Industrial सुट्टी..!
कालची सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलो अन् उद्या सुट्टी म्हणून उद्याच्या दिवस आराम याच कल्पनेत कंपनीतून सेक्युरिटी गार्डने चेकआऊट केलं अन् मी बाहेर पडलो.
जोडीदार मागेच होता, गाय छाप खाणारा आहे तो. शिफ्ट सुटली की मग बाथरूममध्ये जाऊन त्याची गाय छाप बुटाच्या आत घालतो, अन् मग सेक्युरिटी गार्डच्या चेकींग कॅबिनकडे तो वळतो. साधारण वर्षभरापासून माझा रूम पार्टनर आणि इथे कंपनीतही सोबती आहे.
दोन वेळा हजार-हजार रुपये फाईन भरून आणि पुढे गाय छाप जवळ सापडली तर कंपनीतून काढून टाकीन. या सुपरवायझरच्या धमकीलाही तो जुमानत नाही आणि बिनधास्त गाय छाप कंपनीच्या आत घेऊन येतो. त्याची ती तलफ आणि त्याचं ते गाय छाप लपवण्याचं कौशल्य बघितलं की, असं वाटतं इतकं डोकं त्याने कंपनीत वापरले असते तर नक्कीच सुपरवायझर झाला असता. आणि मग सगळ्या गाय छाप खाणाऱ्या पोरांना मोकाट सूट त्याने दिली असती.
असो मी बाहेर पडलो गेटच्या बाहेर तिसऱ्या शिफ्टसाठी मुलं कुडकुडत बाहेर कंपनीच्या गेटवर उभी होती. काही पाच-सहाजण नवखेच होते अन् कंपनीत काम भेटन या आशेनं ते आज दिवसभरातून तिसऱ्यांदा फर्स्ट,सेकंड आणि आता थर्ड शिफ्टमध्ये काम भेटेल म्हणून गेटवर उभे होते.
कंत्राटी पद्धतीने काम करायला आलेली ही मुलं बहुदा खेड्यापाड्यातील. रूम घेऊन नव्यानं त्यांनी संसार थाटलेला असतो त्यांचा एकट्याचा. कित्येक स्वप्न पाहून शहरे जवळ केली असतात, कित्येक सुपरवायझरचे पाय धरून काम मिळवलं असतं.
जेमतेम शिक्षण, अनुभव नाही त्यामुळे त्यांना लवकर कुणी कामावर घेत नाही. तेव्हा अश्या मुलांची पहिल्या महिनाभर वाईट अवस्था असते. कधीतर पार्ले बिस्कीट पुड्यावर दिवस काढणारे मित्र मी बघितले स्वतःही अनुभवले. यांचं स्ट्रगल वाईट्ट आहे. हे सर्व जवळून अनुभवले, बघितले असल्यानं वाईट वाटते या मुलांसाठी. त्या मुलांना आज काम भेटल की नाही हे बघण्यासाठी मी गेटवर दहा-पाच मिनिट थांबलो.
रोजची तिघं पोरं कामावर आलेली नव्हती मग त्यातली तीन पोरं सुपरवायझरने आत घेतली. कंपनीत आज त्यांचा काम करण्याचा पहिला दिवस असावा म्हणून ती खुशीत गेटच्या आत कार्ड दाखवून चेक इन करून आत गेले.
तिघे-चौघे रूमवर जाऊन तरी काय करणार म्हणून कंपनीच्या बाजूला असलेल्या आडवाटेला रात्री साडेबारा वाजता शेकोटी करून शेकत बसले.
आजही माझ्या मित्राची गाय छाप सेक्युरीटी गार्डकडून धरल्या गेली नाही आणि उद्या सुट्टी याचा त्याला काय मोप आनंद झाला म्हणून तो रस्त्यानं उड्या मारतच चालत होता. मी माझ्याच कंपनीच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीना खेटून चालत होतो, आत मशिनरी पुन्हा चालू झाल्या होत्या.
फॉर्कक्लीपचा धडकी भरणारा हॉर्न पुन्हा एकदा कंपनीत निनादत होता. प्यालेट धडाधड एकावर एक आदळत होती अन् कंपनीचं प्रॉडक्ट प्रॉडक्शन काढणे चालू झाले होते. कंपनीच्या आवारात असलेल्या उंचउंच चिमण्या अन् त्यातून निघणारा धूर काळोखात अजूनच औद्योगिक वसाहतीमध्ये काळोख निर्माण करत होता.
मधूनच कंपनीतील अॅबुलंन्स मोठ्याने आवाज करीत कंपनीच्या आवारात घुमत होती. विपरीत काही झालं असावं कंपनीत,त्या खबरा कधीच कंपनीच्या बाहेर येत नाही, तिथेच दाबल्या जातात.
असो हे सगळं दृश्य बघून मला माझे जुने दिवस आठवतात.
सीव्ही घेऊन मी औद्योगिक वसाहतीच्या प्रत्येक कंपनीच्या गेटवर भटकंती केली. कुठे माझी बारीक अंगकाठी बघून तर कधी मी खूप शिकलो आहे अन् शिक्षण बघता मला कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेता येत नाही म्हणून गेटवरून कारणे देऊन मागारी पाठवण्यात आलं.
त्यामुळं हा कंपनीत काम करायला लागायचे म्हंटले की करावा लागणारा संघर्ष वाईट आहे.
साडेबारा वाजता फ्लॅटवर येऊन कॉटवर जे पडलो थकव्याने आपसुकच डोळे मिटले, पहाटे मित्राच्या हाकेसरशी जाग आली. अंघोळ वगैरे आवरून कामगार चौकात येऊन बसलो. माझ्यासारख्या असंख्य कामगारांच्या व्यथा इथे ऐकायला भेटतात, म्हणून इथे रोज येणं होतंच.
पाचात सात कटिंग चहा होतात सिगारेट पिणारे आपला अंदाज दाखवत त्यांचे झुरके सोडवत चहा घेत राहतात. माझ्यासारखे चहाच्या टपरीतला पेपर शोधून तो वाचत बसतात.
रविवार असला की सगळं कसं निवांत निवांत असतं. कुणी कंत्राटी कामगार पहाटेच देशी पिऊन चौकाच्या एकांगाला असलेल्या गल्लीत लोळत पडलेला असतो.
अश्यावेळी जे काही तो बोलतो ते सगळं वास्तव अन् त्याची करूण कहाणी सांगणारं असतं. बारा साडेबारा वाजले की पावलं मेसकडे वळतात, आज रविवार नॉनव्हेज मस्त चोपून हानायचे अन् फ्लॅटवर येऊन कॉटवर पडून रहायचं.
कुणी वाचत राहतं, कुणी आराम करते तर कुणी काय तर कुणी काय मी हे असं लिहत बसतो..!
Written by
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा