दरवळ..!
हल्ली रोजची सायंकाळ अन् कधी मनाला वाटलं तर भर दुपारही अश्या धावण्याने होत आहे. का धावतो ? कश्यासाठी ? धावून काय भेटते ? या प्रश्नांना उत्तरं नाहीये. पण; एकदा धावायला लागलो की आठ-दहा किमी फक्त धावतच राहतो. हल्ली धावण्यात एक अनामिक सूख वाटायला लागलं आहे, धावणे माझ्यासाठी एक व्यसन झालं आहे.
जेव्हा मनाचा आदेश येतो की आता धावायचं चल तेव्हा मी धावायला सुरुवात करतो. अन् ; जोवर मनाला वाटत नाही की, आता थांबायला हवं तोपर्यंत मी धावतच राहतो.
धावण्यासाठी काही ठराविक मार्ग करून घेतले आहे. मग वेळेनुसार तर कधी मनाला योग्य वाटेल त्या मार्गानं धावतो.
काल असच पाच वाजता धावायला सुरुवात केली. गौताळा अभयारण्याचा परिसर मी राहतो त्या शहराला लागून असल्यानं नेहमी या अभयारण्याच्या हद्दीत मी धावत असतो. कधीतरी डोंगरदऱ्या असलेल्या रस्त्याला तर कधी अभयारण्याच्या आतून जाणाऱ्या डांबरी रस्त्याला.
काल पहिला साडेचार किमीचा टप्पा पार झाला अन् अभयारण्याच्या गेटवर थांबलो. कितीही धावलो किंवा नाही धावलो तरी इथे मी नकळत थांबून घेतो. कारण इथे मला माझ्या भविष्यातील हालचाली खुणावतात, सगळं सोयीस्कर झालं तर मी ही असाच कुठे भविष्यात राहील असं वाटून जातं अन् मोजून पाच-दहा मिनिटं इथे थांबणं होतं.
काल एकाकी धावत असताना अभयारण्याच्या गेटवर आलो अन् एक ओळखीचा दरवळ मला येऊ लागला. हा दरवळ आला की मला उन्हाळ्याची चाहूल लागते. या वर्षी हा दरवळ काल पहिल्यांदा अनुभवला पण हा सुगंध हा दरवळ कसला आहे हे आजवर मला कळून येत नव्हते.
काल या प्रश्नाचे उत्तर शोधायचे म्हणून मी तिथं रिलॅक्स होऊन शांतपणे गौताळा अभयारण्य न्याहाळत बसलो.
सध्या निसर्गात पानगळ सुरू असल्याने अनेकांना निसर्गात उदास उदास वाटत असावं पण माझ्याबाबतीत उलट आहे. मला ही झाडांची होणारी पानगळ अन् शुष्क वाऱ्यात अवघ्या अभयारण्यात भरकटणारी हे पाने बघायला त्यांच्यात माझं अस्तित्त्व शोधायला आवडते. म्हणून मी कितीही वेळ हा सर्व निसर्गाचा सुखद सोहळा अनुभवू शकतो.
तर तो दरवळ माझ्यापर्यंत येत होता. आजवर माझाही गैरसमज होता की हा दरवळ रातराणीच्या फुलांचा असावा पण काल हा गैरसमज दूर झाला. तो दरवळ असतो उन्हाळ्याची चाहूल लागली की करवंदाच्या जाळीला येणाऱ्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचा. जास्मिंनची फुलं भासावी इतकी सुंदर अन् नाजूक ही फुलं दिसतात. काटेरी करवंदाच्या जाळीला ही फुलं अजूनच सुंदर दिसतात.
मग काय कालचं धावणं जरासं थांबलं कितीवेळ झाडांची होणारी पानगळ,त्या फुलांचा दरवळ अनुभवत बसलो. अभयारण्याच्या गेटवर येणारी - जाणारी लोकं मला वनरक्षक समजत असावी हे त्यांच्या नजरेतून कळून येत होतं. मी ही निवांत बसून सगळा गौताळा अभयारण्य नजरेत भरून घेत होतो. असं इकडे रोजच येणं होतं पण निवांत बसणं क्वचित कारण,धावण्याचं वेडखूळ मला इथे फार वेळ थांबू देत नाही.
दूर डोंगरातून मोरांचा अनेक पक्षांचा आवाज येत होता. हळू हळू दिवसभर आग ओकणारा सूर्य डोंगराच्या माथ्यावर अस्ताला जातांना दिसत होता, त्याला बघणं एक मनाला क्षणिक शांतता मिळण्याचं कारण ठरत होतं.
अस्ताला जाणारा सूर्य अस्ताला गेला अन् पुन्हा घराच्या वाटा खूनायला लागल्या.मग धावत राहिलो रोजच्या थांब्यापर्यंत येऊस्तोवर. मोबाईलवर बघितलं तर कालचं धावणं पूर्ण ९ कि.मी झालं होतं.
इतकं धावूनही कुठला थकवा जाणवत नव्हता की कुठलं काही. आता पुन्हा आज गौताळा अभयारण्यात धावत इथे येऊन हे कालचं आज टाईप करत बसलोय..!
Written by,
Bharat Sonawane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा