गाव अन् गावच्या आठवणी..!
सकाळचा दहाचा सूर्य तळपत होता,तालुक्याचा पोस्टमन रानाच्या पायवाटेना बोडक्या टेकडीवर दहा-बारा घर असलेल्या ठाकर लोकांच्या वस्तीच्या दिशेनं सायकल लोटीत-लोटित येत होता.
लाल कापड,डोक्यावर लाल टोपी घातलेला तो अन् सायकलीला लाल पिशवी असलेली ती सायकल बहुदा पंक्चर झाली असावी...
मी टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसून होतो,टेकडी गावच्या उंचावर असल्याने पाण्याच्या टाकीवरून सारा गाव नजरी पडायचा.उन्हं असल्यानं अंगाची लाहीलाही होत होती पण अधून-मधून येणारी वाऱ्याची झुळूक काही काळ सुखाचा स्पर्श अंगाला करून जात असायची.
दहा बारा घरांची ठाकरवस्ती असलेल्या वस्तीमध्ये चार-पाच तरुण पोरं शहराला औषधीच्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करायची.दहा पाच खेट्या केल्यानंतर सरपंच्याचा ओळखीने यांना लावून दिलं होतं.कधी महिना-पंद्रादिला त्यांचं पत्र यायचं त्यांची ख्यालीखुशाली कळायची,आईबापसांला महिन्याकाठी शे-दोनशे रूपडे पोरं पाठवायची म्हणून त्यांच्या घरची लोकं तालुक्याचा पोस्टमनची वाट देवागत बघत राहायची...
म्या काय चार बुक शिकलो नसल्यानं मी काय करू शकत नव्हतो,मग दहा बारा शेरड्या घेऊन मी दिसभर त्यांना या बोडक्या टेकडीवर घेऊन चारीत हिंडायचो,चार बुक शिकलं असते तर म्यापण शहराला गेलू अस्तू...
लहानपणी शेरड्या घेऊन रानाला जायला आवडू लागलं,गावच्या लोकांच्या आठ दहा शेरड्या,माझ्या दोन घेऊन मी या बोडक्या टेकडीवर घेऊन यायचो.घरी खायला दूध होवून जायचं अन् महिन्याकाठी हजार पाचशे रूपडे मग कश्याला शहराला जायचं,शाळा शिकलू नाय अन् शेरड्या वळत राहिलो...
आता काय ना धड वाचता येईना झाले,शहराला ओळख मोप आहे पण फायदा काय आपलंच नांणं खोटं..! अशी गत झालीय माझी.
मलाही वाटतं चार-दोन पत्र लिहावी,गावच्या दोस्तांची विचारपूस करावी पण कसं लिहणार अडाणी जो राहिलो.मग काय आपली शेरडं अन् आपण पहाटच्याला निघालं की दिसभर सारे रान कोळपायचे सांच्याला आपलं घर भले अन् आपुन भले...
तालुक्याचा पोस्टमन बाबा एरवी सायकल लोटीत लोटीत टेकडीवर आला होता.मी पण टाकीवरून खाली आलो,पत्राचा गठ्ठा काडून त्यानं मला काही दहा-बारा नावं पुसली कोणी वस्तीला रहात होतं,कुणी गावात सारी पत्र लावून पोस्टमन बाबा मला म्हणाला पाणी दे तो का व थोडंसं..?
मी पिशितली शिशी काढून त्याच्यासमोर धरली,शिशीला चहकडून पोतडे गुंडाळले असल्यानं शिशीतले पाणी गार होतं.गटगट पाणी पिवून पोस्टमन बाबा शिशी देत मला म्हंटला कितवी पहूर शिकलासा..?
मी खाली मान घालत हाताची दोन बोटं दाखवत म्हंटल दुसरी पहूर...
पोस्टमन बाबा म्हंटला
मग एक,दोन येत अस्तीला..?
येत्या की शंभर तक येता पुढं नाय..!
पुढं का नाय येत रं लका..?
पुढं काय करायची पोस्टमन बाबा माझी दहा-बारा शेरड मोजत्या आली बहुत झालं..!
पोस्टमन बाबा हसला अन् शिवजी आप्पाच्या कुडाच्या झोपडीकडे निघून गेला...
सायकल पंक्चर होती,बाबा ती लोटीत होता मी दूरवर जास्तोवर त्याला बघत राहिलो,तो चालत होता,चालत होता..!
आता त्याचा लाल सदरा,लाल टोपी,लाल पिशी लाल टिपक्यागत दिसत होती...
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा