Wild Life...
भर दुपारच्या उन्हात तो धरण पाळेचा आधार घेऊन सभोवतालच्या परिसरात नजर लावून बसलेला असायचा,नजर शून्यात असायची की,काहीतरी विचार करत काही शोधात असायची हे फार सहज कळायचे नाही... पण बर्याचवेळ उन्हात उभे राहून जेव्हा दूरवर उन्हाची झळई डोळ्यांना तुटतांना दिसायची त्यावेळी आपसुकच त्याच्या डोळ्यांतून पाण्याचे ओघळ वाहुन यायचे अन् तो या वाळलेल्या,बोडक्या रानात नजर लावुन काहीतरी शोधत आहे हे ज्ञात होत असायचं...
उंचावर असलेल्या धरण पाळेवरून त्याला दूरवर पसरलेल्या रानाचा अंदाज घेता येत असायचा,चरायला म्हणुन सोडलेल्या बकऱ्यासुद्धा राखण करता यायच्या,न्याहाळता यायच्या. एखाद दुसरी बकरी वाट चुकली तर तोंडानं विशिष्ट शैलीने तो शिळ फुंकायचा अन् वाट चुकलेली ती बकरी पुन्हा आपल्या कळपात परतायची.
वेगळं काही नसायचं रोजचं हेच..!
पहाट झाली सुर्य किरणे अंगावर आली की,आवरुन महिन्यांनी बांधलेल्या बकऱ्या चरायला,वळायला म्हणुन रानात घेऊन यायच्या अन् सुर्य धरणपाळेच्या खाली कलला की बकऱ्या घेऊन परतीच्या वाटेवर मार्गानं लागायचं... रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या उंच बांबूला बांधलेल्या विळ्याने तोडून डोईवर बांधुन बकऱ्या सावरत घराची वाट चुकती करायची इतकंच काय ते त्याचं आयुष्य...
माणसाच्या व्यवहारी जगाची ना त्याला ओळख होती ना पाळख,ओळख तरी कशी असावी नियमुन दिलेलं हे काम त्याच्या पाचवीला पुजलेले.माणसाच्या व्यवहारी जगाची जरी त्याला ओळख नसली तरी,निसर्गाचं मानवाला आपलं करणे अन् माणसाने निसर्गाची हानी करणे हे त्याला सहज कळायचं,निसर्गातल्या झाडांशी,पाने,फुले,पक्षी,प्राणी यांच्याशी त्याची चांगली गट्टी जमलेली...
निसर्गाचा मान राखून आजवर तो आपल्या बकऱ्या चारत राहायचा निसर्गही त्याला भरभरून देत असायचा,घेणाऱ्या सामान्य माणसाला या गोष्टीचं काही सोयर सुतक नसल्या कारणाने सामान्य व्यक्तीला हे निसर्गाचं देणं कधी कळले नाही,पण त्याला या सर्वच गोष्टींची पारख होती म्हणुन तो निसर्गाकडून मिळेल ते घेऊन त्याची परतफेडही करत असायचा...
अनवाणी कधीतरी रान वाटेनं भटकत असतांना त्याला झाडांशी हितगुज घालतांना बघितलं तर कधी,धरण पाळेच्या भिंतीला डोके टेकून स्वतःशी बोलताना बघितलं,कधीतरी लक्ष्मी आईच्या छोट्याश्या देवळात सावलीच्या आडोश्याला बघितलं पण कधीही नाही दिसला त्याच्यात तो सामान्य माणसात असलेल्या जगण्यातला व्यव्हारीपणा...
वेगळ्याच काही तंद्रीत असलेला तो जगा वेगळा भासायचा....
भर दुपारी उन्हात अशी नेमक्या वख्ताला त्याची आठवण येऊन जायची अन् आपसुक डोळे बोडक्या रानाच्या दिशेनं बघु लागायची...मग कधीतरी रानात फुललेलं पळसाच झाड दिसायचं,गुलमोहराच्या झाडाला आलेलं फुल अन् पडत्या उन्हात भर रानात चहुकडे पसरलेला त्याचा तो मध्यम सुगंध.
हे सगळं कसं आठवणीत फिट्ट बसलेलं होतं त्याच्या यात कुठला बदलही नव्हता,कदाचित होणारही नाही...
Written by,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा