मुख्य सामग्रीवर वगळा

पोटाला पडणारा पीळ..!

पोटाला पडणारा पीळ..!

हल्ली मनात असंख्य गोष्टींचा माजलेला कोलाहाल बघितला की, अस्वस्थ व्हायला होतं. मग नकळत कधीतरी वाटतं की माणसांच्या सहवासातून मुक्त होऊन, आपण आपल्याला पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला स्वाधीन करून द्यावं,झोकून द्यावं.

कारण आजवर निसर्गानं तगतं ठेवलं, जीवंत ठेवलं आहे. अन् त्याच्या सान्निध्यात असलं की मला माणसांचा सहवास नकोसा वाटतो.

कालची सायंकाळ क्लास सुटला अन् हॉस्टेलच्या दिशेनं निघालो. हल्ली एकटाच असतो, त्यामुळं स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहता येऊ लागलं आहे. मनाचं मालक असावं तसं जगता येतय.

मनाचा मालक म्हणजे मला नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात एकाकी राहून, एकाकी निसर्ग अनुभवण्यास जवळचं वाटत आलं आहे. जे नॉर्मल माणसांना रुचणारं नाहीये. मग अश्यावेळी कुणी सोबत असलं की, माझं आयुष्य जगण्याचं मी आखलेले गणित चुकायला लागतं. त्यामुळं असं एकटं एकटं राहणं पसंद करतो.

निसर्ग असला की फारसं कुणी जवळ करायला आवडत नाही मला. अनेक मित्रांनी हे हेरलं आहे. त्यामुळं ते ही जाणूनबुजून दूरच राहता. कारण या जगण्यात या कैफात सुख आहे, याची अनुभूती त्यांना कित्येकदा माझ्या समवेत आली. पण; त्यांचं मन इथ फार रमलं नाही. त्यांना व्यवहारीक जग, माणसांचं पशू होऊन जगणं जवळचं वाटलं.
मग त्यांनी माझ्या या वाटेवर चालणं सोडून दिलं, जे योग्य झालं. कारण तारेवरची कसरत करणं तसं जगणं सहज, सोप्पं नाही.

सायंकाळी क्लास सुटला आभाळ गरजू लागलं, अंधारून आलं. या गरजत्या आभाळाखाली असलेल्या एका बोडख्या बाभळीखाली असलेल्या एका बँचवर किती वेळ बसून राहिलो भरकटत जाणाऱ्या ढगांकडे बघत.

माणसं निवाऱ्याला निघून गेली होती अन् आता तो बरसण्यास उत्सुक होता. सभोवताली असलेली तीन कुत्रे गरजत्या आभाळाखाली खेळत होती. त्यांनी माणसांसारखं जगणं स्वीकारलं असावं कारण त्यांच्या जगण्यात कुठं पशू होऊन जगण्याचा लवलेश दिसला नाही.

दूरवर पाऊस बरसू लागला, जसा तो जवळ येऊ लागला तसा मी माणसात आलो. ते तीन कुत्रे आसऱ्याला म्हणून एका कंपाऊंडमध्ये शिरली. मी एका अंधाऱ्या गल्लीत खूप आतवर गेलो. 
इंग्रजांच्या काळातील एक जुनाट, काळवंडलेलं हॉटेल दिसलं इथे येणं नेहमी होतं.

पण इथे आलं की मी भूतकाळाचा होतो म्हणून वर्तमानात या हॉटेलचं फारसं लक्ष नसतं. हॉटेलमध्ये आलो बॅसीनमध्ये आरशात बघत हात धुतले. रापलेल्या चेहऱ्याचा एक इसम बिडी फुंकत माझ्या जवळून निघून गेला.
डोक्यात गेला पण विचार केला त्याचीही जगण्याची स्वतंत्र रीत असावी म्हणून हसून जाऊ दिलं. क्षणीक वेळात हा विचार मनात येऊन जाणं म्हणजे मी अजून माणसात आहे याची मलाच पोचपावती मिळाली असं काहीसं होतं. अधूनमधून हे होतं जे आनंद देणारं आहे.

काळोखात टेबल सापडत एका खुर्चीवर विसावलो. लाकडी खुर्ची, तीन गिल्लास, एक मोठा पाच गल्लास भरेल एव्हढा जग अन् समोर लंडन मधल्या कुठल्या ब्रीजचे पोस्टर चीपकवलेले होते. ते बघून मी त्यात माणसं न्याहाळू लागलो.

पुन्हा एक इसम आला माझी दीड कप चहा अन् तीन बनमस्का पावची ऑर्डर घेऊन गेला. चहा उंचावत कपात वरून टाकली अन् माझ्यासमोर आदळून पाव ठेऊन पुढे असलेल्यांना दोन भज्याच्या प्लेट ठेऊन निघून गेला.

अंधारात काय खात असतील हा प्रश्न पडला पण; नंतर कळलं की औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठ्या कंपनीत काम करणारी कंत्राटी कर्मचारी इथे कंपनीचं जेवण पैश्यात परवडत नाही म्हणून इथल्या नाशत्यावर भागवता. पोटाला पिळ देऊन आठ तास काम केलं  की साडे-तीनशे रुपये रोज येतो असं भजे खाणाऱ्या इसमाकडून कळलं. 

मी चहात पाव बुडून आजचा दिवस उद्यावर ढकलत होतो. तितक्यात पाऊस गरजू लागला, पडू लागला. मी लंडनमधील तो ब्रीज बघत उद्याचं वर्तमान नसलेलं स्वप्न बघत चहा पाव माझ्या आत रिचवत राहीलो.

Written by
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...