मुख्य सामग्रीवर वगळा

आजची भेट :सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.



आजची भेट :
सिध्देश्वर महादेव मंदिर (रत्नेश्र्वर महादेव मंदिर),पिशोर.

मित्रांनो खूप दिवसांनी आज फावला वेळ भेटला.तो भेटलेला वेळ सार्थकी लावायचा म्हणून खूप दिवसांपासून ज्या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती परंतु वेळेअभावी जमत नसल्याने आजवर जावू शकत नव्हतो.अखेर आज योग जुळून आला अन् काही मित्रांच्या समवेत पिशोर येथील "सिध्देश्वर महादेव मंदिर" या ठिकाणी भेट दिली.
ज्यास "रत्नेश्र्वर महादेव मंदिर" या नावाने सुद्धा ओळखले जाते..!

"पिशोर" ही मोठी बाजारपेठ असलेलं असं गाव आहे."महाराष्ट्र" राज्यातील महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "औरंगाबाद" जिल्ह्यातील आणि त्यातच "औरंगाबाद" जिल्ह्यातील सर्वाधिक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेल्या,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या "कन्नड" या तालुक्यात राज्य महामार्गावर वसलेलं पिशोर हे गाव आहे अन् या गावात हे सुंदर असे मंदिर आपल्याला बघायला मिळते..!

हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील बांधणीचे असून,पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते.परंतु जरासे आडवळणी असल्या कारणाने या मंदिरास फारसे भाविक,पर्यटक भेट देत नाही.त्यामुळे मंदिर खूप सुंदर अवस्थेत अन् बघतांना डोळ्यांचे पारणे फेडणारे असे आहे..!
मंदिर शिळांवर,खांबावर केलेले खूप सुंदर,सुबक अश्या शैलीत अन् खूप बारकाईने शिल्पकाम केलेले असल्याने मंदिर बघत असतानी खूप सुंदर अन् बघतच रहावेसे वाटणारे असे आहे..!

"पिशोर" शहराच्या पश्चिमेस एकांगाला उंच ओट्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले असे हे मंदिर आहे.मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा विचार केला तर मंदिर हे देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजे इसवी सन १२५९ ते १२७४ या काळातील असावे असे वाटते.मंदिराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याने अन् माहितीपर असा कुठलाही शीलालेख त्याठिकाणी उपलब्ध नसल्याने फारसा इतिहास या मंदिराबद्दल माहीत नाही..!

खूप जुना इतिहास लाभलेले मंदिर आजही सुस्थितीत आहे.कुठलीही तोडफोड किंवा भग्न अवस्थेत असलेल्या मूर्ती या ठिकाणी नाही.त्यामुळे हे मंदिर पुरातत्व विभागात काम करणाऱ्या नवोदितांना किंवा शिकावू विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरणारे आहे.मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूप शांत असल्याने मन प्रसन्न अन् मंदिराबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची,त्या मंदिरावर अभ्यास करण्याची आपली त्या ठिकाणी नक्कीच इच्छा होते..!
मंदिर रचना : 
मंदिराची रचना ही प्रवेशद्वार,सभामंडप,गर्भगृह अशी आहे.
मंदिर हे दगडांच्या उंच ओट्यावर बांधलेले आहे,प्रवेशद्वारास सहा खांब,सभामंडपास सहा खांब त्यानंतर गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असल्याने षटकोन आकाराचा भास करून देणारे आहे.मंदिराच्या खांबांवर,भिंतींवर आतील बाजूस व बाहेरील बाजूस खूप सुंदर असे शिल्पकाम केले आहे.पौराणिक देवीदेवता,प्राणी यांचे शिल्पकाम याठिकाणी दिसून येते..!


मंदिराच्या बाहेरील बाजूस हनुमानाची मूर्ती आहे,गर्भगृहात सिध्देश्वराची अखंड एका दगडावर कोरलेले पिंड आहे जिला चांदीचे अच्छादन केले आहे.सभामंडपाच्या एका खांबावर भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचलल्याचे शिल्प आहे..!
याच मंदिराच्या पूर्वेस विठ्ठल-रखुमाई यांचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे,जेही सहा खांबा,भिंतींवर उभे आहे.परंतु काळाच्या ओघात पडझड झाल्याने पूरातत्व विभागाने यांची पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते.विठ्ठल-रखुमाई मूर्तीच्या एकांगला रेणुकाआईची मूर्ती आहे जी की अंधारात सहज दिसून येत नाही असे तेथील आमचे मित्र यांनी सांगितले.हेमाडपंथी बांधणीचे मंदिर म्हणून एक उत्कृष्ट कलेचा नमुना ठरावा असे हे मंदिर आहे..!
मंदिर वर सांगितल्याप्रमाणे आडवळणी असल्याने नक्षीकाम,शिल्पकला श्रेणी यांची फारशी माहिती उपलब्ध नाहीये.पर्यटकांच्या नजरेतून सुटलेले असे हे मंदिर कन्नड तालुका पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी पहावे असे मंदिर बघितल्यावर मलाही वाटून गेले..!
आपण या ठिकाणाला भेट देण्यासाठी येणार कसे..?

विमानाने येणार असाल तर औरंगाबाद येथील विमानतळावर आपण उतरला की तेथून प्रायव्हेट वाहने,एसटी महामंडळ यांची औरंगाबाद - कन्नड - पिशोर बससुद्धा उपलब्ध आहे.
रेल्वेने येणार असाल औरंगाबाद पर्यंत रेल्वे आहे व खान्देश भागातून येणार असाल तर चाळीसगांवपर्यंत रेल्वे अन् तिथून एस टी महामंडळ अन् खाजगी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे..!
कन्नड ते पिशोर अंतर - २५ किमी.
औरंगाबाद ते पिशोर अंतर - ८५ किमी.
मार्ग-राज्य महामार्ग.
(पुरातत्व खात्यातील कुणी जाणकार व्यक्तींनी या मंदिरास भेट दिली असेल तर त्यांच्याकडून मला अजुन जास्तीत जास्त माहिती मिळाली तर छान होईल.कारण वर सांगितल्याप्रमाणे या मंदिराबद्दल आजवर कुठलेही लेखन झालेले नाही किंवा तसे दस्तावेज उपलब्ध नाही.)

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...