मुख्य सामग्रीवर वगळा

कल्याआईचं मंडळ..!

कल्याआईचं मंडळ..!

पहाटेचे आठ वाजले होते मी अजून अंथरुणात पडून होतो,आईची कामाला जायचं म्हणून काम आवरण्याची लगबग चालू होती.माझी झोप केव्हाच झाली होती पण मी लोळत पडलो होतो अंथरुणात.

आज मायला काम नव्हतं पण आईची जोडीदारीन कल्याआई मायला म्हणली होती की,दिनकर पाटलांच्या मळ्यात एखाद्या वखताला काम राहील काल पाटील मला चौकात भेटले तेव्हा सकाळी कामाचा खुलासा करतो म्हणून कल्याआईला सांगून गेले होते..!

कल्याआई मांगीन आईच्या टोळीची मुकरदंम होती,गावात शेतातली काही कामे असले की गावातले लोकं तिला सांगायची अन् ती तिचं वीस-पंचवीस बायकांचं मंडळ करून त्यांना कामाला घेऊन जायची.सुगीच्या दिवसांत गावात तिचा बोलबाला रहायचा,या दिवसांत गावातल्या सरपंचाला कुणी हुंगायच नाही पण कल्याआईला मात्र सारं गाव शोधत भटकत रहायचं.लोकांना कामासाठी कल्याआई अन् तिचं मंडळ नेहमी लागायचं,कारण कल्याआईची कामातली ईमानदारी,दिलेला शबुद ती पाळायची अन् वखुत पडला तर ती पैश्याला आठ-चार दिसांसाठी शिल्लक थांबायची..!

आईनं बिगीबीगी काम आवरलं अन् मी परसात जातो म्हणून आईला सांगून टरमळं घेऊन नदीच्या अंगाला गेलो.आईचं आवरलं आईला कल्याआई घरला आली अन् कामाचा खुलासा हावचा असला तर पटदिशी निघायला म्हणून दुपारची न्याहारी भाकर,मिरचीचा खर्डा,लोणचं फडक्यात गुंडाळून माय आमच्या कुडाच्या घराला असलेल्या उंबऱ्यावर बसून वेणीफणी करत बसली होती..!

मी परसातून आलो अन् चुल्हांगांवर ठेवलेलं घमील्याततलं पाणी इस्नाला आलं होतं मी ते पितळीच्या बांधलीत ओतलं अन् न्हाणीघरात जावून इसनाला रांजणमधून पाणी घेऊन अंघोळ करत बसलो.कडाक्याचा उन्हाळा असल्यानं अंघोळ करायला अजूनच भारी वाटत होतं,मी अंघोळ करत करत हिमेश रेशमियाच्या आवजातली गाणी म्हणत अंघोळ करत होतो..!

कल्याआई चौकातून बिगीबीगी आमच्या खोपटाकडे वळली तसं मायना मला हाक दिली,छोटे सरकार आवरा लवकर तुमचं बाळंतपण कामाचा सांगावा घेऊन मांगीन म्हातारी आली हायसा.कामाचा हवाला असल तर निघायला लागल..!

मी फटदिशी बादलीतलं सगळं पाणी अंगावर घेतलं अन् टायलानं अंग कोरडे करत आत खोपटात गेलो.तोवर कल्याआई अंगणात आली अन् आईला ओरडू लागली लक्षे अय लक्षे दिनकर पाटलांच्या कामाचा खुलासा आला हायसा..! 

सरकी येचायला पाशेरीवर बोलीले हाय काय करती जायचं का नाय..?
माय आरसा खुंटीला टांगून बाहेर आली अन् कल्याआईला बोलू लागली 
जायचं तुझं सबुद खरं हायसा मायव पण आता सर्कीच्या चार-चार येचण्या होवून गेल्या हाईत पाशेरीवर काय भाव खाईल माय त्यो कापूस रोज भी नाय निघायचा माय आपला..!

तुझं सबुद खरं हाय लक्षे पर आपल्याला बी कुठशिक काम हायसा आज मग जावूत की तेव्हडचं तेला-पाण्याला पैका होतील सौ-पचास,अन् पाटील बरसदीच्या दिसाला आपल्याला मोप काम देतूया मग जावा लागत असा,काय म्हणीस तू..?
मग ठीक हाय माय जावा लागीस,पर शांता,कोळ्याची सुमन,रखमा,कला बंजारीन सबिना आपा यांना संगतीला घे म्हणजे लवकर उरकून घ्यायला होईल कपास..!

अगं त्या यायला हायसा तुझाच खुलासा घ्यायला मी आली हाय मग चालस का तू लक्षे..?
हा चालस माय चालस..!
चल मग त्या बी निघाल्या हायसा,आपल्याला चौकात भेटतीला..!
माझी भाकर घे व लेकी लक्षे आज म्या केली नाय पहाटेला वखुत झाला मला उठायला,कल्याआई मायला म्हणली..!

मी भांग पाडला अन् बुटाड घालून गावात हिंडायला निघालो होतो,मायना कल्याआईची भाकर धुडक्यात बांधून घेतली अन् घराला कडी कोंडा घालून माय डोईवर भाकरीचे पेंडके घेऊन कल्याआई संगतीना निघाली.मायना उटळ माझ्याजवळ दिलं अन् मी ते करदुड्यात फाशी देऊन मायच्या मागमाग चौकात आलो,त्यांच्या मंडळातील रोजंदारनी आल्या होत्या..!

म्या कल्या याडीला बघून तिला म्हंटलं,
याडीये कशेर नंगाळ लामेलीछी तु दुपारेती बाटी खामेल..?
कल्यायाडी बंजारीन म्हंटली,
छोटं सरकार रिंगळा र नंगाळ अन् बोंभलार खुडी लामेलीछी..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...