लोकप्रभा अंत एका पर्वाचा..!
काल "लोकप्रभा" साप्ताहिक बंद पडल्याची माहिती मिळाली आणि माझं बालपण,बसस्टँडवर,स्टॉलवर बसून विकलेल्या वृत्तपत्रांच्या संगतीने विकलेले लोकप्रभा साप्ताहिक अन् ते सर्वच क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले..!
काय असतं आपल्या बालपणात आपण जेव्हा वाचायला शिकत असतो,तेव्हा आपल्याला एका गोष्टीचा ध्यास लागलेला असतो की आपल्याला जे काही नजरेस पडेल त्या शब्दांना आपण जोडून-जोडून वाचत असतो,त्याबद्दल मनात विचार करत असतो.लोकप्रभा साप्ताहिकाचा आणि माझा प्रवास माझ्या आयुष्यात इथपासून सुरु झालेला आहे,त्यामुळं या साप्ताहिकाशी एक नाळ जुळलेली होती..!
मला आठवतं स्टॉलवर मी पेपर विकायला बसलो की फावल्या वेळात करिअर मंत्र,स्मार्ट सोबती,हॅलो डॉक्टर,मुक्तरंग,मुक्तपीठ,मंथन,बालमित्र,कुबेर,मैत्र,दीशा,मधुरिमा,ऑक्सिजन या वारानुसार असलेल्या पुरवण्या वाचत बसायचो.त्या वेळच्या बालमनाला हे खाद्य खूप आवडायचं,एकवेळ मी वृत्तपत्र वाचणार नाही पण या पुरवण्या आवर्जून वाचत असायचो..!
वेळेनुसार या सर्व पुरवण्या किंवा यातील काही पुरवण्या बंद होत गेल्या अन् वृत्तपत्रात एक भकासपन अनुभवायला मिळाले.
मला आठवते ज्या दिवशी बालमित्र ही पुरवणी यायची तेव्हा-तेव्हा मी सायकलवर पेपर घेऊन गेलो की बऱ्याच घरातील लहान लहान मुलं ओट्यावर येऊन माझ्या हातून पेपर घेऊन ओट्यावर ती पुरवणी वाचत बसायची..!
हेच दिवस तरुण मुलं,मुलींच्या बाबतीत मी करिअर मंत्र आणि स्मार्ट सोबतीसाठी अनुभवले.मी स्वतः या दोन्ही पुरवण्या हाती पडल्या की पहिले त्या वाचून घेत असायचो अन् मग वृत्तपत्राचा वाटपाचा माझा रोजचा कार्यक्रम.एखाद्या शुक्रवारी एखाद्या वृत्तपत्रात हॅलो डॉक्टरची पुरवणी टाकायची राहून गेली तर वृद्ध आजी-आजोबांचे खाल्लेले बोलणे मला आजही आठवतात..!
मग ती पुरवणी मिळवून दुसऱ्या दिवशी त्या आजी-आजोबांना नेऊन दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान खूप काही देऊ करणारे असायचे..!
गेले जवळजवळ सहा महिने मी वेळोवेळी दै.सकाळ वृत्तपत्राच्या "मैफल" या सदरासाठी लेखन करतो आहे.आज लेखन दिले की उद्या वाचकवर्गाचा मिळणारा भरघोस प्रतिसाद अनुभवणे हे सर्व खूप सुंदर आहे,त्यामुळं हा आनंद काही औरच असतो..!
काळाच्या ओघात प्रिंट मीडियातील अनेक अंक,मासिकं,साप्ताहिकं मागे पडली आणि त्यांची जागा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अनेक मासिकं,साप्ताहिकं यांनी घेतली.काही मासिकांनी काळाच्यासोबत पुढे जाणं पसंद केलं अन् आपलं रूप डिजिटल करून घेतलं परंतु तिथे मिळणारा प्रतिसाद हा फारसा असा खास नव्हता अन् मग इथेही अनेक मासिकं,साप्ताहिकं बंद झाली..!
आजमितीला अनेक वेब पोर्टलसाठी मी लेखन करतो,डिजिटल साप्ताहिकं अन् मासिकं यांच्यासाठी लेखन करतो.या ठिकाणी मिळणारा एक ठराविक प्रतिसाद बघितला की हे सर्व नकोसे वाटते अन् मीडिया क्षेत्राला एक वळण मिळाले असे वाटायला लागते..!
माझीही खूप दिवसांपासून "लोकप्रभा" साप्ताहिकासाठी लेखन करण्याची इच्छा होती पण सुरुवात कुठून करावी..? कशी करावी..? हे प्रश्न सोबतीला होते..!
तीन-चार दिवसांपूर्वी औरंगाबादेत एका जैष्ठ साहित्यिक,लेखकांची भेट झाली अन् त्यांच्यासोबत बराचवेळ लिखाणाच्या गप्पा रंगल्या.त्यांनी मला लोकप्रभा साप्ताहिकासाठी केलेलं लेखन,त्यांना मिळालेलं मानधन,संबंधित अनेक दस्तावेज अन् अनेक लोकप्रभाचे अंक त्यांनी मला दाखवले..!
"लोकप्रभा साप्ताहिक बंद होत आहे अन् आजवर तुम्ही केलेलं लेखन यासाठी लोकप्रभा आपले आभार मानते" हा त्याच रात्री त्यांना आलेला संदेश त्यांनी मला दाखवला अन् माझी "लोकप्रभा" साप्ताहिकासाठी लेखन करण्याची इच्छा तिथेच मावळतीला गेली..!
बरेच लेखन होईल अनेक सदरासाठी,वेब पोर्टलसाठी,डिजिटल अंकासाठी मी लेखन करत राहिल परंतु या अश्या साप्ताहिक आणि मासिकात लेखन करण्याची जी मज्जा आहे ती या माध्यमांना नाही,हे सतत जाणवत राहील..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा