मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

पहाटेच्या चारला रानातली लाईन येणार अन् रानात गव्हाला पाणी भरायला म्हणून गावातील लोकं उठून रानाच्या दिशेनं आपलं आवरून सावरून निघाली होती. गावाच्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे गावची तरुण पोरंही सहा वाजता गावच्या फाट्यावर येणारी बस अन् तिचा अंदाज घेत गावच्या सडकीनं निघाली होती.
गावातली काही शेतकरी पहाटेच वावरातला अख्खर साफ करायला, दूध काढायला म्हणून जातांना सडकीने दिसत होती.

कोंबड्याच्या बांगेसरशी सूर्योदय झाला अन् तांबडा पिवळसर सूर्याचा कोवळा प्रकाश साऱ्या पंचक्रोशीवर आला तसे गावाला सोनेरी लकेरीत मडवावे तसं गाव चमचम करू लागले होते. गावातली लगबग सुरू झाली तसं, गावातली म्हातारी माणसं आपलं सकाळचे अंघोळपाणी करून सावता माळ्याच्या देवळात दर्शन करायला म्हणून देवळाकडे निघाले होते.

रामा कुंडूरसुद्धा कोंबड्याच्या बांगेसरशी उठला शिवनामायच्या पात्रात जाऊन अंघोळ करून देवपूजा करून तो लक्षी आईच्या पिंपळ पारावर येऊन बसला संतू अण्णा तलाठी अजून झोपलेले पाहून त्यांना उठवत रामा कुंडूर लक्षी आईच्या पिंपळ पार झाडून घेऊ लागला. 

पस्तीशीत असलेला रामा कुंडूर पहाटे कुणी त्याला बघितलं की विठू माउली त्याच्यात वास करते की काय इतका प्रसन्न तो दिसायचा. पांढरे शुभ्र धोतर घातलेला, कपाळी टिळा लावलेला अन् डोक्यावर गांधी टोपी घातलेला तो दिसला की गावातली चालती लोकं थांबून त्याची विचारपूस करी तोही लोकांची विचारपूस करायचा सारं गाव त्याची बायको त्याला सोडून गेली तसे त्याच्यासाठी हळहळ करत होते. कारण अख्ख्या पंचक्रोशीत रामा कुंडूरसारखं इमानी अन् प्रामाणिक, मनमिळावू असं कुणी नव्हतं त्यामुळं सारं गाव त्याचं गुणगान गायचं.

रामा कुंडूरनं लक्षी आईचा पिंपळ पार झाडला तितक्यात संतू अण्णा तलाठी उठून जवळ असलेल्या तांब्याला नदीच्या अंगाला गेले तेही अंघोळपाणी करून पत्री सुटकेशीत आपला कोरा इस्त्री केलेला ड्रेस काढून त्यांनी घातला अन् ते पारावर बसून राहिले आता कुठे संतू अण्णा तलाठी रुबाबदार तलाठी वाटत होते.

एरवी आठ वाजून गेले होते आज रविवारचा दिवस असल्यानं संतू अण्णा तलाठी यांना शासकीय सुट्टी होती त्यामुळं त्यांना आजच्या दिवसात खोली बघून त्यांचं बस्तान बसवणे होतं.आठ वाजले तसं पारावर गावचे पोलीस पाटील, सरपंच, अन् इतर मान्यवर सदस्य आले अन् त्यांनी गावात नव्यानं शिकाऊ तलाठी म्हणून रुजू झालेल्या संतू अण्णा तलाठी यांचं गावच्या परंपरेनुसार पारावर शाल,श्रीफळ देऊन स्वागत केलं.

तलाठ्याची तात्पुरती राहण्याची व्यवस्था म्हणून गावचे पोलीस पाटील धोंडू अण्णा पाटील यांच्या वाड्यात असलेल्या परसदारच्या खोलीत केली. रामा कुंडूर आणि जगण्या संतू अण्णा तलाठी यांचं सगळं सामान डोईवर घेऊन पोलीस पाटील यांच्या वाड्यावर घेऊन तलाठी अण्णा यांचं तात्पुरते बस्तान त्यांनी थाटून दिले.

संतू अण्णा तलाठी यांचं गावच्या मान्यवर लोकांनी स्वागत केलं. त्यांना गावातली जूनी शाळा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, अश्या सगळ्या जून्या सरकारी इमारती दाखवल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काही दशकाभराने या इमारती उभारल्या गेल्या होत्या, आजही त्या डौलात उभ्या होत्या. 

गावातल्या म्हाताऱ्या लोकांच्या आठवणी असो किंवा तरुण लोकांची सरकारी कामे, शेतीची कामे, गावात कुणी लहानगा जन्माला आला की त्याची नोंद हे सर्व आजही या जुन्या इमारतीमध्ये होत असल्यानं गावाची या इमारतीसोबत अन् इथे सरकारी काम करणाऱ्या सर्व नोकरदारांसोबत नाळ जोडलेली होती.

आजवर गावात संतू अण्णा सारखे कित्येक तलाठी, ग्रामसेवक, इतर अधिकारी अन् कित्येक इतर माणसे येऊन गेली, गावच्या लोकांनी त्यांना घरच्या माणसांसारखे सांभाळले. त्यामुळं अनेक सरकारी नोकरदारांना बदली झाली की गाव सोडताना गहीवरून यायचं.

याला अपवाद काही नोकरदार खोडीचे निघायचे पण गावकरी त्यांनाही आपल्यात सामावून घेत आपलेसे करून आपले काम करून घेत असत. परंतू त्यांच्या बदलीमुळे गावाला सुतुक पडावं किंवा दुःख व्हावं असं काही होत नसे.

हे सगळं गावचे पोलीस पाटील संतू अण्णा तलाठी यांना सांगत असताना गावच्या जून्या बारबाप्या तलाठीचे खुलासे देत सांगत की, तो किती खोडीचा होता. त्यानं कशी कामात दखलांधाजी केली मग गावाने त्याला नकळत वरच्या साहेबांना अर्ज देऊन कशी त्याची बदली करून घेतली.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...