मालगुडी डेज..!
"मालगुडी डेज" आर.के.नारायण लिखित ही कथामालिका माझी बालपणापासून ते आजतागायत नेहमी आवडती मालिका आहे.अलिकडच्या काळात टीव्हीवर ती प्रसारित होत नसली तरीही फावल्या वेळात इतर प्रसार माध्यमातून मी नेहमीच ती बघत असतो...
मालगुडी डेज चे पूर्ण भाग मी बघितले,कित्येकदा ते पुन्हा पुन्हा बघूनही एक नावीन्य त्या मालिकेला बघण्यातून मिळत असते.मालगुडी नावाच्या गावाभोवती घडणाऱ्या या कथा खुप रंजक पद्धतीने,एका विशेष धाटनितून लेखकाने त्या लिखित केल्या आहेत.
याचा प्रत्यय प्रत्येक वेळा या मालिकेला बघतांना आपल्याला येत असतो,मालगुडी हे पूर्णपणे जरी काल्पनिक असले तरीही मालिकेमध्ये बघतांना या गावाचे केलेलं ते वर्णन,त्या ठराविक विशिष्ट जागा नेहमीच कुतूहल निर्माण करतात आणि कुठेतरी त्या गावात आपल्याला नेऊन सोडतात....
नक्कीच असे गाव बघायला आवडेल,लेखकाच्या लिखाणाचा बाज साध्या पद्धतीने,सहज समजेल अश्या भाष्या शैलीत केलेलं लेखन काळजात घर करून राहते.आणि मालिका बघताना आपण त्या गावात भटकंती करू लागतो,प्रत्येक कथा आपल्याला गावातील त्या विशिष्ट ठिकाणांवरून आठवायला लागते अन् आपसुकच मन त्या कथे भोवती रुंजी घालू बघते...
मालिका बघत असताना लेखक आपल्याला इतक्या वर्षांनंतरही त्या काळात घेऊन जातो.ज्या काळात हे लेखन केल्या गेले आजही वाटते की,काल्पनिक का असेना पण 'मालगुडी' नावाचं हे प्रत्येक्षात असायला हवं होतं.गावातील त्या प्रत्येक खाणाखुणा बघायला,सोबतीने मालगुडी डेजच्या कथांचा आस्वाद घ्यायला आवडले असते...
मालगुडी डेज या मालिकेतील माझी सर्वाधिक आवडती कथा कुठली असेल ती आहे "गरीब आदमी"
गरीब आदमी या कथेतील लेखकाचं लेखन मनाला स्पर्शून जाणारं आणि खुप जवळचे,अनुभवलेले वाटते.कथेचा नायक मुनी हाच तो वृध्द गरीब आदमी असतो.त्याचा मुलगा दुसऱ्या एका मोठ्या शहरात नोकरीला गेलेला असतो अन् हा मुनी नेहमी त्याची तार येईल याची वाट बघत असतो...
त्याच्या घरात त्याची बायको अन् त्याच्या त्या प्रिय बकऱ्या असतात,घरात असलेली गरिबी याचे वर्णन मग गावात उधारीवर किराणा आणायला गेल्यावर गावातील दुकानदार त्याची मागची उधारी त्याला मागतो.पैसे नसल्याने तो सांगणारे कारणे गावातील धनी लोकं त्याच्या कारणावर हसतात,तो तसाच खाली हात वापस येतो हे कथेत प्रत्येक वाक्या गणिक खुप जवळचे बघितलेले,अनुभवलेले वाटते.
घरी आल्यावर त्याच्या बायकोचे त्याला ते रागावणे,गावात कुण्या किसानाचा झालेला खून तिच्यावर आरोप येईल म्हणून तिचं कामावर न जाणे,मग अंगणात असलेल्या एकमेव शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या शेंगा तोडून त्याचं केलेलं ते कोड्यास त्या गरीब आदमीच घर हे खूप भावते....
मग त्याचं ते बकऱ्या चरायला रस्त्याच्या बाजूला असलेल्या रानात घाटात घेऊन जाणं,त्याच्या बायकोचं मागून ते मोठ्या आवाजात ओरडणे हे बघायला फार छान वाटते.मग आपसुकच आपण त्या कथेचा एक भाग होवुन जातो,पुढे पुढे खुप सुंदर ही कथा आहे....
या कथेत सर्वाधिक आवडणारा भाग कुठला असेल तर तो जो घाटात मुनी खुप वर्षांपूर्वी होवुन गेलेल्या राज्याच्या पुतळ्याखाली झोपलेला असतो,मग घाटातून इंग्रज अधिकाऱ्याची जाणारी गाडी तिचे डिझेल संपणे,मुनीचे ठराविक रोजच्या रस्त्यावरील गाड्यांना हात देणे जा जा असे हाताने करणे,मग त्या इंग्रज अधिकाऱ्याची अन् गरीब अनपड मुनीची झालेली भेट भाषेची दोघांमध्ये झालेली तफावत पण तरीही फुलत जाणारा संवाद...
इंग्रज अधिकाऱ्याला तो राज्याचा पुतळा आवडणे,मग मुनीला पैसे देत तो खरेदी करणे,तो गाडीवर इतर प्रवाशांच्या मदतीने टपावर बांधणे गाडीत त्या प्रवाशांच्या गाडीतील डिझेल टाकणे हे दृश्य खूप भावणारे आहे.कथा काळजाचा ठाव घेतेच,सोबतीला कथेला साजेसे निर्माण केलेले दृश्य हे मला खूप भावते ते मालगुडी नावाचं गाव असो किंवा तो पुतळा,तो घाट हे खुप सुंदर आणि माझ्याशी कनेक्ट मला वाटले,त्यामुळे ही कथा माझी खूप आवडती आहे,नक्कीच बघा आपल्यालाही आवडेल...
'मालगुडी डेज' बद्दल थोडक्यात....
मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही.
या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात.हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे.
या गावातीलच एक गोष्ट दी गाईड. यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. तर त्यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर आधारीत दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.
साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते.त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत...
Visit the link below to read the rest of the article...
Written by,
©®Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा