गावकुसाच्या आठवणी..!
पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत असतांना चार वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो.तेव्हा मी एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होतो,साधारण दोन महिने झाले होते कंपनी जॉईन करून.नेहमीप्रमाणे सकाळच्या फर्स्ट शिफ्टसाठी मी कामाला गेलो,काम सुरू झाले.साडेअकराच्या सुमारास जेवायला जायचं म्हणून मी प्रॉडक्शन्स डिपार्टमेंटमधून आमच्या प्रॉडक्शन मॅनेजर,सुपरवायझर,माझ्यासारखी तिघे कॅजूअल वर्कर यांच्या सोबतीने जेवायला निघालो..!
फार्मा कंपनी म्हंटले की तिथे बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये एसी कम्पल्सरी असतो किंवा कमीतकमी बाहेरच्या तापमानात आणि डिपार्टमेंटमध्ये असलेलं तापमान यात खूप फरक असतो,आतील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा खूप कमी असते.तर ते उन्हाळ्याचे दिवस होते,आम्ही जेवणाची सुट्टी केली सर्व उपकरणे बंद करून आम्ही सहा जण बाहेर "प्राईमयरी एरिया अँड ड्रेस चॅंजिंग रुम"मध्ये आलो,कंपनीचा विशेष युनिफॉर्म मी बदलवला आणि फ्रेश होवून ब्लॉकच्या मेन गेटवर आलो..!
कुठल्याही फार्मा कंपनीत गेले की तिथे शिस्त खूप महत्त्वाची असते,नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते.मेन गेटवर आलं की तो विशेष गेट असतो जो उघड-बंद केला की आपल्या संपूर्ण शरीरावर वरून हवेचा मारा केला जातो जेणेकरून आपल्या कपड्यांवर,शुजवर थोड्या प्रमाणात असलेली धूळ,डोळ्यांना न दिसणारे जिवाणू त्यामुळे बाहेर फेकले जातात..!
तर मी तो गेट उघडून बाहेर आलो अन् एकदमच आतील थंड तापमानातून मी बाहेरच्या उन्हाळ्याच्या खूप उष्ण तापमानात आल्यानं मला चक्कर आल्यासारखे झाले अन् मी त्या ओट्यावर चक्कर येऊन पडलो.पुढे काही क्षणांत कंपनीची Ambulance आलेली अन् मला कंपनीतल्या छोट्याश्या दवाखान्यात घेऊन गेली.काही प्रथमोपचार करून मला गोळ्या देऊन कँटीनमध्ये जेवणास घेऊन गेले आणि जेवण करून त्या दिवशी मला सुट्टी देऊन त्या दिवशी आराम करण्यास सांगितले..!
आज हे सर्व आठवण्याचे कारण हेच की अलीकडे दिवसेंदिवस वाढणारा तापमानाचा पारा.असं नाही की मी खूप नाजूक आहे शेतात या उन्हाळ्याच्या दिवसात दिवसदिवस लोकांच्या इथे रोजाने मक्का सोंगण्याचे काम मी केलं आहे,शेतात असलेली मेहनतीचे कामे मी केली आहे.परंतु येथील तापमान असो किंवा निसर्गातील हवा याचा कुठेतरी फरक पडतो इतकेच.पण हा अनुभव छान होता म्हणजे फार्मा कंपनीत एका सामान्य कामगाराची किती काळजी घेतली जाते हे तेव्हा किंवा त्याच्या आधीच मला कळलेले होते.त्यामुळेच फार्मा क्षेत्र आजवर माझं आवडतं क्षेत्र आहे काम करण्यासाठी..!
तर दिवसेंदिवस उन्हाचा वाढता पारा गावाला गेलं की दुपारच्याभरी गावात चक्कर टाकली की गाव शांत निपचित पडलेला असतो धरणीमातेशी,कुणी म्हातारे फेटा घालणारे आजोबा फेट्याची उशी करून देऊळाच्या सभामंडपात निपचित शांत झोपलेले असतात.जोडीला त्यांचा पिढीचे त्यांचे मित्र पडल्या पडल्या गप्पा हानीत असता..!
गावातली लग्नकार्य यावर्षी जोमात असल्यानं शेजारच्या माळ्याच्या मंगलकार्यात एक दिवस खाडा न होता भर उन्हात दुपारची लग्नं लागून राहिली आहे.वऱ्हाडाच्या पंगतीच पंगती जेवण करून उठून जात आहेत,गावात नवरदेवाच्या मिरवणुकीचा डीजे अन् त्याच्या तालावर त्याची दारू पिऊन थिरकणारी मित्र त्यांच्यातलाच कुणी रुसवा आल्यानं गावच्या वेशीला लागून असलेला नधडीत बेश्रमाच्या जाळीत गुतून पार उताना पडला आहे..!
गल्लीत जसजसा डीजे येतोय तसतसं गल्लीत माड्या असलेल्या घरातल्या तरुण पोरी अन् नुकतच लग्न झालेल्या सूना नवरदेवाचे गुनगान गात आहे.तमक्याच्या पोरीनी नशीब खोललं इतक्या मोठ्या घरात नांदायला चालली आहे म्हणून गावातल्या सतरा गप्पा आवरता आवरत नाहीये.काही जगाच्या विरहित काम करणाऱ्या बायकांचे पापड,कुरडया करण्याचे अन् वऱ्हाडातील बेवड्या पोरांना नाव ठेवण्याचे कार्यक्रम सोबतच चालू आहे..!
गावातली तरुण पोरं आपल्या लग्नाला कुणी यावं म्हणून बळजबरी बायकांच्या पंगतीत वाढत हिंडत आहे,इकडं माणसांना प्यायला पाणी नाही.जमरू आण्णाला या सगळ्यांशी काही घेणंदेणं नाही.पहिल्या पंगतीला जेवण करून तो त्याच्या खपुड्या घेऊन त्यांना रानात चरायला घेऊन निघाला आहे..!
गावची राजकारणी मंडळीतील एकजण नवरीच्या बापाला सांगत आहे,दाजी लग्नाचा बार भारी उडीवला अन् आहेर न करता टावेल टोपी घेऊन तो त्याच्या फॉरव्हीलरमध्ये आमदार साहेबांची मीटिंग आहे असं खोटं सांगून गावच्या फाट्यावर असलेल्या बारवर प्यायला निघाला आहे चार लोकांना घेऊन.तितक्यात एक कार्यकर्ता आला अन् म्हणतो कसा साहेब एक फोटू होवू द्या..!
गावच्या लोकांच्या जगण्याच्या अनेक तऱ्हा आहे भाऊ गाव धड घोड्यावर चालू देत नाही अन् पाईही चालू देत नाही..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा