कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष..!
फ्लॅटमध्ये पाच कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे आम्ही कामगार मित्र असल्यानं, आठवडाभर एका फ्लॅटमध्ये असूनही एकमेकांना भेटायला वेळ नसते. आज तिघे लोळत पडलो होतो अन् दोघे पहाटेच उठून टपरीवर चहा सिगरेट प्यायला म्हणून निघून गेली होती.
कॉटवर पडल्या पडल्या मी शरीराला आळोखे-पिळोखे देत लोळत पडलो होतो, आज सगळेच रूमवर असल्यानं रूममध्ये दीड किलोचे पाच सेफ्टी शूजचे जोड होते. त्याचे आठवडाभर उन्हाळ्यात पायाला घाम येतो म्हणून साचलेले दहा सोक्सचे जोड मी झोपलो त्याच्या बाजूलाच पडले होते.
वाऱ्याच्या झुळकेसरशी तो सोक्सचा आंबट वास माझ्यापर्यंत आला अन् मी ताडकन उठून माझ्या फ्लॅट पार्टनरच्या आई बहिणींचा उद्दार केला. भेंचोद आजची पहाट किरकिरीने सुरू झाली होती.
उठलो तसा सॉक्स निरम्यात भीजू घातले अन् मी अंघोळीला निघून गेलो. पाच रुपयांची गरम पाण्याची बकेट परवडत नाही म्हणून हटकून जरा लेटच उठलो होतो. उन्हामुळे टाकीतले पाणी चांगलेच तापले होते, दोन बादल्या पाणी घेऊन घंटाभर अंघोळ केली. मस्त फ्रेश होऊन मित्राला घेऊन भटकायला म्हणून बाहेर पडलो.
सोबतीने कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे काही मित्र कामगार चौकात भेटली. दहात पंधरा कटिंग चहा झाल्या. सिगरेट घेत नाही म्हणून त्याचा हिशोब नव्हता, दोघात एक पार्ले घेऊन चहा सोबत खात बसलो. सिगरेट घेत नाही म्हणून एक फायदा होतो, आमचे बील कधीतरी ही चैन करणारी पोरच भरून देतात.
सहा घोटांचा चहा अर्धा घंटा कपात हलवून हलवून नरड्याच्या खाली ओतल्यावर जरासं बरं वाटलं. मुलांच्या कंपनीतल्या गप्पा चालू होत्या, कुणाच्या खूपच सिक्रेट अश्या असाव्या अश्या एका वेगळ्या ग्रुपमध्ये गप्पा चालू होत्या.
काही कॉलेजमधल्या टवाळक्या मारणाऱ्या पोरांचा ग्रुप आला. बापाच्या पैशावर मजा करणारी ही पोरं रोजच इथे पडीक असल्यानं चांगलीच ओळखीची झाली आहे. गौतमी पाटीलच्या कालच्या व्हायरल व्हिडिओच्या गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या.
मला काही या फालतू गोष्टीत रस नसल्यानं मित्रांना "जय शरनाथ" करून आम्ही दोघे मित्र पैठण गेटचा चोर बाजार भटकून आलो. पन्नास रुपयाचे दोन-चार टी-शर्ट, पन्नास रुपयाच्या पाच सिल्पर अन् भंगाराच्या भावात भेटलेले एक कुलूप फ्लॅटला लावायला म्हणून घेऊन आलो.
रद्दीच्या भावात दोन-चार कुठलेसे पुस्तकं ऐंशी रुपयाची चार घेऊन आलो. मुखपृष्ठ छान वाटलं अन् पसंत केलं इतकंच, पुस्तकांशी कुठं आपल्याला लग्न करायचं होतं. त्यांचं त्याच गोष्टीसारखं होतं एकदा वाचलं की अडगळीत पडलेलं राहतं कुठेतरी.
पण; अलीकडे त्यांच्यासाठी चोर बाजारात भंगाराच्या दुकानात एक रॅक सांगून ठेवलं आहे. स्वस्तात पन्नास शंभर रुपयांत बसलं तर घेऊन येईल फ्लॅटवर. पण; रात्रीचं चोरासारखं आणावा लागल फ्लॅट मालक लई बारबाप्या आहे, चोर बाजारातील वस्तू आणायला नाही म्हणतो.
आम्हाला कुठं परवडणार आहे मार्केटमधल्या महागाच्या वस्तू,मग आणत असतो.
खरेदी झाली, तिघात दोन भेळ खाल्या, तिघात दोन समोसा रगडा, तीन पाणीपुरी खाऊन आम्ही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मेसवर गेलो. भूक नसल्यानं एकच डब्बा घेतला अन् रूमवर येऊन खाऊन घेतला. मित्राने सकाळी शिव्या ऐकल्या अन् त्यान रूम झाडून स्वच्छ करून सॉक्स धुऊन दोरीवर वाळत घालून दिले होते.
पुन्हा कामगार चौकात चक्कर मारून आलो. चणे फुटाणे, खारे शेंगदाणे खात गप्पा झोडीत बसलो. मगाशी येऊन सकाळी आणलेल्या पुस्तकांना न्याहाळत एक पुस्तक संपते त्या बाजूने उलटे वाचायला सुरू केलं. दोघे मित्र गर्लफ्रेंडशी गप्पा मारताय कॉलवर, एक घरच्यांशी बोलतोय, एक अभ्यास करतोय अन् एक झोपून गेला.
मी ही डोळे लागायला लागले तसं पुस्तक बाजूला ठेऊन कॉफी घेत हे टाईप करत बसलो आहे..!
क्रमशः
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा