उसवत्या सांजवेळी भेटलेला "बाप"
बाप वारला तेव्हा त्याच्या दहाव्याला अन् पुढे त्याचा एक फोटो घरात असावा म्हणून एक फोटो फ्रेम करून घ्यावा म्हणून बापाचा घरात फोटो सापडू लागलो. एरव्ही बापाला फोटो काढायची भयंकर हौस पण तो वारल्यावर त्याचा एकही फोटो घरात नव्हता.
अखेर बापाच्या टू-व्हीलरच्या लायसनवर असलेला फोटो कसातरी मोठा करून त्याची एक फ्रेम करून घेतली. सर्व विधी पार पडले अन् तो फोटो घरात एकाकी पडून राहीला.
कारणे दोन होती त्या फोटोत असणारा बाप मला कधी रुचला नाही. कारण शेवटच्या घटका मोजताना आजारपणामुळे तो शरीरातून पार खंगून गेला होता त्यामुळं त्याचा तो ताजातवान फोटो मला किंवा घरातल्या कुणालाही कधी बापाचा असेल वाटला नाही.
कारण आमच्या लक्षात तोच बाप राहिला जो शेवटच्या घटका मोजतांना आम्ही बघितला होता. खूप त्रास होत असतांना माझ्यानंतर मुलांचं काय अन् या विचारांनी कळवळणारा बाप जेव्हा आठवतो, तेव्हा फोटोतील बाप आपला नाहीच असं वाटून जातं.
असो तर काही दिवसांपूर्वी असच मला स्केच, पेंटींग फोटो संग्रही करण्याचं वेड असल्यानं, बऱ्याच आर्टिस्टचे त्यांनी जीव ओतून रेखाटलेले फोटो मी संग्रही करून ठेवले आहे.
एकदा असेच एक आवडलेला स्केच मी माझ्या फेसबूक टाईमलाईनवर पोस्ट केला. ते कुणी रेखाटला आहे हे माहीत नव्हतं अन् मी त्या नावाच्या शोधार्थ होतोही. पुढे माझ्या मित्र यादीतील आर्टिस्ट चारुद्दत पांडे यांनी मला सांगितले की, ते स्केच पाँडिचेरी स्थित आर्टिस्ट राजकुमार स्तबथी यांनी काढले आहे.
मग काय त्यांच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर गेलो त्यांची चित्र रेखाटण्याची शैली, विषय हे सगळं मला खूप जवळचं वाटलं.
ज्यात कित्येक चित्रं बघितल्यानंतर एकाकीच मला हे स्केच मिळालं. अगदी माझ्या बापाच्या शेवटच्या घटका मोजतांना असलेल्या अवस्थेची हे आठवण करून देणारं अन् हुबेहूब माझ्या बापाचं स्केच असावं इतकं ते मिळतं जुळते आहे.
कधी कधी तर वाटूनही जात वडील जेव्हा आजरपणात होते तेव्हा राजकुमार स्तबथी यांनी वडीलांना कुठे बघितलं असावं अन् त्यांचं हे स्केच रेखाटलं असावं.
पुढे हे स्केच अनेकदा खरेदी करण्याचं डोक्यात येऊन गेलं पण का माहित नाही हिम्मत झाली नाही. गेले दोन-तीन वर्ष हे स्केच माझ्या मोबाईलमध्ये आहे. या स्केच माध्यमातून मला माझा सोडून गेलेला बाप भेटत असतो.
अनेकदा वाटलं की आर्टिस्ट राजकुमार स्तबथी यांना हे कळवावं अन् हे स्केच त्यांच्याकडून मिळवावं पण मनात हा ही विचार येऊन गेला त्या आर्टिस्टचं या फोटोशी काही भावनिक नातं असल तर...
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा