रेड लाईट डायरीज..!
खुलूस..!
लेखक "समीर गायकवाड" (बापू) यांचे "खुलूस" काल सायंकाळी हाती पडले अन् रात्री अकरा वाचता खुलूससोबत वाचनाचा सुरू झालेला प्रवास अखेर रात्री तीन वाजता संपला.
"खुलूस" वाचून झालं तेव्हा झालेली अवस्था शब्दात व्यक्त करू शकणार नाही अशी झाली होती. लहानपणापासून परिस्थितीची झळ बसलेल्या माझ्यासारख्यांना "खुलूस" जवळची वाटते. सोबत तितकीच ती सांभाळून घेते, त्यामुळं हे सगळं जग थोड्याफार फरकाने ओळखीचं होतं.
काही दिवसांपूर्वी "वैशाली हळदणकर" यांचे "बारबाला" हे पुस्तक वाचून संपवलं. तेव्हाही अशीच काही अवस्था झाली होती.
बारबालामधील वैशालीचं आयुष्य काही वेगळं नाही, तिच्या आयुष्यातील संघर्ष तसाच आणि तितकाच वाईट्ट आहे, जितका खुलूसमधील प्रत्येक माझ्या त्या बहिणीचा आहे.
फरक इतकाच की आजही आयुष्याच्या या वळणावर वैशाली मला भेटत असते, तिच्याशी महीन-पंधरा दिवस झाले की बोलणं होतं. खंत एकच वाटते की, तिला अजून न्याय मिळाला नाहीये. अजूनही ती जगण्यासाठीचा संघर्ष करतेय.
बारबालामधील वैशाली असो किंवा रेड लाईट एरियातील हिराबाई, अमिना, जस्मिन यांच्या जगण्याच्या व्यथा काही किंवा त्यांच्या जगण्यातील संघर्ष काही वेगळा नाही.
याहीपुढे याचं आधुनिकीकरण होऊन सुरू झालेला व्यवसाय म्हणजे "एस्कॉर्ट सर्व्हीस" हे विश्व काही वेगळं नाही. फक्त इथे सगळं कसं चकचकीत अन् पॉलिश भासावं असं काही असतं.
गेले काही वर्ष "एस्कॉर्ट" अन् त्यांचं विश्व यावर लिखाणाचा विचार करतोय. त्या दिशेनं कधीच प्रयत्न सुरू झाले. कित्येकीं/कांच्या गुपित भेटी झाल्या. हे रंगीबेरंगी विश्व, रोजची होणारी लाखो, करोडोंची उलाढाल, ऑनलाईन माध्यमातून होणारी ओळख.
हे सगळं खूप म्हणजे ओशिएनमध्ये खूप डीपपर्यंत जाऊन उजेड शोधण्यासारखे आहे.
तूर्त इतकंच..!
हा सगळा संघर्ष अन् या व्यक्तींनी जे काही सोसलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी "खुलूस" वाचायला हवं. कारण हा प्रवास लिखाणात कैद होण्यासाठी कित्येक वर्ष समीर गायकवाड (बापू) यांनी हे जग समजून, जाणून घेतलं. अन्; पुढं आपलं उभं आयुष्य या व्यवसायात आलेल्या किंवा बळजबरी आणलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील जखमांवर फुंकर घालण्याचं काम लेखकांनी केलं आहे.
तेव्हा प्रत्येक त्या व्यक्तीनं "खुलूस" वाचायला हवं, ज्याच्या आत माणूसपणाची जाणीव जीवंत आहे.
रेडलाइट एरिया म्हटलं की अनेकांची नाकं मुरडत जातात...
कुलटा, कीटाळ, वेश्या, रंडी असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं.
पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशीबी काय येतं...
दुःख - दैन्य आणि नरकासम भोगवटा!
अशी अनेक आयुष्य जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे.
त्यांना या स्त्रियांची घुसमट,
त्यांच्या इच्छा - आकांक्षा,
त्यांची परिस्थिती - शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.
खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा...
या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने
चितारणारं हे पुस्तक..!
रेड लाईट डायरीज..!
खुलूस..!
Written by,
Bharat Sonawane .
सुंदर शब्दांकन...
उत्तर द्याहटवा