औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!
सायंकाळ झाली की अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर माझं नॉर्मल आयुष्य मला अजूनच गुंतागुंतीचं वाटू लागतं. मग मी काळोखाला जवळ करत भटकत राहतो खाचखळगे असलेल्या आडवाटांना. शहरे ओळखीची झाली, काही अंशी शहरातील माणसंही ओळखीची झाली.
पण मला का कुणास ठाउक यातील कुणालाच जवळ करावंस वाटलं नाही,का.? हे गणित न उलगडणारे होते. शहरातील माणसं अन् त्यांच यंत्रवत असणं किंवा तसं आयुष्य जगणं मला नेहमीच जिव्हारी लागणारं होतं. पण पैसा माणसाला अक्कल शिकवतो अन् मग मी ही या यंत्रवत आयुष्याचा बळी पडलो.
होत काही नाही,
बस सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलं की, येताना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या यंत्रांची घरघर अंगावर येते. आयुष्याला कंटाळलेले अन् गावाकडे पर्याय नाही म्हणून शहरात आलेल्या तरुणांचे रातदिवस अनवाणी पायांनी चालून, सेफ्टी शूजच्या पावलांनी गुळगुळीत झालेले रस्ते जवळची वाटू लागतात.
ऐन तारुण्यात लग्न जुळेना म्हणून गावच्या बक्कळ पोरांनी शहरं जवळ केली, पोरींच्या बापांनी पोरांची ही चालही ओळखली आणि पोरांचे जुळता जुळेना.
मग अश्यात अनेकजन दारूच्या आहारी गेली, अनेकजण रात्रंदिवस १२-१६ तास ओव्हर टाईम काम करून छातीची खपाटी दिसेपर्यंत काम करत राहिली. काहींनी वेगळाच मार्ग अवलंबला.
त्या वाटेला आजवर जाणं आलं नाही. पोरांनी वसाहतीच्या दोन कोस दूर असलेल्या विशेष भागात जाऊन आपली शरीराची भूक भागवली. पहाटेच फर्स्ट शिफ्टला जातांना पोरांनी तीच निरोधं रस्त्याच्या कुपाटीला फेकून दिली. येणारी-जाणारी प्रत्येक स्त्री,प्रत्येक पुरुष ती न्याहाळत राहिली.
बेक्कार आयुष्य काय असावं यापेक्षा. १२-१६ तास ओव्हरटाईम काम करून छातीची खपाटी झालेली ही पोरं बघितली की, त्यांचं हे असं रोजचं थोडं-थोडं मरणं बघून आयुष्याला घेऊन आपण किती सिरियस विचार करतो हे कळून येतं.
माझ्या वयाची पोरं याच मार्गाला जाऊन ऐन पंचविशीत अर्ध आयुष्य जगून बसली. जी नाही ती अजमावून, जी नाही ती संगत करून बसली. आम्हाला अजूनही "नामदेव ढसाळ" यांचा "गोलपिठा" अंगावर येतो.
संवेदनशील माणसांचं असच असावं असं हल्ली वाटू लागलं आहे, आणि हेच बरं असंही वाटून गेलं. कारण दोन-चार सालापूर्वी भर वसाहतीत भोसकून दिलेल्या मुलाला बघितलं. तेव्हा माणसं कुठल्या थराला जातील याचा अंदाज येऊन गेला.
अन् मी अंतर राखूनच राहू लागलो या शहराच्या लोकांपासून, नाईलाज म्हणून आलेल्या गावच्या या तरण्या पोरांपासून.
असो चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून शहर न्याहाळत असलो की जवळच असलेल्या एअरपोर्ट मधून जाणाऱ्या विमानाला हात लावासा वाटतो. त्याच्या आत बसावं वाटतं पण नशीब कुठलं आपलं, असो माणसच बसतात त्याच्यात पण तीही शहराकडची म्हणून तेही हल्ली नकोसं वाटतं. त्याची चमकणारी लाईट दूरपर्यंत जास्तोवर बघत रहायला डोळ्यांना आवडतं हल्ली.
काल मेसवाल्या ताई फुरसतीत असल्यानं बोलल्या दादा तुमची कथा वाचली कालची दैनिकात आलेली. गरिबीची, गरीब लोकांची कळ हाय तुम्हाला. तीला काय सांगणार होतो तिचं-माझं रोजचं आयुष्य, आयुष्यात येणं-जाणं करणारे क्षण त्या कथेतून मांडले होते.
तिनं त्या खुशीत दोन गुलाबजाम ताटात शिल्लक दिले अन् डोळ्यावर आलेली बट सावरली. हे सगळं माझ्या दैनिकात आलेल्या कथेसाठी नव्हतंच हे तेव्हाच कळून चुकलं. आता काय बोलायचं होतं, एकतर मेस या महिन्याच्या शेवटच्या दिवसाला सुटणार होती. नाहीतर माझं मेसवर जेवायला येणं बंद होणार होतं.
तिची चूकी काही नव्हती, तिचाही दादला कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार होता. अन् मेसवर जेवायला येणारी बहुतांश मुलंही तीच दोन कोसावर जाऊन आपली शरीराची भूक भागवून घेणारी होती.
तिचाही गैरसमज झाला असावा, की मीही त्यातला असेल ; पण मला लोकांच्या या कथा जवळच्या वाटतात म्हणून मी तिथे जात राहिलो. अन् एक दिवस नकळत थांबून घेतलं.
अजून बरच काही..!
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा