JNV च्या आठवणी...
भर उन्हाळ्याचे दिवस असायचे,सकाळची उन्हं सायकल चालवत असतांना पाठीशी पाठीवर पडायची अन् डोक्यातून घामाच्या धारा चेहऱ्यावर येऊ लागायच्या.
नदी,नाले,छोट्या-मोठ्या पाऊलवाटा पार करून दोन तासात सायकलच्या कॅरीयरला लावलेली दोनशे पेपर वाटून संपायला यायची.चड-उताराच्या लाल मातीच्या फुफाट्यात असलेल्या रस्त्यानं मग शेवटची नऊ-दहा पेपर टाकण्यासाठी दीड-दोन कि.मी.सायकलवर भटकंती व्हायची...
उन्हाळ्यात जवाहर नवोदय विद्यालयास सुट्टी लागली की तीच पेपरची संख्या तीन-चार पेपरवर येऊन जायची.मलाही नवोदयमध्ये जाण्यास कारण लागायचे म्हणून मी ही जायचो ते तीन चार पेपर घेऊन.
कारण का लागायचं..? येथे असं काय होतं ज्यासाठी मी इतका भटकंती करून शेवटचे पेपर नेमके या नवोदयमध्येच का टाकायचो..? किंवा पहिले पण टाकू शकत होतो मग शेवटच का..?
यालाही खूप कारणे होती,संपूर्ण पेपर टाकली की नवोदय विद्यालयात प्रवेश केला की रस्त्याने चढण लागायची.नवोदय विद्यालय आतील रस्ता संपूर्ण डांबरीकरन केलेला होता,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना निळी-पिवळी फुलांची झाडे होती,गुलमोहराची झाडं होती,उन्हाळ्यात या रस्त्यांनी जातांना या सर्व झाडांची फुलं रस्त्यानं पडलेली असायची...
रस्त्याने संपूर्ण चहड असल्याने अन् उत्तरेला नवोदयच्या भिंती पलिकडे टेकडी,मोकळा परिसर असल्यामुळे चढ चढून जातांना सुद्धा गार हवा शरीराला अनुभवयाला यायची.घामाचे ओघळणारे थेंब अश्यावेळी शरीराला सहज जाणवायचे अन् एक सुखद गारवा त्यावेळी अनुभवयाला मिळायचा.इतक्यावरच थांबुन चालणार नाही काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला मेहंदीची दाट झाडी होती,निलगिरीची उंच-उंच झाडं होती,यांचा सुगंध तर आजही नाकात दरवळतो....
झाडांना सतत पाणी पुरवठा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला ठिबक सिंचनाच्या लांबच लांब दोन नळ्यांनी प्रत्येक झाडाच्या खोडापाशी पाणी सोडलेले होते,त्यामुळं अजूनच गारवा अनुभवयाला मिळायचा.रस्त्याच्या एका वळणाला छोटासा पुल होता,तिथं ठरवून पाच-दहा मिनिटं बसून गुलमोहराच्या झाडाची सावली अनुभवयाला अन् आजच काम संपलं हे अनुभवयाला छान वाटायचं.रोजचा होणारा हा प्रवास यात कुणीही नसलेला सोबती अन् माझ्या या छोट्याश्या विश्वात खूष असलेलो मी.वय काही नाही बारा-तेरा वर्षाचा असेल जेमतेम तेव्हा पण छान वाटायचं हे सर्व रोज अनुभवणे...
मग नवोदयच्या विद्यालय असलेल्या इमारती जवळ आलं की तिथे टाकलेल्या लाकडी खुर्चीवर बसून रजिस्टरवर आपल्या नावाची एंट्री करणं नाव,आत येण्याचे कारण,किती वाजता आत आलो हे लिहणे,सही करणे खरंतर याची रोज येणाऱ्या आमच्या सारख्यांना काहीही एक गरज नव्हती.पण जेव्हा माझा हा प्रवास कायमचा इथे येण्याचा बंद होईल तेव्हा आपलीही या नवोदयच्या विश्वात कुठेतरी रोजची केलेली एक नोंद असेल,आठवण असेल म्हणून मी हे सर्व इथे लिहायचो...
पाणी प्यावेसे वाटले तर पिवून घ्यायचं अन् मग निघायचं रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेतील्या पाऊलवाटेनं सायकल चालवत,मुलींच्या हॉस्टेल पलिकडे असलेल्या शिक्षकांच्या क्वार्टरमध्ये रस्त्यानं असलेली असंख्य बदामाची,जांभळाची झाडं इकडे लागायची.पहिला पेपर टाकला की नवोदयची ही इमारत न्याहाळत चालायचं सायकलवर,रोज काय बघायचं इतकं त्या इमारतीला या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं,आजही नाही...
आजही कधीतरी गेलो की मी त्या सर्व इमारती न्याहाळत असतो बारकाईने,पुन्हा वळणे घेऊन नवोदयच्या एका खालच्या कोपऱ्यात काही शिक्षकांचे पेपर सायकल एक ठिकाणी सायकल लावून पायी चालत टाकायचे.पुन्हा इथून वरती बॉईज हॉस्टेलकडे वळायचं,रस्त्यात कॅन्टीन लागायचं तिथं मिळणारी चहा,दूध आजही आठवणीत आहे...
मग निलगिरीच्या झाडांच्यामध्ये असलेलं निलगिरी हाऊसमध्ये काही शिक्षकांचे पेपर चालू सायकलवर टाकायचे मग पुन्हा अजुन वरती जावून नवोदयच्या सोबतच शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या घरात पेपर टाकून परतीच्या मार्गाला लागले की निवांत सायकलवर बसून राहायचे.सायकल उताराच्या दिशेने चालत राहायची,आपण अंगाला स्पर्श करून जाणारा वारा अनुभवयाचा अन् पुन्हा वापस जाताना रजिस्टरवरती एक एन्ट्री करून गुलमोहर,मेहंदी या झाडांच्या समवेत सायकलवर बसुन नवोदयच्या बाहेर पडायचं...
क्षणिक सुखाचा आनंद असायचा हा जो रोज अनुभवयाला भेटायचा...
ठिकाण- जवाहर नवोदय विद्यालय,कन्नड.औरंगाबाद.
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा