मुख्य सामग्रीवर वगळा

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

मानवजातीची एक गोष्ट मला खूप आवडते,ती ही की तो एकावेळी दोन आयुष्य जगत असतो.एक कल्पनेतील आयुष्य तर दुसरे वास्तवातील आयुष्य.
वास्तवातील आयुष्याला घेऊन समाधानी असा कुणी नाही,सर्व काही असूनही या वास्तव आयुष्यात आपण कुठल्यातरी एका त्या अनामिक गोष्टीचा शोधार्थ विचार करत असतो,भटकत असतो.त्यामुळं आपण नेहमीच एका उंचीला जावून विचार करत असतो..!

अश्यावेळी काही गोष्टी पूर्णत्वास येतात किंवा काही आपण पूर्णत्वास नेऊ शकत नसतो,ज्यांना अपूर्णत्व प्राप्त होते..!
माझ्या बाबतीत काही अश्याच गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी मी कल्पनेतील विश्व अन् त्याच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आहेत,म्हणजे कधीतरी पुस्तकात असो किंवा इतरांच्या संवादातून मला माझ्या मनात मी निर्माण केलेल्या जागेबद्दल बोलणे झाले की ती समोरची जागा आपण जी संवादात बोलत आहोत तिची मनात ती ठरलेली आकृती निर्माण होते.माझ्या कल्पनेच्या विश्वात मी प्रवास करू करतो..!

हे कल्पनेतील जग खूप सुंदर अन् त्याला कुठलीही वास्तवाची झळ न लागलेलं असं आहे.त्यामुळे इथला माझा हा प्रवास खूप सुखाचा अन् रमणीय असा आहे,जेव्हा या कल्पनेतील जगाला किंवा ठिकाणांना मी वास्तवात भेट दिली तेव्हा मला भेटलेले ते ठिकाण माझ्या कल्पनेतल्या आकृतीपेक्षा फार असं वेगळं नव्हतं..!
अलीकडे कधीतरी निराशा हाती येते अन् भ्रमनिरास होतो काही गोष्टींच्या बाबतीत पण एक अनामिक समाधान हे चेहऱ्यावर अश्यावेळी आलेलं असतं..!

तर असेच काही महिन्यांपूर्वी "हर्मन मेलव्हील" यांचे "तैपी" हे पुस्तक वाचले.गेले काही महिने मी त्या पुस्तकातील हे जगणं कल्पनेत अनुभवत राहीलो.वास्तवात अगदी हुबेहूब तसच डोंगरदर्यात मांडीपर्यंत येणाऱ्या गवतात भटकत राहिलो,पुस्तकातील त्या जमातीचे नाही पण माझ्या जवळपास असलेल्या पाच-पन्नास किलोमीटरमधील आदिवासी जमातीतील माझ्या बांधवांचे जनजीवन अनुभवत राहिलो.
परिणाम हा होता की "हर्मन मेलव्हील"ने जे काही या पुस्तकातून आपल्या समोर उभे केले आहे,ते वर्णन अन् ते जीवन खूप सुंदर आहे.म्हणजे सामान्य व्यक्ती ते जीवन जगण्याचा विचार करणार नाही अन् केलाच तर त्या अवस्थेत असलेलं जीवन तो फार काळ जगू शकत नाही असे काही आहे..!
त्यामुळं आजवर वाचनात आलेलं हे सर्वाधिक आवडतं असं माझं पुस्तक आहे..!
हे झालं पुस्तकाची जोड घेऊन कल्पनेतील जगण्यात विहार करणं..!

असंच काहीसं मत माझं काही शहरांना अन् काही गावांना लोकांनी केलेल्या वर्णनातून मी मला काय वाटतं अन् माझ्या नजरेत ते कसं असेल हे मनात दडवून ठेवलं आहे.वेळोवेळी त्या ठिकाणांना मी कल्पनेत भेट देऊन येतो,स्वाभाविक बघता काहीसं विचित्र वाटणारं हे सर्व आहे पण त्याला मिळालेली कल्पनेची जोड हे जग अन् तो काल्पनिक सहवास अजूनच मला  समृध्द करतो किंवा हळवा करून जातो असं कधीतरी मला वाटते..!

अशी अनेक शहरे,प्रांत,अन् न बघितलेली ठिकाणं आहे की मी ज्यांची माझ्या कल्पनेच्या विश्वात एक आकृती निर्माण करून ठेवली आहे.तिथे कल्पनेतच मला काही चांगल्या वाईट माणसांचा सहवास लाभला आहे,त्यामुळं कित्येकदा ठरवूनही मी त्या ठिकाणांना भेट देणं वास्तवात टाळत राहिलो..!
कारण एकच होतं की,माझ्या मनात मी जे काही आकृतीबंध त्या ठिकाणाला घेऊन निर्माण केले आहेत त्यांना कुठेही हानी पोहचू नये.कारण तिथे अनपेक्षित असं काहीसं मिळालं की माझा होणारा भ्रमनिरास अन् मग मला नकोसा होणारा त्या ठिकाणाचा सहवास हे सगळं गुंतागुंतीचे आहे..!

तर असंच एक ठिकाण सांगतो की ज्याची माझ्या मनात मी तयार केलेली आकृती आहे,ते म्हणजे गोवा राज्य..!

गोवा जेव्हा माझ्या मनात येऊन जातो तेव्हा मला फार कमी क्षणांसाठी जो गोवा डोळ्यांना दिसतो तो जो की चैनीचा,मज्जा करत समुद्र किनाऱ्यावर सूर्य किरणांचे झरोखे अनुभवत निपचित पडून राहण्याचा असा आहे..!यापुढे बहुतांश वेळी मनातला गोवा कसा असेल तर समुद्र किनाऱ्याच्या चहूबाजूंनी डोंगर,दर्या,लगतच सहज चडून जाता येईल अश्या टेकड्या अन् टेकड्यांवर असलेली उंच उंच माडाची झाडं,सुपारीची झाडे.

नारळाच्या झाडावर चढून त्या तोडलेल्या नारळाला ATLAS सायकलला मधोमध असलेल्या दांडीवर ते नारळे काथीच्या दोरीने बांधून ते सायकल लोटत घेऊन येणारा तो धोतर घातलेला बाबा.किनाऱ्याला लागून असलेल्या दुकानांत मासे ठेवायचे छोटेसे असलेले डीफफ्रिज ज्यांच्यामध्ये बियरच्या बॉटल्स अन् त्यांना पित पोतड्यावर बसलेले कित्येक तरुण,म्हातारे जे की काळे अन् मजबूत बांध्याचे आहे.माझ्यासारखे नव्याने गोवा फिरायला आलेले लोकं या झोपड्या असलेल्या गल्ल्या फिरत आहे,असंख्य विक्रेते पण त्या ठिकाणी हालचालीत आलेलं हळुवारपण..!

सांजेच्या वेळी रापनीला जमा झालेले मासेमारी करणारे माणसं,कंदिलाच्या उजेडात जाळे मोकळे करत आहे,एकांगाला एका झोपडीवजा घरात चुल्हीवर मासे-भात शिजत आहे.एक म्हातारा बिडीचे झुरके घेत लाकडी तावदाण असलेल्या घराच्या उंबऱ्यावर बनियनवर अन् थ्रीफोर्थ चड्डीवर बसलेला आहे घरात पाणी सांडले आहे पण कुठे कुठे ते सुखलेले आहे,त्यावर माश्या गुणगुण करत आहे..!

सांज ढळली की माझ्या नजरेतील गोव्याच्या हालचाली या एकदम हळुवार होतात मला गोव्यातील पोर्तुगिजांच्या कालखंडातील फार जुने असलेले चर्चे खुणावू लागतात.तिथं जीवाला एक समाधान अन् शांतता मिळते म्हणून मी कितीवेळ चर्चेमध्ये एकटाच मंद प्रकाशात प्रार्थना करत बसलेलो असतो..!
सांजेच्या वेळी माझ्यामते गोव्यात रोज किनाऱ्यावर ढगाळ वातावरण अन् वारा असतो त्या वाऱ्यात अन् अंधुक प्रकाशात मी माझे उडणारे केस सावरत जॉकेटमध्ये हात घालून गोव्यातील जुने घरं न्याहाळत भटकत असतो असं खूप खूप काही आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...