पोलीस भरती अन् बरच काही..!
मला माहितीये हा लेख कुठलेही वृत्तपत्र प्रसिध्द करणार नाही, त्यामुळे इथे देतोय.
एक आवाहन सरकारला..!
काल सायंकाळची गोष्ट खूप दिवसानंतर माझ्या तालुक्याच्या गावाला गेलो असल्यानं माझ्या जून्या मित्रांची भेट झाली. हल्ली शहरात माझ्या वयाच्या मुलांमध्ये साधारण तीन-चार वर्षानंतर आलेल्या पोलीस भरती, अग्निपथ योजनेतून अग्नीवीर भरतीतून भारतीय सैन्य दलात भरती, केंद्रीय,राज्य पातळीवर निम लष्करी दलातून होणारी भरती आणि महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक भरती होण्याच्या ध्येयाने शहरातील बहुतांश मुलं भरतीच्या तयारीला लागली आहे.
जसजशी भरती जवळ येत आहे, तसतसे तरुणांची ही संख्या वाढत आहे. शहरातील सर्व छोटी-मोठी मैदाने तरुणांच्या गर्दीने फुलून गेली आहे. सर्वजण जीव तोडून सराव करता आहेत. पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत १८,००० जागांसाठी जवळजवळ वीस लाख फॉर्म मुलांनी भरले आहे. त्यामुळं यावर्षी इतक्या मोठ्या पदांची भरती असूनही चांगलीच स्पर्धा असणार आहे.
याऊपर खेडे गावातील मुलांची अवस्था तर खूप वाईट अशी आहे. खूप संघर्ष त्यांना भरती होण्यासाठी करावा लागत आहे. आज गावी येत असताना रस्त्याने येताना बरेच भावी पोलिस, सैनिक मैदानी सराव करतांना दिसलीत. खेडे गावावरची ती मुलं त्यांना लाखोंनी पैसे भरुन नोकऱ्या मिळवणं शक्य नसतं. म्हणुन बिचारे राञंदीवस ही अशी मेहनत घेत असतात.
रस्त्यांनी ५-६ कीमी रोज सकाळ-संध्याकाळ पळतात. का तर यांना शासनाने गावात कुठलीही सुविधा त्यांच्यासाठी केलेली नसते. व्यायाम शाळा, मोकळं मैदान नसते पण ते मुलं ध्येयवेडे असतात वर्दीसाठी, देशाच्या सेवेसाठी.
यांच्याकडे फारस कुणी लक्ष देत नाही, गावातली अतिहुशार लोकं यांना टूकार,वाया गेलेली मुलं समजतात. असो इतकं काही असुनही ही मुलं पुर्णपणे मेहनत घेतात,भरतीला जातात.
आज भेटलेल्या अश्याच तरुण मित्रांनी त्यांच्याबद्दल,त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल थोडेसे लिहायला लावले म्हणून हा लेख.
अपेक्षा काहीच नव्हती त्यांची, परंतु पुढे जे काही मांडले आहे त्या गोष्टींचा सरकारने विचार करावे इतकंच.
भरती करणारी बहुतांश मुलं ही गरिब घरातील असल्यामुळे भरतीला जातांना सोबत जेमतेमच पैसे असतात. ३००-४०० कीमी प्रवास करून मुलं मैदानी चाचणीसाठी ज्या शहरात असते तिथे जातात, तिथे ऐन भरतीच्या दिवशी पोहचणे अवघड असते. त्यामुळे आदीच्या दिवशी ही मुलं त्या ठिकाणी जातात.
अश्यावेळी त्यांना तिथे राहण्याची कुठलीही सोय नसते. ऐनवेळी मग जिथं घटकाभरचा आसरा भेटल तिथं ही मुलं वृत्तपत्रावर झोपून रात्र काढतात. कुणी रेल्वे स्टेशनवर तर कुणी एसटी स्टँडवर तर कुणी रस्त्याच्या कडेला जिथं आसरा भेटल तिथं ही मुलं झोपून जातात.
अश्यावेळी लाखोंच्या गर्दीत त्यांचे कागदपञे हरवतात, पुरेसा न भेटलेला आराम, अपुरे जेवन, प्रवासामुळे आलेला थकवा यांमुळे प्रचंड मेहनत घेउनही अनेकजण फक्त वेळीच न भेटलेल्या आरामामुळे मैदानावर मैदानी चाचणीत अपात्र ठरतात.
त्यांच्या पदरी घोर निराशा पडते, दोन-तीन वर्ष केलेली अफाट ढोरमेहनत चुटकी सरशी बेकार ठरते.
सांगायचा उद्देश हाच की, सरकाराने याची दखल घ्यावी.
पुढे काही महिन्याभरात पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणारा आहे. त्यावेळी भरती होणाऱ्या शहरांमध्ये या तरूणांची कमीतकमी त्यांना मैदानी चाचणी ज्या ठिकाणी होणार आहे अश्या ठिकाणी बस स्थानकांपासून, रेल्वे स्टेशनपासून सिटी बसच्या माध्यमातून सोडण्याची, रहाण्याची,जेवनाची तरी व्यवस्था असावी.
कारण हे तरुण भावी पोलिस, सैनिक होऊन देशसेवा करणार आहे. हे सर्व मी स्वतः अनुभवलं आहे.सोबतच माझ्यासोबत माझ्या पिढीच्या लाखो तरुणांनी अनुभवलं आहे.
त्यामुळे यावेळी होणाऱ्या भरतीच्या वेळेस सरकारने या वरील बाबींचा विचार करून या तरुण मुलांची मदत करावी. जेणेकरून हीच उद्याची भावी पिढी जी सीमेवर आपल्या देशाचं संरक्षण करणार आहे तिची मदत होईल.
जय हिंद..!
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा