आठवणीतल्या दोघी..!
रात्रीच्या या अश्यावेळी स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात मुंबईचे रस्ते भटकायला लागलो की,काही वर्षांपूर्वी असाच ससेहोलपट करत असताना भेटलेल्या दोन मैत्रिणी आठवतात.एक साधारण तिशी-बत्तीशीतील तर एक माझ्या एव्हडी म्हणजे चोविशी-पंचिविशीतील...
मुंबई म्हंटले की तिला रात्र काय अन् दिवस काय सारखाच,मुंबई थांबत नाही याचा प्रत्यय प्रत्यक्षात आपण हे सर्व अनुभवले की मग येतोच.
तर आज सारखा त्याही दिवशी असाच भटकंती करत होतो,मला एकटा असलो की मग कुणी सोबत लागत नाही,जिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे मी भटकत असतो....
रस्ता दिवसापेक्षा हळुवार म्हणजे अती हळूच चालत होता,साधारण अर्धा एक मिनिटाच्या अंतरावर एखादी फॉर व्हीलर जवळून निघून जायची एखाद्या विशिष्ठ पॉईंटला कुठल्यातरी कॉलसेंटरची कॅब येऊन उभे राहायची,दोन तीन मुली उतरल्या की ती पुढे निघून जायची.
त्यांच्यासाठी हे रोजचं होतं पण माझ्यासाठी हे नवीनच,कुतूहल वाटायचं त्यात माझी कुठल्याही विषयाच्या खोलात जाऊन विचार करण्याची सवय मग हा सर्व प्रवास भारी वाटायचा....
मोठ मोठाले होर्डिंग्ज,चमकणारे बॅनर अन् ही माझ्या सारख्या एक्कलकोंड्याला भुलवणारी मुंबई.मला दिवसाच्या मुंबईपेक्षा ही रात्रीच्या सुमारास असलेली,जीवाला मोकळीक असल्याचा भास देणारी मुंबई खूप जवळची वाटली.त्यामुळं आजवर जे काही क्षण रात्रीच्या वेळी मुंबईत भटकंती करत अनुभवले ते आजही आठवणीच्या कप्प्यात तसेच साठवलेले आहेत....
तर त्या दोघींची झालेली भेट पुढे अजूनही कधीतरी वर्ष-सहा महिने झाले की त्यांना करत असलेला मेसेज अन् त्याला न चुकता येणारं उत्तर.हे आजही एका वर्तुळाप्रमाणे चक्र चालू असतं,काय करत होत्या..? इतक्या रात्री कुठं नोकरीला जात होत्या का..? असे असंख्य प्रश्न पहिल्या भेटीत पडलेले पण न बोलता अन् डोळ्यातील नरमाईची असलेली भावना दोघींच्या बाबतीत पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन गेली.तितक्याच सहजतेने जितक्या सहजतेने प्रश्न पडलेली मला....
मी चालत होतो कैफात माझ्या माझ्या विश्वात,भेट झाली त्यामागची कथा खूप मोठी पण थोडक्यात काय तर खूप काही चेहऱ्यावर असलेलं हसू दिवसभर लपवून त्यांच काम चालू असायचं अन् अश्या मध्य रात्री जेव्हा कॅब ठरल्या चौकात यायची त्यांना सोडायला तेव्हा त्या दिवसभर हास्य असलेल्या चेहऱ्यावर एक आयुष्याला जगण्याला कंटाळून गेल्याचा भाव दिसून यायचा...
पण पुढे मैत्रीत जसं वर्षानुवर्ष भेटीचे,बोलण्याचे वर्तुळे पूर्ण होत होते तितकेच अन् तसेच सहज आयुष्य जगण्यासाठी रोजच होणारी पहाठ अन् मध्यरात्रसुद्धा होत होती.फार काही बदल नव्हते रोजची ठरलेली वेळ जॉब,घर,आयुष्याचे गणित इतकंच काय ते आयुष्य त्यांचं.
खोट्या रंगमंचावर एका खूप उंचीवर असलेल्या नटीचा मेकअप करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या दोघी काम करायच्या.या विश्वात केव्हा आल्या..? कुणा आणलं..? इतका जम कसा बसला..? हे मी ही कधी फार जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.इतकं मात्र नक्की होतं रंगमंचावर नटी आपली कलाकारी दाखवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत अन् तिच्यावर या दोघी मेहनत घेत असायच्या...
सिनेजगत असो किंवा रंगमंच या मला नेहमीच काळोख असलेला व्यवसाय,इंडस्ट्री वाटल्या.येथील कलाकारपासून तर स्पॉटबॉयपर्यंत सगळे दुहेरी आयुष्यं जगत असतात,यात काही जणांचा प्रत्यक्ष सहभाग असतो तर काही फक्त पडद्यामागे आपली भूमिका बजावत असतात...
खऱ्याखुऱ्या आयुष्यातसुद्धा खूप भूमिका त्या पार पाडत असतात,नशिबाने या लोकांचा सहवास मलाही थोडाफार लाभला,त्यांना माझ्यापाशी व्यक्त व्हावं वाटलं म्हणून हे रात्रीचं एक आगळं वेगळं जग अनुभवयाला मला भेटले...
फार काही नाही सांगणार कॅब आली दोघी कॅबमधून उतरल्या,दिवसभर त्या नटी सोबत राहून आपलं आयुष्य विसरून त्या आयुष्याला घेऊन खूष असल्याचा आव आणत चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन जगत असायच्या.अशीच एक मध्यरात्री कॅब आली अन् नंतर या हसऱ्या चेहऱ्या पलिकडे असलेल्या आयुष्याला घेऊन असलेल्या जखमा त्यांच्याकडून कळत गेल्या अन् इतकं कळले व्यक्ती एकाच वेळी दोन आयुष्यं जगत असते...
तेव्हापासून या रात्रीच्या जगाचे आकर्षण कायम वाटू लागले,ज्याच्यी त्याची एक आगळी वेगळी कथा जाणून घ्यायला मन मग तयारी व्हायचे भटकंती करायचे.मग बरेच कोडे उलगडले जायचे या अश्या रात्रीच्या वेळी अन् कित्येक आसवांचे बांध फुटल्या जायचे एकदा विश्वास संपादन केला की....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा