आयुष्य निर्माल्य झाले..!
वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर कुणी निर्माल्य म्हणून देवाला वाहिलेल्या फुलांना नदीत वाहते टाकून पुढं निघून चालले होते.कुणी ते निर्माल्यरुपी असलेल्या कचऱ्याला नदीत वाहते टाकत असतांना शिवनामायचे हात जोडून विनवण्या करीत होते की,काही आपल्या मनातले शिवनामायला सांगत होते माहीत नाही अन् त्याला उत्तरही नव्हते.
हे सर्व खूप मनोभावे चालू होते,यापाठीमागे श्रद्धा होती ती माझ्या सारख्यांना उमजूनही काहीही कळत नसल्याने कळल्याचे सोंग आम्हाला आणायचे होते...
कुणी येतोय महादेवाच्या देऊळाकडे बघुन नदी किनाऱ्यावर उभे राहून महादेवाचे दर्शन घेतोय,कुणी पाण्यात डुबकी मारून आपलं पाप धुवून जाईल म्हणून त्यात डुबकी मारत होते.एका किनाऱ्याशी बेलाच्या पानांची दुकाने सजली होती,दहा रूपायाला एक १०८ पानांचा पुडा असे ते विकत होती,सोबत बेलाची फळसुद्धा होती....
विकणारी बारा-पंधरा वर्षांची ती लेकरं बघुन मी नदी किनाऱ्यावर बसून त्यांना न्याहाळत बसलो,एकीकडे व्यवहाराची गणितं शिकणारी ही मुलं होती ज्यांच्या चेहऱ्यावर न कुठला भाव होता की न कुठली श्रद्धा.फक्त आपण येथून किती पैसे घेऊन जाऊ इतकच ते विचार करत होते,बोलत होते...
त्यांचं हे व्यवहारी बोलणं बघुन मला माझा दशकापूर्वीचा काळ आठवत होता.नदीच्या या उंचवट्यावरून पेपरचा गठ्ठा बांधलेली सायकल लोटत घेऊन जातांना माझी होणारी अवस्था,सायकल चालून चालून बारीक झालेली कंबर,त्यातून निसटणारी माझी पॅन्ट हे सगळं आठवलं अन् डोळ्यासमोर ते क्षण येऊन गेले.या मुलांनी पैसा कमवण्याचा हा किती सोप्पा मार्ग शोधला आहे याचं अप्रूप वाटलं पण याही मागे मेहनत होती,व्यवहाराची जोड होती...
गेले चार-पाच दिवस नदीचा प्रवाह दिवस दर दिवस वाढत चालला आहे.काल-परवा नदीच्या पात्रात असलेलं पाणी आज महादेवाच्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्यात होतं.सभामंडप संपूर्ण पाण्याखाली गेला होता,विनेकरी सावळीराम बाबांची विना वाहत्या पाण्यात शिवनेच्या प्रवाहात काल एकाकी वाहून गेली,आता ती तशीच वाहत गोदामाईच्या पात्रात वाहवत जाईल...
बरे झाले वेळीच लोकांना हलवल्यामुळे मंदिरातील आजोबा माय बाप ठीक होती...
वाहत्या पाण्यात अखेर दर्शन म्हणून किनाऱ्यावर उभा राहिलो,हाते जोडून काय मागितलं माहीत नाही पण पाण्याच्या बाहेर येऊन तसाच अनवाणी पायांनी वाळूतून मार्ग काढत घरच्या मार्गाला लागलो.नदीवर असलेल्या पुलावर काही बायका पूजा करत होत्या,नदीला पाणी खूप असल्यामुळे पुलावर होत असलेली पूजा जवळून बघितलेली...
पुलाच्या कठड्यावर वाहिलेली जाई,जास्वंदाची फुलं,बेलाची पानं अन त्यांच्यावर वाहीलेलं हळदी कुंकंम खुप सुंदर दिसत होतं,जळता कापुर विझु की मिनमिनु करत होता.नदीच्या वाहत्या पाण्यात श्रद्धा म्हणुन छोटुली जाईची फुलं वाहील्या जात होती,नदीच्या प्रवाहात त्यांच वाहणं मला माझ्या वाहत्या आयुष्यासारखं भासत होतं....
इथं माझं आयुष्य नदी झालं होतं अन मी त्या नदीच्या पाण्यात वाहणारं एक नाजुकसं फुल,नदीचं तेच वाहतं पाणी आता फुलाची परिक्षा घेत होतं.
याच विचारात मी घरी आलो,पुन्हा रात्रभर झालेला धुवाधार पाऊस आणि या पावसात सकाळी जेव्हा पुन्हा नदी कीनाय्रावर गेलो तेव्हा हातचं खुप काही वाहुन गेलं होतं.जाई,जुई,जास्वंदीची फुलं,बेलाची पानं पावसात थिजुन गेलेला कापुर सगळं आणि सगळं वाहुन गेलं होतं,पुलावर बघितलं तर तिथेही फक्त पाणी अन पाणी होतं...
आता मला माझं आयुष्य निर्माल्य भासत होत...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा