इंडस्ट्रिअल विश्व..!
आज एका अश्याच मीटिंगला उपस्थित होतो. दिवसेंदिवस शहरं वाढत चालली आहे, जसजशी शहरं वाढीस लागली तसतशी शहरात रोजंदारी उपलब्ध होण्यासाठी विविध कंपन्या, मॉल्स, छोटे-मोठे उद्योग समूह निर्माण झाले. शहरात बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला.
सुरुवातीला जवळच्या चार-दोन तालुक्यातील अन् आता हळूहळू जवळच्या तीन-चार जिल्ह्यातील, कामगार वर्ग औरंगाबाद शहर आणि शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायला शहरात येऊ लागला.
पाच दशकं पूर्ण होऊन गेली शहरातील बऱ्याच घरातील दोन पिढ्यांची हयात या कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार वर्ग म्हणून निघून गेली.
वेळोवेळी अनेक सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या अन् अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला. अनेकवेळा त्यांनी कामगार वर्गाची युनियन स्थापन करून प्रश्न मार्गी लावण्याचा विचार केला ; पण हे सर्व प्रश्न तितक्याच मर्यादित काळासाठी सुटले अन् पुन्हा जैसे थे अवस्था झाली.
मी काही कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार नाही ; आयुष्यात हे जगणं फक्त तीन महिने जगलो आहे. परंतु या माझ्या कामगार बांधवांचे खडतर आयुष्य मी जवळून बघितले आहे.
अन् त्यांचे कंपनीतील चटके सहन करून पोळलेले आयुष्य मी बघितले आहे. हे काही साल दोन साल चालणारं नाही, गेली पाच दशकं हे सर्व चालू आहे. परंतू या कामगार वर्गाचा वाली कुणी नाही, माझ्याच्याने मी एकटा काहीही करू शकत नाही हे ही मला माहित आहे.
कारण माझ्याच आयुष्यात नोकरीचा ठाव ठिकाणा मला अजून नाही. परंतु दोन अक्षरं लिहायला येतं म्हणून इतरांना ही जाणीव व्हावी म्हणून लिहायला घेतलं.
याबद्दल अनेकांशी बोललो आजवर अनेकांनी संबधित विषयाला घेऊन माझे असलेले लेख बघून मला कॉल केले भेटणं, बोलणं झालं.
पण काही मार्ग अवलंबले गेले हे आजवर दिसले नाही.
कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांचं आयुष्य खूप भयाण अन् एकसंध असं असतं. आयुष्यभर रोटेशनल शिफ्ट करणं सोप्पं नाही, त्यात कधीतरी सोळा-सोळा तास ड्युटी करणं अन् त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम हे खूप भयाण आहे.
हल्ली शहरात भटकत असताना मला नॉर्मल आयुष्य जगणारी माणसं कमी आणि सेफ्टी शूजवर ठरल्या वेळेत नोकरीवर जाणारी माणसं माझ्या डोळ्यांना जास्त दिसतात. त्यामुळं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ही भावना आहे.
बघूयात काय होतं, त्यांचं दुःख इथे दोन-चार ओळीत मी लिहावं इतकं कमी किंवा इतकं सोप्पं, सहज नाही त्यामुळे टाळलं बरच काही लिहायचं.
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा