मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा. भाग - ७

शिवना मायच्या कथा. भाग - ७

तवल्यागडचा डोंगूर आम्ही अर्धानिर्धा चढला अन् मला एकाकी धाप लागल्यासारखे झाले. शहराला गेलो तसं कष्टाची कामं कमी झाली अन् श्रम करण्याची सवय मोडल्या कारणाने  माझी ही अशी अवस्था झालेली होती.

आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तिथून पत्र्याचा, कौलाच्या झोपडीच्या आकारांच्या घरांचा सारा गाव नजरीस पडत होता. गावाच्या जवळपास रानातल्या रानवाटा डोळ्यांना स्पष्ट दिसत होत्या. ज्या वाटांवर नजर फिरली की आमची नजर आपसूकच आम्हाला गावाजवळ, गावच्या वेशीजवळ घेऊन येत होती.

भली धाप लागल्याने मी हिरव्या गवतात बोडक्या बाभळीच्या पडसावली खाली लोळत पडलो होतो. सलीम दूरवर दिसणाऱ्या धरणपाळीवर भोळ्या राजूच्या चरणाऱ्या बकऱ्यांना बोटे डोळ्याच्या समोर धरून अनवरला दाखवत होता. ते दोघेही भोळ्या राजूच्या बोलण्याची नक्कल करत एकसोबत हातवारे करत मोठ्यानं हसत होते.

सलीम भोळ्या राजूच्या बोलण्यातले नेहमीचे वाक्य मोठ्यानं बोलत होता. जेव्हा जेव्हा त्याच्या बकऱ्या सरळ वाटेला चरायचे सोडून आडवाटेला शेतकऱ्याच्या रानात घुसायची तेव्हा तो जसं बकऱ्याना उद्देशून बोलायचा तसं सलीम बोलत होता.

हुरीयो केवढी ये..!
मायची केवढी. केवढी... केवढी... हुरीयो..!
केवढी..! केवढी...!
बारबापे शिधी वाटनी चालीये हुरीयो..! हुरियो.. केवढी...!

अगदी हुबेहूब सलीम भोळ्या राजूच्या आवाजात त्याची नक्कल करत होता. अनवर मोठ्या मोठ्यानं शिळ फुंकित हसत होता, मी ही गरबड्या हसू हसू लोळत होतो.

आमचा आवाज भोळ्या राजूपर्यंत गेला की काय म्हणून, तो तवल्यागडच्या डोंगराकडे बघत एक हात डोळ्याच्या वर घेऊन कोल्ह्यागत कुही ईक..! कुही ईक..! ओरडत होता.

या ओरडण्याचा मला अंदाज आला नाही पण सलीम अन् अनवर अजून मोठ्यानं हसायला लागले. कदाचित ते तिघे रानात ढोरं, बकऱ्या चारायला गेले की त्यांचा हा काही कोडवर्ड असेल बोलण्याचा.

बरच हसून खिदळून झालं अन् आम्ही डोंगराच्या सर्वात उंचावर असलेल्या दगडावर जाऊन गाव न्याहाळत बसलो. इतक्या उंचीवरून सर्व गाव अन् कोंडूर धरण संपूर्णपणे डोळ्यात मावत होते.

गावातले लोक वावरात कामं करताना दिसत होती,देऊळाच्या मोहरं असलेल्या पारावर असलेली गावातली म्हातारी माणसं ढवळ्या रंगाच्या कपड्याने डोळ्यांना नजरी पडत होती. डोंगरात भटकत असलेली कुत्र्यांची एक टोळकी त्यांनी पायांनी खणून केलेल्या छोट्याश्या भूयाररुपी घरात गारवा अनुभवत लोळत पडली होती.

अधूनमधून डोंगराच्या एका पल्याड असलेल्या हिरव्या दाटकंच रानातून मोरांचा आरवण्याचा आवाज येत होता. डोळ्यांना डोंगराच्या कपरीला असलेल्या झऱ्यांचे चमचमते पाणी गावात जाणाऱ्या नदडीला मिळेपर्यंत दिसत होते. 
हे सर्व बघत आम्ही निपचित शांत बसून राहिलो होतो.

आता अंगाला आलेल्या घामाचा वाऱ्यामुळे गारवा अनुभवायला मिळत होता. या वाऱ्याच्या झुळके बरोबर अजूनच छान वाटत होतं.
अन्वर आमच्या लहानपणीच्या उनाड आठवणी सांगत होता, आजही ते तिघे किती मज्जा करतात हे ही सांगत होता. मी माझ्या शहरातलं अन् गावातलं बकवास आयुष्य त्यांचा न जुळणारा ताळमेळ जुळवू बघत होतो.

आयुष्याला घेऊन मला नेमकं काय हवं आहे..? या प्रश्नाची वजाबाकी,बेरीज करत बसलो होतो. येणारी उत्तरे आणि होणारी जाणीव रडायला यावं इतकी वाईट्ट होती पण पर्याय नव्हता.

कारण माय, बापूने इतकी ढोर मेहनत घेऊन रात्रीचा दिवस करून आपल्याला, शिक्षणाला खूप सारा पैका खर्च करून शहराची वाट आपल्याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी जवळ करायला लावली होती. अलीकडे गावाला आलं की बापूंच्या बोलण्यातून हे जाणवायचं की, लवकरच त्यांना मला माझ्या पायावर उभं झालेलं बघायचं होतं.

कारण त्यांनीही त्यांच्या उमेदीच्या काळात खूप कष्ट केले, त्रास सोसलेला होता. आता माझ्या आडून त्यांना सुखाचे दिवस बघता येईल असं त्यांना वाटत होतं, मी ही याच विचारांना डोक्यात घेऊन कालीज करून रातच्या शिफ्टला कंपनीत कामाला जात होतो. दोन पैसे यायचे त्यात माझं शहराला राहणं, खाणं भागून जायचे पण अजून माय बापूच्या डोक्यावरचे ओझे मी वाहू शकेल इतपत पैका कमावणारा मी झालो नव्हतो.

याच विचारात घंटाभर कसा निघून गेला कळला नाही अन् समीर, अनवरला मी बघतो तर ती दोघं लिंबाच्या झाडावर जाऊन बसून राहिली होती. भिंगोट्याची भिंगरी करून तिला फिरवत होती तिचा हेलिकॉप्टरसारखा येणारा भूनभुन आवाज ऐकून मी त्यांच्याजवळ गेलो अन् सलीमकडून मी ती भिंगरी घेऊन लिंभाऱ्याच्या झाडावर बसून तिला भिरकावीत राहिलो. 

डोंगरातील करवंद, आवळे, बिब्बे खाऊन दिवस कसा उतरणीला आला कळला नाही. दिवसभर डोंगरात केलेल्या भटकंतीमुळे परतीच्या वाटेला पाय पोटरीतून वर ओढू लागले होते. चालायची इच्छा होत नव्हती, पण अस्ताला जाणारा सूर्य जसा डोंगराच्या आड जाऊ लागला तश्या आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. घराच्या दिशेने गावाकडे निघालो.

पहाटेच बैलगाडीतून शेताला गेलेली लोकं अर्ध्यानिर्ध्या वाटेत दिसू लागली होती‌. पायी चालणारी लोकं कलत्या सूर्याचा अंदाच घेऊन पावलं उचलीत वाटा छाटीत छाटीत गाव जवळ करीत होती. भोळ्या राजूच्या बकऱ्याही गावच्या दिशेनं येऊ लागल्या होत्या, साऱ्या आसमंतात वाटेनं चालणाऱ्या बकऱ्याच्या खुराची धूळ मागे उडत होती.

आम्हीही तवल्यागडचा डोंगर उतरून पायथ्याशी असलेल्या गावाकडच्या वाटेनं लागलो होतो. गावात सावत्या माळ्याच्या देऊळामध्ये होत असलेला हरिपाठ आता कानी पडत होता. सईद आणि अन्वर तो घोकित रस्त्यानं चालत होती

क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...