प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!
पर्यायही नव्हता, रात्रभर येणारी दुसरी ट्रेनही नव्हती. मनाची समजूत घातली अन् आज जनरल डब्ब्याचा प्रवास अनुभवू म्हणून मी ही मग जनरल डब्ब्यात घुसलो. डब्ब्यात घुसलो तसे युपी बिहारचे काही माणसं बाथरूमच्या दाराजवळ बसून प्रवास करत होते. आत पूर्ण डब्बा प्रवाश्यानी भरलेला असल्यानं मध्येही जागा नव्हती.
युपी बिहारच्या त्या सात-आठ मित्रांशी गप्पा करत मी उभाच प्रवास करू लागलो, तेही अडचणीत दाटीवाटी करून बसलेले होते. थंडी, वाऱ्यापासून अडोसा असं काहीही नव्हतं अन् अश्या वातावरणात ते मागील सहा तासांपासून प्रवास करत होते.
त्या एकमेव जनरल डब्ब्यात एकमेव बाथरूम असल्यानं बाथरूमला येणारी जाणारी स्त्री पुरुष सर्व तिथून जात. त्या बाथरूमच्या ओल्या चपला त्यांना ओलांडून पुन्हा डब्यात येणं पण कुठलाही वादविवाद न करता डब्याच्या आतील आणि बाहेरील सर्वांचा प्रवास चालू होता.
दौंड आलं तसं काही प्रवाशी उतरले आणि मी त्या युपी बिहारच्या मित्रांपासून जरा आत डब्ब्यात आलो. आता जरा थंडी वारा लागत नव्हता पण; अजूनही सत्तर-ऐंशी प्रवाशांच्या या डब्ब्यात आम्ही पाच-सहा तरुण मुलं उभे राहून प्रवास करत होतो. पाच-पन्नास किमी पुढे आलो असेल तशी सर्वांची ओळख असल्यासारखे मी सगळ्यांच्यामध्ये मिक्स झालो.
ट्रेन थांबली अन् पुन्हा पाच-सहा जण प्रवाशी डब्ब्यात बसले माझं बोलणं, ऑफिशियल राहणीमान, भाषेचा टोन बघून डब्ब्यातील तिशी-पस्तीशितील दोघी स्त्रिया आणि एका म्हाताऱ्या आज्जीने मला त्यांच्या सीटवर जागा करून दिली.
त्यातील आजी झोप येतेय असं कारण सांगून माझ्या सिटाच्या खाली जाऊन झोपल्या. हे सगळं विचित्र वाटत होतं पण असेच दोन तीन पुरुष,काही स्त्रिया,काही तरुण मुलं सिटाच्या खालच्या,वरच्या जागेत झोपले होते.
काही वरती असलेल्या सीटवर प्रवास करत होते, बारा-एकच्या दरम्यान डब्ब्यातील बरेच प्रवासी उतरले आणि आता बऱ्यापैकी मोकळी जागा म्हणजे व्यवस्थित बसता येईल अशी जागा झाली.
तिशीतील दोघी स्त्रिया अन् त्यातील एकीचे दोन्ही भाऊ आमच्यात छान गप्पा रंगल्या. कोण, कुठले, काय करता असं सगळं आम्ही एकमेकांना विचारून घेतलं. दोघीतील एका स्त्रीचे एक आठ वर्षांची मुलगी अन् एक अकरा वर्षांचा मुलगा दोघे माझ्याजवळ येऊन बसले आणि गप्पा करत बसले.
पुण्यात शिक्षणासाठी त्यांचे आईवडील त्यांना घेऊन आलेले होते अन् छान पुणेरी टोनमध्ये ती मुलं माझ्याशी गप्पा करत होती. काही दिवस सलग सुट्ट्या असल्यानं ती मुलं त्यांच्या आई समवेत त्यांच्या आजोळी गडचिरोलीला निघाले होते.
आमच्या गप्पा चालू होत्या या गप्पांच्या दरम्यान ती तिशीतली दुसरी स्त्री अन् तिचे दोन्ही भाऊ झोपी गेले. तेही मी जिथे उतरणार होतो तिथे उतरणार होते, त्यामुळं मी त्यांना निवांत झोपा सांगून गप्पा मारत बसलो. जराशी गर्दी कमी झाली तसे त्या मुलांच्या आईला मी आमच्या सीटवर बोलवून घेतलं अन् आम्ही चौघे एका सीटवर बसून गप्पा करत राहिलो.
तेही सात ते आठ तासांचा प्रवास करत असल्यानं थकले होते पण मुलं मात्र गप्पा मारत होते. मलाही झोप येत नव्हती. हळू हळू डब्यातील सर्व प्रवासी झोपले, कुण्या स्टेशनवर अजून काही स्त्रिया अन् त्यांच्या समवेत काही माणसं डब्ब्यात चढली. त्यांना खूप वेळाने जागा भेटली मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलो.
मुलांची आई प्रवासाने थकली असल्यानं केव्हाच माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपी गेली होती,उठावे तर तिला योग्य वाटणार नाही, म्हणून मी ही नवीन आलेल्या प्रवाश्यांशी,तिच्या मुलामुलीशी गप्पा मारत बसलो. दोनेक तासांनी तिला जागा आली तिचं माझ्या खांद्यावरील डोकं बघून ती लाजल्यागत झाली. तिची मुलंही तिला हसायला लागली,तिनं मला चोरट्या नजरेने बघत हळूच सॉरी म्हंटले.
मी ही काय म्हणणार होतो हसलो अन् इट्स ओके म्हणून त्यांना निवांत झोपायला इशारा केला. मुलांच्या आमच्या बऱ्याच गप्पा चालू होत्या. पहाटेचे सहा वाजले तसं माझ्यासोबत उतरणारे ते दोघे तरुण मुलं ती स्त्री उठले.
पंधरा-वीस मिनिटांत आमचं स्टेशन आलं, आम्ही चौघे उतरलो. ती लहानगी मुलं मला डब्ब्यातून बाहेर सोडायला आली, त्यांना दोन बिस्कीट पुडे घेऊन दिली अन् ट्रेन निघायला लागली तेव्हा आमच्या गप्पा आवरत्या घेत बाय केलं.
ट्रेन निघाली तेव्हा ती दोन्ही लहानगे, त्यांची आई डोक्यावरचा पदर सावरत मला दूरवर जास्तोवर बाय करत राहिली. मी ही त्यांना बाय करत राहिलो, त्या दिवशी दुपारी चार वाजता ते त्यांच्या आजोळी पोहचणार होते.
माझ्या सहवासात खुश होते ते सर्व अन् मी ही त्यांच्या.
आम्ही चौघांनी चहा घेतला अन् तेही पुढच्या प्रवासाला निघून गेली. आता मात्र हातातून बरच काही सुटून गेल्याची जाणीव होत होती.
पुढे दोन तास बसमध्ये मी प्रवास करत होतो, एकटा होतो सर्व प्रवाशी असूनही...!
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा