Evening Thought's..!
एकांताशी स्वगत जुळून येणं इतकं सोप्पं नाही की खूप सहज कुण्या आपल्याशी आपली केमिस्ट्री जुळून येणं,त्यासाठी त्या पाईक व्हावं लागतं...
भर उजेडात अंधार डोळ्यांना दिसू लागला की मग काही अंशी आपला एकांताशी स्वगत जुळून येणं या प्रक्रियेकडे प्रवास होवू लागतो,गर्दी अनोळखी वाटू लागते,आपली माणसे परकी भासू लागतात किंवा मग माणसाच्या गर्दीत ती हरवून जातात,आपल्याला दिसत नाहीत जरी दिसली तरी आपण त्यांना टाळू लागतो....
मग अश्या रिकाम्या खुर्च्या आवडायला लागतात,आपून बसलेल्या खुर्चीचे आपल्याला ओझे होवू लागते.डोळ्यांना खुर्ची समोरचा सुंदर निसर्ग दिसत असतो पण जाणिवेत तो जाणवत नाही.आपल्याला फक्त एकांत अन् आपलं एकटेपण अश्यावेळी जवळचे वाटायला लागते अन् आपले मनही मग त्यातच रमते,माणसांची सावलीसुध्दा मग काही काळाने आपल्याला नकोशी होवू लागते....
अस्ताला जाणारा सूर्य हवाहवासा वाटू लागतो,शेवटच्या किरणांना डोळ्यात सामावुन घ्यायला आवडतं,मग अंधारून आलं की आपल्याला चहूकडे उजेड दिसायला लागतो मग होणारी चिडचिड अन् स्ट्रीट लाईटचे बंद-चालू होणे यात कुठला फरक भासत नाही...
अश्यावेळी पुन्हा गर्दी नकोशी वाटू लागते,उजेडात असंख्य वाटा दिसू लागतात पण आपली वाट कोणती हे कळत नाही अन् मग भटकंती भटकंती अन् भटकंती होत राहते जीवाची....
पुन्हा सूर्योदय होतो अन् मग पुन्हा डोळ्यांसमोर अंधारून येतं,पहाटेचा गोंधळ असह्य होवू लागतो अन् मग पुन्हा पावले आपसूकच अनोळखी वाटा शोधू लागतात...
मिळेल त्या वाटेनं चालत राहायचं,जिथं माणसाचं अस्तित्व संपेल तिथं मग आपल्या अस्तित्वाच्या काही पुसट खुणा दिसू लागतात अन् मग आपल्यालाच ओझं झालेल्या खुर्चीवर पुन्हा घटकेभरचा विश्राम होतो....
पुन्हा सूर्यास्त,पुन्हा सूर्योदय,पुन्हा अस्तित्वाच्या पुसट झालेल्या खुणा, पुन्हा एकांताचा शोध आणि पुन्हा त्याच्या समीप आपलं येणं....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा