहिली होती. काही कुत्र्यांची पिल्लं या पहाटेच एकमेकांशी खेळत बागडत होती. गावच्या काही माय माउली पहाटेच देऊळात काकडा करून घराच्या वाटा जवळ करीत होत्या.
काही म्हातारे ज्यांच्या आयुष्याची दोरी कधीही तुटन अशे म्हातारे काठी टेकीत टेकीत सावत्या माळ्याच्या देऊळाकडे निघाली होती. तोंडातून शब्द बाहेर निघणार नाही असं काही तरी मनातच मनाशी अन् देवाशी बोलत ती चालत होती.
पहाटेच काकड्यावरून येणाऱ्या मंडळींना गावातली काही लोकं चहासाठी बोलवीत होती. ओट्यावर बसून त्यांचं चहा पिणं होत होतं.
क्रमशः
भारत सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा