मुख्य सामग्रीवर वगळा

Reading बुक्स..!

Reading बुक्स..!

माझा प्रवास वाचनाचा...!

साधारण चार वर्षांपासून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. चार वर्षांच्या या काळात असंख्य कथा, कविता, ललित लेखन आणि इतर अश्या अनेक विषयांवर लेखन केलं.
परंतु चार वर्षांच्या या प्रवासात अलीकडे कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की, आपल्या लिखाणात कुठेतरी तोचतोचपणा येतोय आणि एक ठराविक मर्यादपर्यंतच आपण लेखन करतोय. 

यात प्रगती होण्यासाठी आपल्या लिखाणाला आपल्याला योग्य तो आयाम देऊन. आपल्या मनाला जे लेखन हवं आहे ; जे वाचक वर्गाच्या मनावर भूरळ घालणारे ठरेल, अश्या लिखाणासाठी मला माझं एकूण जे थोडेफार वाचन आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल असा विचार मनात येऊन गेला. 

जेणेकरून मी या माझ्या मर्यादित लिखाणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक वेगळं साहित्य माझ्या हातून निर्माण होईल. जे मराठी वाचकांच्या मनाशी रुंजी घालू बघणारं अन् त्याना हवंहवंसं वाटू लागेल.

सोबतच समाजातील अनेक प्रश्न, घडामोडी, अश्या अनेक विषयांना घेऊन केलेलं लेखन मी वाचेल आणि या वाचनाच्या माध्यामतून चिंतन करेल. ज्यामुळे माझे विचार अजून प्रगल्भ होतील‌‌. अश्या या आणि अनेक विचारांना घेऊन साधारण दोन वर्षांपूर्वी माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला.

आजतागात या दोन वर्षात मी आजवर जवळजवळ दीडशेच्या आसपास पुस्तके वेळ भेटेल तसे वाचन करून संपवले. हे पुस्तके मिळविण्यासाठी अनेक अडचणी मला येत गेल्या, परंतु वाचनाचं हे वेड मला शांत बसू देत नव्हते.

त्यामुळे माझा हा प्रवास कितीही अडथळे येत असतानाही आजवर चालूच आहे. 

माझी आर्थिक परिस्थिती नसतानाही माझ्या कुवतीनुसार मी पुस्तकं विकत घेत होतो. वाचनालयाच्या माध्यमातून काही पुस्तके वाचण्यासाठी मिळवत होतो. सोबतच अनेक पुस्तकं जे मला खरेदी करण्यासाठी आवाक्या बाहेरची असतील ती मी पीडीफ फॉरमॅटमध्ये असेल तर ती ही वाचत होतो. रद्दीच्या दुकानात जुन्या पुस्तकांच्या किंमतीत मला काही पुस्तके उपलब्ध होत गेली, जे दर्जेदार असो नसो ती मी वाचत गेलो.

पुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पुस्तकांच्या संदर्भात लेखन करू लागलो अन् अवघ्या महाराष्ट्रातून माझ्या या लिखाणाला उदंड प्रतिसाद भेटला. अनेकांनी या माझ्या थोडक्यात पुस्तक परिचय करून देण्याच्या कल्पनेचे स्वागत केले आणि अश्या पद्धतीने पुढे मला महाराष्ट्र भरातून अनेक लेखकांचे पुस्तकं अभिप्रायार्थ भेट म्हणून येऊ लागले. मी ही वेळोवेळी या पुस्तकांच्या बाबतीत मला काय वाटले हे पुस्तक वाचून लिहू लागलो. 

खऱ्या अर्थाने मग अश्या प्रकारे माझा हा पुस्तक वाचनाचा प्रवास सुरू झाला. चालू वर्षात या माध्यमातून मी बऱ्याच पुस्तकांना वाचले आणि यातील अनेक पुस्तकांचे परीक्षण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ब्लॉग माध्यमातून मांडले. या ब्लॉगच्या माध्यमातून माझे हे पुस्तक परीक्षण देश-विदेशातील अनेक मराठी वाचकांपर्यंत मी पोहचू शकलो.

अश्यावेळी मनात हे ही येऊन गेलं की मराठी वाचन चळवळ वाढविण्यासाठी या प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो, त्या दिशेनं मग मी पावलं टाकण्यास सुरुवात केली.

या माध्यमातून आजच्या नवख्या वाचक वर्गाला नेमकं काय वाचावं..? वाचनाची सुरुवात कोणत्या पुस्तकांपासून करावी..? हे कळण्यासाठी मदत होऊ लागली. अश्या प्रकारे माझ्या पुस्तक परीक्षणातून असंख्य तरुण वाचक वर्गाशी मी जोडल्या गेलो.

ज्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली अन् या माझ्या वाचनाच्या प्रवासात माझ्यासारखे असंख्य तरुण वाचन करू लागले. यातील अनेकजण वेळोवेळी संबंधित विषयाला घेऊन माझ्याशी बोलू लागले.

अजून बरच काही आहे, निवांत शेअर करेल कधीतरी..!

असा हा थोडक्यात माझा वाचनप्रवास.

अलीकडे वाचलेली काही पुस्तके :

मुसाफिर, माळझरे, मदर - मॅक्झिम गोर्की, रुटस्, साखळीचं स्वतंत्र, सॅक्सोफोन वरातीत वाजवायचं वाद्य नव्हे, प्रांजल, शरणागत प्रपत्ती, हॉप इज द थिंग - एमिली डीकींन्सन, अॅडम, अलकेमिस्ट, जननायक तंट्या भिल, लज्जा-तस्लिमा नसरीन,लेटर्स फ्रोम जेल ,जहं जहं चरण पडे गौतम के - तिक न्यात हन्ह, बनगरवाडी, गाफील, टारफुला, अमृतवेल, माझी जन्मठेप, साद सागराची, फकिरा, रानसोबती, मलाला, तीन शिल्पकार, प्रिन्सेस डायना, कोल्हट्याचं पोर, मला उध्वस्थ व्हायचंय, शेतकऱ्याचा आसूड, एक होता कार्व्हर, केशवसुतांची कविता, अग्नीपंख, आक्रात आरक्षण आणि विक्रांत योद्धा, संमेलनाच्या मांडवाखालून, तैपी,चौदा पत्रे,द कलर पर्पल इत्यादी पुस्तके गेल्या काही दिवसांत वाचलेली आहेत.

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...