मुख्य सामग्रीवर वगळा

सायंकाळच्या गुजगोष्टी...

सायंकाळच्या गुजगोष्टी...


नेहमीप्रमाणे आजही सायंकाळ झाली अन् पावले रोजच्या सायंकाळी ज्या वाटेनं मी फिरायला जातो त्या वाटेला निघाली.गेले काही दिवस शहरात बऱ्यापैकी पाऊस होवून गेल्यामुळे घरापासून फिरस्तीच्या मोकळ्या मैदानापर्यंत सर्वदूर हिरवे गवत,विविध झाडे वाढीस लागली आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे शेवटचे किरणं जेव्हा दव पडलेल्या गवतावर पडतात तेव्हा चमकणारे दव दिवसभराचा असलेला मानसिक त्रास,मनाचे हजारो प्रश्न यांना विसरायला भाग पाडतो...

त्यामुळे अलिकडे सायंकाळची फिरायला जाण्याची वेळ फारशी मी चुकवत नाही,आयुष्यात फार विशेष असे काही चालू नसल्यामुळे ती ही फार चुकत नाही.घड्याळाच्या काट्यावर सध्या माझं आयुष्य बघायचं तर तास काट्यावर चालू आहे असं समजुयात,इतकं सर्व आयुष्यात हळुवार चालू आहे.

असो जे आहे ते तूर्तच छान आहेअजून काही दिवस माझ्यासाठी तरी,कारण मनासारख्या गोष्टी नाही घडल्यातर माझ्यावर होणारा परिणाम खूप वाईट आहे.जो गेले काही दिवस अनेकदा अनुभवला,त्यामुळं आता फारसे विचार करत नाही,माझ्या आयुष्याच्या पलिकडे सुद्धा सर्व अस्थिर आहे त्यामुळं हे असावं कदाचित पण काही वेळा खूप काही चुकल्यासारखे वाटते....

तर पावलं आपल्या रोजच्या वाटेनं चालत होती,चहूकडे वाढलेली झाडे,तन यामुळे पाऊलवाट स्पष्ट अशी डोळ्यांना दिसत होती.दूरवर असलेला गाई म्हशींची रखवाली करायला म्हणून असलेल्या काळया-निळ्या झोपड्या डोळ्यात मावतील इतक्याश्या होवून दिसत होत्या,अधून मधून छोटी छोटी नाले,खडकातून पाझरणारे पाणी,खळखळ वाहणारे पाणी अन या सर्व गोष्टींना डोळ्यात साठवत माझं विचार करत चालणे चालू होते...

दूरवर डोंगरदर्याच्या रांगा,नजरेत मावतील इतक्या अंतरावर असलेल्या टेकड्या,त्यातून झऱ्यातुन,गवतातून वाट काढत माझ्यापर्यंत आलेलं वाहते पाणी अजून खूप दूरवर वाहत चालले होते.
मेंढ्यांचा कळप आपल्या विश्वात मग्न होवून गवताला फस्त करतोय,मेंढपाळ शिळ फुंकत त्यांना वळत आहे,त्याही खूप आज्ञाधारक असल्यासारखे त्यांच्या मागे मागे फिरत आहे.
स्थानिक शेतकरी त्यांची जनावरे या मोकळ्या रानात चारायला सोडता त्यामुळं,मेंढ्यांचे या रानात चरणे त्यांना योग्य वाटत नाही मग दोन-चारशे मीटर वरून त्या मेंढपाळांना झिडकारून, हातवारे करून त्यांच्या रानातुन धुडकावून लावत आहेत...

माझ्या या फिरस्तीच्या वेळेपर्यंत कुणीही फिरायला फारसं निघत नाही,त्यामुळं माझं असं निसर्गाला न्याहाळणे चालू असते.निसर्ग आपल्याला भरभरून देतो फक्त ते नजरेला न्याहाळता आलं पाहिजे अन् हे गेले काही वर्ष मला उमगल्यामुळे मला माणसांचा सहवास नकोसा वाटतो.माझ्या विश्वात रममाण राहणं,येणाऱ्या जाणाऱ्याला वाक्य दोन वाक्य ओळख आहे इतपत दाखवण्यापुरते मी संवाद करतो नंतर मग माझं विश्व अन् मी ...

रोजच्या जागी पोहचलो,दूर दूर काळे खडक असल्यामुळे मस्त बसण्यासारख्या खडकावर बसून आपलं येणारा जाणारा बघत राहायचं,निसर्ग न्याहाळत रहायचं त्याला जोडून विचार करत राहायचं,आयुष्याशी वयाची वजाबाकी,बेरीज करत राहायचं,ग्रेसच्या कविता ऐकायच्या,गालीबची शायरी ऐकायची,भिमराव पांचाळे यांच्या गझल ऐकायचं अन् अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणांना शोधत राहायचं आपल्या आयुष्यात...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...