"जय भीम" या नाऱ्याशी जोडलेली गावची एक आठवण..!
भर दुपारची उन्हं,दुपारची ठरलेली कामे आवरली अन् एका कामानिमित्त आज माझं गाव (आमची शेती-वाडी असलेलं माझं गाव) जवळ केले. गावातली कामे आटोपून परतीच्या वेळेला रिक्षा स्टँडवर येऊन बसलो..!
नेहमीच स्वतःची गाडी सोबत असल्यानं,अलीकडे वर्षानुवर्ष इथे कधी फारसे थांबणे होत नाही.आज नेमकी सोबत गाडी नसल्यानं वाट बघत बसलो कितीवेळ रिक्षा लागण्याची..!
रिक्षा कधी लागते हा विचार करत जवळच्या एका लोखंडी बाकावर वाट बघत बसलो होतो.भर दुपारची उन्हं असल्यामुळे रिक्षा अन् काही ठराविक प्रवासी सोडले तर कुणीही नव्हते रिक्षा स्टँडवर..!
रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना मी न्याहाळत होतो.रिक्षा स्टँडवर तासंतास रिक्षाला कधी सीट मिळेल अन् कधी एकदाचे मी इथून निघेल असे मला झाले होते.हा सर्व विचार करत असतांना बालपणीचे दिवस डोळ्यांसमोरून तरळून गेले..!
लहानपणी शेतातून आलं की या रिक्षा स्टँडवर येण्यासाठी आम्ही पायीच शेतातून निघावे.आईच्या कड्यावर छोटी बहीण,हातात पिशवी अन् आम्ही दोघं भाऊ पांदीने चालत चालत शेतापासून रिक्षा स्टँडपर्यंत दोन अडीच किमी दूर असलेल्या वाटेनं पायी पायी चालत यायचो..!
आलो की इथे कितीवेळ रिक्षा भरेपर्यंत बसून राहायचो,येणारे-जाणारे लोकं न्याहाळत रहायचे.
तेव्हा आमचे कुठले पैसे घ्यायचे रिक्षावाले आम्ही फुकटच बसायचो त्या रिक्षामध्ये.फक्त आईचे तितके पैसे घेत..!
शेतात नेहमीचं येणं असायचं म्हणून सगळे रिक्षावाले,कमांडर जीभवाले तेव्हा ओळखीचे झालेले.त्यामुळे अंधार पडला तरी घरी व्यवस्थित आणून सोडायचे,सकाळी रस्त्यावर आमची वाट बघत बसायचे.आता त्यांच्यातले कुणीच दिसत नाही किंवा त्यांची रिक्षा,जीभही नाही दिसत..!
नंतर शाळा,कॉलेज या व्यापात आमचे गाव दूर झाले ते आजवर.अलिकडे कित्येक दिवस शेताच्या गावाजवळ असलेल्या गावाला नोकरी करत होतो पण तेही सोडले अन् गेले तीन वर्ष गावाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला तो तुटलाच.काही कामानिमित्त आले की तितकेच येणं होतं गावाला आता फार असे नाही..!
मी बसलेलो होतो बसल्या ठिकाणी हे सर्व आठवत होते,उन्हाचे सीट काही येत नव्हते.रिक्षा काही धकत नव्हती पण माझे चालू होते आपलं निरीक्षण करणे..!
उद्या १४ एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.गावच्या रिक्षा स्टँडसमोर साहेबांचा उभ्या अवस्थेत असलेला पूर्णाकृती पुतळा गावात बांधलेला आहे.गावच्या वेशीवरच हा पुतळा असल्यानं गावात जायचं म्हणजे साहेबांच्या या पुतळ्यास वंदन करून जाणे होते..!
संविधानाचे पुस्तक हाती,सुटाबुटात असलेल्या माझ्या साहेबांचा हा उभ्या स्थितीत असलेला हा पुर्णाकृती पुतळा,गावची शान आहे.गावाला खूप मोठा इतिहास आहे पण गावातले लोकं तो विसरून गेली असावी अशी जाणीव अलिकडे नित्याने होत असते..!
"जय भीम" हा नारा सर्वप्रथम कुठे दिला असेल तो आमच्या गावालगत असलेल्या "मक्रणपूर" या गावात.१९३८ साली "औरंगाबाद" जिल्ह्यातील "कन्नड" तालुक्यातील "मक्रणपूर" या गावी "भाऊसाहेब मोरे" या आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती..!
या सभेत स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा उपस्थित होते.त्या सभेत "भाऊसाहेब मोरे" यांनी सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करत असतांना "जय भीम" म्हणत जावू अन् तेव्हापासून "जय भीम" हा नारा देश-विदेशात दिला जातो..!
उद्या साहेबांची जयंती त्यामुळे रिक्षा स्टँडसमोर असलेला या साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रंगरंगोटी करणे चालू होते.निळा ध्वज बदलून नवीन लावण्यात आलेला होता,सभोवतालच्या प्रांगणात रंगरंगोटी करणे चालू आहे..!
भर दुपारच्या तळपत्या उन्हात हे सर्व खूप मनापासून ती तरुण माझ्या वयातली मुले करत होती,मी हे सर्व न्याहाळत होतो. अन् जुन्या आठवणीत रममाण होवून हे सर्व आठवत होतो..!
मला आठवते लहानपणी लवकर रिक्षा लागली नाही की भर उन्हात सावलीच्या आश्रयाला म्हणून साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाशी सावलीत बसून राहायचो,कधीतरी झोपूनही जायचो..!
गाव दूर केला,शहर जवळ केला.गावाच्या फक्त आठवणी राहिल्या अन् आता शहर ओळखीचे झाले.परंतु साहेबांचे तेव्हा मनावर बिंबवलेले विचार मात्र आजही मनावर तितकेच राज्य करत आहेत.हे सर्व खूप सुंदर आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
दादा
उत्तर द्याहटवामाझ्या कन्नड च्या भूमीत