तुझ्या आठवांचा दरवळ..!
माणसं जोडायला हवी आहे,आठवणींचे क्षण जेव्हा आठवांचे होवून डोळ्यासमोरून तरळून जातात तेव्हा आपसूकच तुझ्या आठवणींचा दरवळ माझ्या समीप येऊन मला भेटून जातो..!
काही व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात आपल्याला त्या प्रत्येक श्वासासम असतात.ज्या आपल्या जगण्याला कारणी असतात किंवा कारणी ठरतात..!
नेहमीसारखीच कालची पहाट तुझ्या आठवांचा दरवळ माझ्या साखरझोपेत घेऊन आली अन् कालची माझी पहाट त्या सुंदर दरवळात नखशिखांत न्हावून निघाली..!
कालचा संपूर्ण दिवस हा आठवांचा दरवळ माझ्या संगतीने होता,माझ्या मनावर रूढ झाला होता.चेहऱ्यावर खूप दिवसांनी पुन्हा एकदा अशी अनामिक का होईना तुझी भेट झाली त्यामुळं एक ग्लो होता.आपल्या अनामिक नात्यातील सर्वच कुठल्याही बंधनात न राहून जखडलेल्या सर्वच आठवणींना मी काल मोकळीक दिली होती..!
खरं सांगायचं तर आठवणींवर लिहायला घेतलं की मी आठवणींचा होवून जातो,त्यामुळे हल्ली या विषयवार गेले कित्येक वर्ष लिहायचं सोडून दिलं आहे.हे सर्वच आता इतकं अनोळखी वाटतं की लिहायला आता शब्दांची सोबत नसते..!
तुझ्या आठवणींचा दरवळ असतो,नसलेली तू सोबत असते,सोसाट्याच्या वाऱ्यात आपल्या ठरलेल्या ठिकाणांना भेटून येणं होतं पण या सर्वच गोष्टींना जेव्हा लिहायला घेतो तेव्हा मात्र माझे शब्द माझ्याशी फितूर होतात..!
मी हल्ली अनेक ठिकाणी जात असतो जिथं साहित्याला,लिखाणाला घेऊन बोललं जातं.बहुतेकांचा हा समज आहे किंवा अनेकांना असे वाटते की कवीची कविता करायला सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तो प्रथमतः कुणाच्या प्रेमात पडतो अन् लेखकाची लिखाणाला तेव्हाच सुरुवात होते जेव्हा तो प्रेम या शब्दाच्या पलिकडे त्याच्या व्याखेतून गेलेला असतो.थोडक्यात तो जेव्हा विरहाला जवळ करत असतो..!
हे नेहमीचं आहे अनेक ठिकाणी मी हे ऐकतो अन् अनेकांना हे सर्व पटते..!
असंच आठवते साधारण लॉकडाऊन होण्यापूर्वी एका महाविद्यालयात एका छोटेखानी काव्य संमेलनात मला बोलावलेलं होतं.संमेलन झाले अपेक्षेपेक्षा छान प्रतिसाद मिळाला,शेवटी एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असावा..!
दादा तू ज्या काही दोन-तीन कविता आम्हाला ऐकवल्या त्यात फक्त आम्हाला दुःख नजरेस पडलं,कुठेतरी समाजभान,समाजाचे आपण काही देणं लागतो हे तुझ्या कवितेतून दिसून आलं पण तू प्रेमावर कधी कविता नाही केलीस का..? किंवा तुला नाही झालं कुणावर प्रेम ज्यासाठी त्या व्यक्तीवर तू कविता करावी..!
अन् खरच मी ही या प्रश्नाला काय उत्तर द्यावं असं मला झालं होतं कारण ज्या काही तोडक्यामोडक्या कविता मी आजवर केल्या होत्या त्यात प्रेम कुठेच नव्हते.कारण माझ्या कविता फक्त दुःखाला जवळ करणाऱ्या होत्या बस जसं लिहले आहे तसंच उत्तर देऊन मी निघालो..!
पुन्हा त्याच विद्यार्थ्याने माझा ऑटोग्राफ हवा म्हणून वही पुढे केली,आज पहिल्यांदा कुणीतरी आपला ऑटोग्राफ घेत आहे म्हणून मी ही खुशीत सही करून तिथून निघालो.त्या मुलाचा प्रश्न ज्याला मी तूर्तच उत्तर देऊन टाळले होते,त्याला मात्र मला माझ्या मनात अपेक्षित उत्तर जे हवं ते मी शोधत होतो..!
खरं सांगायचं तर दुःखाने इतकं जवळ केलं की प्रेमावरच्या कविता करायलाही घेतल्या तर त्या जमल्याच नाही.त्यातून आपोआपच दुःख प्रेमापेक्षा जवळचं वाटायला लागलं अन् त्या दुःखाच्या मी कविता करत बसलो.जिथं कुठं यमक जुळत नव्हतं,जिथं कुठं शब्दांची सांगड मला नीट घालता येत नव्हती अन् सगळंच बेफिकीर वाटल्यागत असायचं जे पानावर शब्दातून कैद व्हायचं..!
असो तुझ्या आठवांचा दरवळ सोबतीला अन् अनामिकच तुझी भेट म्हणून हे सर्व..!
अधुरे अधूरे वाटणारे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा