सीमांतनी..!
हळदीने हात पिवळे झाले,लग्न झाले अन् नवतीचे नऊ दिवस संपले.एकोनिशीची सिमांतीनी आता दिवसभर कामाच्या अन् तिच्या संसाराच्या गराड्यात गुंतून गेली होती.टिपिकल गावाकडल्या साल दोन साल लग्नाला झालेल्या बायकांप्रमाने तीही कामं करू लागली,दिवसभर रोजंदारीने लोकाच्या वावराला खुरपणी,निंदणी करू लागली...
ऐन तारुण्यात केलेलं पदार्पण अन् अंगावर संसार नावाच्या एका परंपरेत स्वतःला झोकून देऊन ती दिवसभर काम उपसायची अन् रात्री ऐन तारुण्यात आलेला तिचा दादला तिला घटकेभरचाही उसंत द्यायचा नाही...चार-सहा महिने मागे पडली,ऐन सुगीच्या दिवसात ती तीन महिन्याची पोटुशी असताना तिला कळलं अन् घरात आनंदाचा पारावर उरला नाही...
कुणाच्या मनात घटकेभरही हा प्रश्न आला नाही की एकोनिशीची सिमांतीनी या सर्व गोष्टींना सामोरे जाईल का..? तिला इतक्या लहान वयात आलेलं बाळंतपण झेपल का..? , तिचं शेवटच्या काही महिन्यात तिला स्वतःला सावरणे जमल का..? प्रश्न खूप होते पण सर्व प्रश्नांना एकच उत्तर होतं..!
ती काही जगाच्या पाठीवर न्यारी नाही,तिच्या मायला जमलं,तिच्या सासुला जमलं अन् आता तिच्या अठरा वर्षाच्या नंदेला जमलं.
मग तिला का नाही..?
दिवसा मागून दिवस जात होते सिमांतीनी आता सहा महिन्याची पोटूशी होती,एकोणाविसाव्या वर्षी वाळक्या अंगकाठीच्या सिमांतीनीच्या पोटाचा घेर नववा महिना चालू असल्यागत दिसत होता.चालताना फारवेळ चाललं की तिला आता धापा लागत असायच्या पण परसदारच्या छोट्या आडातून पाणी शेंदून आणणं तिला चुकायचे नाही.इतकाच काय तिला दिलासा भेटला होता की कंबरावर घेऊन येणारी कळशी आता तिला तिची सासूबाई आणून देत नव्हती,मात्र डोईवर असलेला हंडा मात्र काही केल्या तिच्या नशिबातून या अवस्थेलासुद्धा खाली पडला नव्हता....
सांजेच्या वेळी अंगणातील सारवासारव आवरली की सिमांतीनी हातपाय धुवून,वेनीफनी करून,डोक्यात भांगेच्या मधोमध सिंदुर भरून,चंद्रकोर टिकली कपाळावर लावत,अंगावर घातलेल्या काठ नववार लुगड्यासारख्या साडी चोळीत ती अक्षरशः सौंदर्यवती दिसायची अन् आता त्यास भर म्हणून पोटूशी असल्यामुळे पुढे आलेला पोटाचा घेर अगदी कुणाची नजर लागावी इतकी ती सुंदर दिसत होती.दिवसभर इतकं सर्व काम करूनही सिमांतीनी सांजेच्या या वेळेला अक्षरशः देवीच्या चेहऱ्यावर असलेलं तेच तिच्या चेहऱ्यावर घेऊन यायची...
अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनात तेलाचा दिवा ठेऊन तो सदैव तेवत राहील याची खात्री करून ती वृंदावनाभोवती तीन प्रदक्षिणा घालून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार घालत आतल्या घरात यायची अन् सासू सासऱ्याचे पाय पडायची...
जसं अंधारून यावं तसं अग्निदेवी तिची जशी वाट बघत असावी अशी चुल्हांगण पेटवायला वाळलेली लाकडे घेऊन यायची अन् संसाराच्या या रहाटगाड्यात अगदी जाणत्या संसारी स्त्रीसारखी चुल्हीला पेटवायची.दादल्याला,सासू,सासऱ्याला कोऱ्या चहाचं आंधन चुल्हीवर ठेवायची,उकळून उकळून पार काळा झालेला चहा जवा ती कपात ओतायची तेव्हा त्यातून निघणारी वाफ साऱ्या घरात मिरायची अन् तो सुगंध साऱ्या घरात फेर धरायचा....
मग तिचं एका हातानं नथीचा झुबका सावरत चहा पिणं व्हायचं अन् तिच्या दादल्याचे तिला प्रेमानं न्याहाळणे...
(लेखन भरत सोनवणे नावे ©® कॉपी राईट असल्याने नावासहित शेअर करा...)
क्रमशः
Written by,
©®Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा