मुख्य सामग्रीवर वगळा

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..!

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान..!


भर दुपारची वेळ भर उन्हात दीड वाजता सेकंड शिफ्टसाठी जाण्याची तयारी करतोय. इतक्या कडक उन्हात पातळ, पतली भाजी खायला नको वाटते अन् कोरडी भाजी असली की जसं जोमाने दीड-दोन पोळ्या नरड्याच्या आत कोंबल्या जातात तसे काही करून जेवण आवरते घेऊन, मळकटलेल्या चादरीच्या कॉटवर पडून राहीलो आहे.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचं गणित खूप सोप्पं असतं. कारण त्यांच्या आयुष्यात फार काही बदल होत नसतात. घड्याळीच्या काट्यावर फर्स्ट, सेकंड, थर्ड करत त्यांचं आयुष्य चालू असतं.

सगळं व्यवस्थित चालू असलं की कसं बाईचं पाळी चक्र दर महिन्याला फिरत राहते अन् काही घडवून यायचं, आणायचं असलं की नऊ महिने नऊ दिवस एक जीव पोटात वाढवला जातो. तसंच काहीसं सगळं जुळून आलं की नऊ महिने कंत्राटी पद्धतीने ही कामगार माणसं एका कंपनीत काम करत राहतात.

मग जसं बाई मोकळी होते, तसं पुन्हा मोकळं व्हायचं. दोन महिने परत याच्या खाली त्याच्या खाली करत काम मिळवायचं. दोन महिने झाले की पुन्हा नऊ महिने, सहा महिने हे चक्र चालू असतं. जोवर हातपाय काम करत असतात किंवा तसं सुपरवायझरला वाटत असतं तोवर. एकदा हे वाटणं बंद झालं की वेश्यावस्तीत जशी एका उतरत्या वयात आलेल्या बाईची अवस्था होते तशी इथल्या कामगाराची अवस्था होते.

फरक इतकाच ती भटकत राहते गिऱ्हाईकांच्या सोयीनुसार अन् तो भटकत राहतो बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीत भोक पडलेलं गोणपाट घेऊन मळकटलेले कपडे घालून, वाढलेले दाढीचे खुंट, अन् मानेवर आलेल्या केसांना घेऊन भंगार जमा करत. बंद पडलेली औद्योगिक वसाहत तितकीच बेसूर भासत असते जितकं त्याचं जगणं असतं. 

एकीकडे यंत्रांची घरघर चालू असते, वेळेवर वसाहतीत भोंगे वाजत राहतात, स्फोट होत राहतात कित्येकजण जगण्यासाठी त्या आगीत पोळत राहतात अन् कित्येकजण हळूहळू रोज या भोंग्याच्या आवाजावर हळूहळू मरत राहतात. 

भकास,बकाल आयुष्य काय असावं तर हे असं. इतकं भयाण असावं का..? असं अनेकजण मला विचारून जातात. एखाददोन महिने हे यंत्रांच्या बटणावर चालणारं यंत्रवत आयुष्य जगून बघितलं की प्रचिती आपोआपच येते.

एकदा असं सहज इंटरवह्यूमध्ये बोलून गेलो होतो जे खरं होतं की शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षापेक्षा कंत्राटी कामगारांच्या वाट्याला आलेला संघर्ष किंचित जास्तच असतो. समोरचा व्यक्ती हसून मोकळा झाला. भर दुपारच्या उन्हात एसीचा गारवा अनुभवणाऱ्या त्या साहेबांना शेतकऱ्याच्या नुकसानीची झळ अन् कंत्राटी कामगारांची आयुष्यभर चालणारी फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टची वारी त्याला कळली असती तर तो इतका कुत्सितपणे हसला नसता अन् आमची हकालपट्टी करून पैसे घेऊन पदावर माणसं भरून घेतली नसती.

असो पर्याय नाहीये आम्ही भटकत राहूत पायाने रांगोळी गिरवत राहूत औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या डांबरी वाटा ढवळ्या करत राहू..!

हे सगळं कसं मोकाट वाटणारं लिखाण भासत असावं पण; या जगण्याला सीमा नाहीये, तितकंच मोकाट हे आयुष्य आहे. फुकट नाही आयुष्याच्या शेवट हातावर मोजण्या इतपत लोकं सुस्थितीत जगतात कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार.

असो आयुष्य आहे, मग काम आलं अन् काम आलं म्हणजे औद्योगिक वसाहत आली, दीड किलोचा सेफ्टी शूज आला. महिन्याच्या अखेरीस पगार झाला की दोन जोडी सॉक्स न घेऊ शकणारे कंत्राटी कामगार मी बघितले आहे. पर्याय नाहीये, जितकं दिसतं तितकं सर्व स्मार्ट नाहीये हे सगळं. चकपक दिसते, पंचतारांकित औद्योगिक वसाहत दिसते.

मर्सिडीज,फॉर्चूनर,होंडा सिटी,अमक्या धमक्या पॉश गाड्या कंपनीच्या आत दिसतात, कंपनीच्या गेट बाहेर गेटर आलेल्या टायराच्या सायकली, ऑईलसील फुटलेल्या, पन्नासचं पेट्रोल टाकीत असलेल्या टूव्हीलर बघितल्या की हे चकाचक औद्योगिक वसाहतीचं जग कितपत खरं खोटं हे कळून येतं.

बरच काही लिहायला आहे पण फर्स्ट, सेकंड, थर्ड करायचं म्हंटले की उसंत नाहीये अन् उसंत, वेळ असल तरीही आपलीच कैफीयत मांडायला हा काही डोंबाऱ्याचा खेळ नाही. 
लिहल कधीतरी तूर्तच थांबतो..

Written by
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...