रातराणीचे फुल..!
पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत विंडोग्रीलच्या पडद्याशी माझे अन् उन्हाचे खेळ चालू होते,मी ही सावलीशी खेळत बसलो होतो.खिडकीत असलेला रातराणीचा वेल बहरलेला आहे,त्याची रात्रीच उमललेली फुलं पहाटे सकाळीच सुखून पायाशी लोळण घेत चहूकडे सर्वदूर घरात पसरलेली आहे.
रात्रभराचा त्यांचा घरात असलेला सुगंध अन् पहाटेला अंगणात फुललेला प्राजक्त अन् त्याचा सुगंध हा खेळ मला माझ्या लेकीचा घरात ये-जा करत सर्व घरात घिरट्या घालत दुडू दुडू फिरणाऱ्या तिच्या पावलांच्या खेळाप्रमाणे भासतो..!
तशी ती आज गेल्या पावली खूप दिवसांनी तिच्या आजोळी पुन्हा येऊन गेली,पोलकं अन् केसांचा एक जिठ्ठु घालणारी लेक आता खूप मोठी भासायला लागली आहे.मामाच्या सवयी तीन वर्षांच्या लेकीला आता कळायला लागल्या आहे,त्यामुळं मामाने तिला तिच्या कलाने घ्यायला हवं तर ही तीन वर्षांची लेक आता तिच्या कलाने मामाला समजावते,लाड करून घेते..!
तिच्या आई इतकीच किंवा किंचित जास्तीच समजदार निघाली असे भास होतात हल्ली तिच्या वागण्या बोलण्यातून..!
गेल्या पावली आज पुन्हा आजोळी आली आजीच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाला घिरट्या घालू लागली तिच्या घुंगरांच्या पैंजनांचा आवाज रातराणीच्या सुगंधाप्रमाणे दरवळत माझ्यापर्यंत आला अन् लेक आली कळलं तसं तिला अलगद उचलून घेतलं अन् आता तिला मामाच्या कड्यावर आकाश ठेंगणं झालं होतं,आकाश अंगण एक झालं होतं,आकाशाशी ती गोष्टी करू लागली होती..!
एरवी सर्व घरात जिथली वस्तू तिथं अन् सर्व कसं नियमबद्ध असल्यासारखं असतं पण आज लेक आली अन् लंका झालेल्या घराचं गोकुळ करून गेली,लहान मुलं असावी प्रत्येक घरात ती याचसाठी.पैंजण घातलेले तीचे गोड पाय आज सर्व घरात छून-छून करत घिरट्या घालत होते मी न्याहाळत होतो तिला,कधीतरी मामाला बघून पडवीत लपून मामाला शोधायला बोलावणं तर कधी मामाच्या मागून येऊन डोळ्यांना नाजूक हातांनी बंद करत मी कोण आहे म्हणून प्रश्न करणं..!
हे सुख अनुभवायला लेक हवी असते..!
सांज झाली अन् परतीच्या वाटा खुणावू लागल्या,उद्याचे व्यवहार खुणावू लागले.तिचाही नको जायला म्हणुन चेहरा हिरमुसला अन् मला तर तिनं नको जाणं हवं होतं पण लेकीचे माहेरपण हे काही दिवसांचे तिला या वाटा काही घटकांसाठी खुल्या होतात अन् काही घटकांसाठी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायला म्हणून खुल्या होवून खुणावू लागतात,उद्याचे कामे मग डोळ्यांना दिसू लागतात..!
दिवसभर सगळ्या घरात बागडून सांजेच्यावेळी झोपाळ्यावर झोपलेली लेक नको असतांना मग उठवावी लागते,तिला हवा असणारा मामाच्या हातांचा गंद-पावडर,टिकली होते,मामाच्या हाताने तिचे कुरळे केस फणीने विंचरून होतात,शिट्यांची बुटं पायात घातली जातात अन् परंतु दिवसभर सर्व घरात फिरून-फिरून पैंजनातील घुंगरू अस्ताला जाणाऱ्या सुर्याच्या कलेप्रमाणे निपचित शांत होतात..!
लेक पुन्हा आईच्या कड्यावर झोपी जाते,गंद पावडर केलेली लेक यावेळी विश्वातील सर्वात गोड लेकरू भासत असते.मी हातात बॅग घेऊन दारापर्यंत येतो पुन्हा झोपी गेलेली लेक,तिची आई सासरची वाट जवळ करायला म्हणून निघून जाते..!
आता अंगणात पडलेला प्राजक्तांच्या फुलांचा सडा सुखून गेलेला असतो,तितकाच जितका लेक गेल्यामुळे माझा चेहरा सुखलेला असतो.मी येरझऱ्या घालत असतो विंडोग्रीलच्या खोलीत अस्वस्थ वाटू लागत असतं,सूर्यही अस्ताला गेलेला असतो अन् रातराणीच्या फुलांचा सुगंध आता चहूकडे पसरलेला असतो..!
जसजशी रात्र सरत असते तसतशी रातराणीच्या फुलांची कळी खुलत असते अन् मी चिमणीच्या उजेडात सावलीशी खेळ करत भिंतीवर आलेल्या माझ्या प्रतिबिंबात माझ्या लेकीचा हात जो डोळ्यांवर असतो तो शोधत असतो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा