मुख्य सामग्रीवर वगळा

एक वेगळं आयुष्य..!

एक वेगळं आयुष्य..!


दहा-बारा वर्षांपूर्वीचा तो काळ काहीलीच्या उन्हात मी  फुल चड्डी घालून लाल मातीच्या फुफाट्यात चालत होतो.जिथवर नजर जाईल तिथवर लाल मातीचा फुफाटा,दूरपर्यंत डोळ्यांना दिसणाऱ्या पायवाटा,वाळलेले गवत,चपलीच्या आत घुसून पायाला टोचणारे कुसळ अन् डोक्यातून येणारे घामाचे ओघळ टिपत मी चाललो होतो..!

जसं एकदाचं गेटवर आलो तसा अंगाला थंडावा अनुभवयाला आला.क्षणभर घाम टिपून कॉलर नीट केली अन् लाल मातीत माखलेल्या चपलेला डांबरी रस्त्यावर आपटीत-आपटीत मी रस्त्याला लागलो. 

रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी मेहंदीची झाडं लावलेली होती,वेळोवेळी कटिंग केल्यानं ती मस्त उंचीला कमी अन् डेरेदार झाली होती.त्यांच्या सावलीत मी चालत होतो,तेरा वर्षांचा मी उंच असल्यानं त्या झाडांच्या वरच्या फाट्या माझ्या डोक्याला लागत होत्या अन् मी  त्या फाट्याला लागलेल्या कोवळ्या पानांचा मेहंदीचा सुगंध हुंगत हुंगत रस्त्याच्या कडेने चालत होतो..!

दूरवर कुठल्याश्या किड्याचा किर-किर असा आवाज येत होता,उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यानं सगळी पोरं,सर लोकं घरी गेली होती..!

रस्त्यानं मी एकटा चालत होतो मला तरळ भरली अन् मी झाडाला लागून असलेल्या ठिबकच्या नळीतून उडणाऱ्या तूषारास तोंडात धरून ते पाणी पिऊ लागलो.दहा मिनिटं चाललो अन् विद्यालयाच्या कमानी गेटवर आलो,तिथं मस्त गुलाबाच्या फुलांचा बाग असावा अशी झाडं लावली होती..!

गेट जवळ एक तुटकी खुर्ची टाकलेली होती,तिथं एंट्री रजिस्टर होतं मी माझं नाव,गाव,काम सगळं लिहले अन् एक माझी सही हाणून दिली.निपचित त्या खुर्चीवर डोळे लावून पडून राहीलो..!
दहा-पंधरा मिनिटांनी बाकी पाच सहा पोरं आली सर आले अन् मी शाळेच्या पिवळ्या रंगाचा भिंती अन् पांढऱ्या रंगाच्या फरश्या न्याहाळीत त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या खाणाखुणा जागोजाग बघत चालू लागलो..!

पुन्हा एका कागदावर नाव,गाव लिहले अर्ज केला अन् त्यावर फुटू चिपकीला अन् मास्तर पुढं अन् आम्ही मागं करीत चालू लागलो.अखेरला भले मोठे कॉप्युटर असलेल्या रुममध्ये आम्ही आलो तिथं असलेला झावळा अंधुक प्रकाश सरांनी कुठलं बटण दाबले अन् कॉम्पुटर चालू झालं..!

पुढे सर दहा मिनिट काहीतरी सांगत राहिले अन् आम्ही रफ वहीत ते लिहून घेत राहिलmसरांनी मग सगळ्यांना एक-एक करून एका-एका कॉम्पुटरवर बसवलं.इंटरनेट चालू झालं अन् गुगल चालू करायला लावलं सर म्हंटले ते आम्ही करत होतो कॉम्युटरवर चित्र काढले,नाव काढले,सिव्हील इंजिनिअर सारखं दोन-चार घर बांधले अन् मग सर म्हंटले चित्र काढा..!

सर बाहेर गेले अन् आम्ही पृथ्वी असलेल्या चिन्हावर क्लिक करून मराठीत नासा टाईप केलं अन् असंख्य व्हिडिओ दिसू लागले गृह,तारे,यान,अन् माझं आजवर कल्पनेत असलेलं विश्व माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं,मी ते बघत बसलो..!

झावळा-अंधुक प्रकाश असल्यानं अंधारात हे सर्व बघण्यात भारी मज्जा होती,एकदमच लाईट गेली कॉम्प्युटर आपोआपच बंद पडले मग बटन दाबून बंद करायचे की आपोआपच बंद होवून जातात बटन हे मला काही कळलं नाही.काही दहा पाच मिनिटांनी सर आले..!

मग सर म्हंटले चला लाईट गेली आजचं प्रात्यक्षिक संपले,आता आपण थिअरी शिकू.
मग सरांनी दुसऱ्या वर्गात आम्हाला नेले,तिथे त्याच शाळेतील मुलांचे पेन,वही,कंपास,पुस्तक पडलेले होते सरांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे सर्व बघत बसलो.अखेर सरांनी पाठांतर म्हणून काही कॉम्प्युटरशी जोडून असलेले शब्द आम्हाला घरी अभ्यासाला दिले..!

CPU- Central Processing Unite.
MB-MegaByte.
GB-GigaByte.
TB-TeraByte.
गृहपाठ घेतला अन् वर्ग सुटला..!

आलेला रस्ता सोडून मी दुसऱ्या वाटेनं निघालो गुडघ्यापर्यंत वाळलेले गवत अन् त्यात असलेली पायवाट शोधत मी हापश्यावर पोहचलो.भलतीच तहान लागली होती हापश्याला हापसून पोटभर पाणी पिलो,हापश्याला लागून असलेल्या नाल्यात जावून न्याहाळत बसलो वाहणारं पाणी,हिरवं गवत,निळी,पिवळी गवतफुले अन् पंचवीस तीस मिनिट डोळे बंद करून झोपून राहिलो त्या गवतातच..!
अन् अश्या प्रकारे माझा कॉम्प्युटर शिकण्याचा पहिला अन् शेवटचा दिवस संपला..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...