मुख्य सामग्रीवर वगळा

मुसाफिर..!

मुसाफिर.!

नेहमीप्रमाणे सायंकाळ होते अन् मी माझं नेहमीचं सायंकाळचे फिरायला घराच्या बाहेर पडतो.घरापासून असलेल्या सिमेंटच्या रस्त्याने मी चालत राहतो,सायंकाळ होण्यास बराचवेळ बाकी असल्यानं कॉलनीतील सर्वच घरांचे दरवाजे बंद असतात,कॉलनीत सामसूम वाटत असते.
माझ्या शुजचा आवाज अन् रस्त्यानं घरे,रस्त्यानं ये-जा करणारी माणसं,बंद-चालू होणारी स्ट्रीट लाईट न्याहाळत मी चालत असतो.काहीवेळ चाललो की लाल मातीच्या जमिनीवर मी चालायला लागतो,मग सिमेंटी रस्ते मागे पडतात.लाल मातीच्या रानात एका सरळ रेषेत चालून चालून तयार झालेल्या पायवाटेने मग मी चालत राहतो..!

आता घरे मागे पडलेली असतात,दूरवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचे रान अन् या पायवाटा.लाल मातीच्या फुफाट्यात पडलेल्या बुटांच्या अनेक नक्षी न्याहाळत नवीन बूट कोणता,चप्पल कोणती हे बघत मी चालत असतो.दूरवर कुत्र्यांचा सुळसुळाट त्यांचा भुकण्याचा आवाज ऐकू येत असतो.चीनच्या भिंतीप्रमाणे असलेल्या नवोदय विद्यालय अन् कॉलेजच्या भिंती पलिकडे असलेल्या निरगलिच्या झाडांच्या पानांचा सळसळ वाऱ्याच्या झुळकेने येणारा आवाज अन् त्याच वाऱ्यामुळे माझ्यापर्यंत येणारा त्या झाडांचा दरवळ.
मी एकटा आहे,एकटाच चालत असतो.आता लाल मातीच्या रानातली पायवाटा मागे पडून डांबरी रस्त्याला मी लागलेला असतो..!

आता थोडीबहुत माझ्यासारखी एक्कलकोंडी माणसे एकटी एकटीच बाहेर फिरायला निघालेली असतात,माझं त्यांना न्याहाळणे चालू असते.त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून मनोमन विचार करणे चालू असते,तेही कदाचित हेच करत असावे कारण एक्कलकोंडी माणसे अशीच असतात.निरीक्षण करणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो.
डांबरी रस्त्याने दीड-दोन किमी चालले की येणारी-जाणारी माणसे,वाहने,उसतोडीच्या परतीच्या वाटेला लागलेल्या टायर गाड्या अन् पुन्हा ही एक्कलकोंडी माणसे मी न्याहाळत चालत असतो.साडेपाच झालेले असतात त्यामुळे बँक,फायनान्ससारख्या क्षेत्रात काम करणारी माणसे वैतागून वैतागलेला चेहरा घेऊन घरी परतीच्या वाटेनं घराकडे निघाली असतात,त्यांचा टापटीपपणा त्यांचा हुद्धा काय आहे हे ओळखायला सोप्पा करतो..!

इतके सर्व चालून झाले की मी रस्त्याच्या एकांगाला असलेल्या लाल मातीच्या अन् काळ्या खडकाच्या रानात खडकावर जावून एकटा बसून राहतो.माझ्यासारखी एक्कलकोंडी माणसे ज्याच्या-त्याच्या खडकावर बसून हे सर्व न्याहाळत असतात.दूरवर नुकतीच रिटायर्ड झालेल्या आजोबांची एक टीम त्यांच्या आठवणींना शब्दांनी उजाळा देत त्यांचे नोकरीचे अनुभव एकमेकांना सांगत असतात,दिसायला सगळे कसे टापटीप असतात..!

मी ही माझ्या खडकावर बसून रस्त्यानं जाणारी,येणारी माणसे बघत विचार करत बसलेलो असतो.मग ती व्यक्ती मला माझ्या नजरेला भेटते,जिचा मी रोज विचार करत असतो,वाट बघत असतो..!

होय तीच ती व्यक्ती,जी रस्त्यानं चालतांना मला रोज भेटत असते.गवंड्याच्या हाताखाली जाणारी ती व्यक्ती माझा फिरायला जायचा वेळ अन् तिचा दिवसभर काम करून,वाळूचे घमीले वाहून थकून पार वाकून गेलेली ती साठीतील व्यक्ती तिचा परतीच्या वाटेनं जायचा वेळ एकच असतो.
अलीकडे रोजच भेटतो तोही,एका हातात तीन तळी डब्बा अन् एका हातात कधी कधी कामावर घालायचे कपडे असलेली पिशवी घेऊन तो चालत असतो.शेजारच्या गावातला असल्यानं तो दिवसभर काम करून थकून जात असल्यानं रस्त्यानं हळू हळू चालत असतो..!

चालता चालता थांबून मागून येणाऱ्या गाडीला न्याहाळत असतो,त्याच्या गावातले कुणी ओळखीचे असले की त्यांना हातातला डब्बा वर करून थांबायला सांगत असतो.कुणीच थांबत नाही पण तो चालत असतो थांबत असतो,हात देत असतो अन् मी हे सर्व न्याहाळत असतो.रोजच त्याची अन् माझी या वेळेला भेट होत असते.कधी बोलणं नाही की कधी काही नाही पण हे आमचं भेटणं रोजचे असते.

एक गोष्ट मी त्याच्या या अश्या वागण्यातून कैद केली की,तो बळजबरी कुणाला त्यांच्या गाडीवर बसवून घ्यायला करत नाही किंवा आवाज देत नाही फक्त हात देतो.कुणी थांबले तर मुकाट्यानं खुश न होता गाडीवर बसतो अन निघून जातो,कारण त्याला माहीत आहे रोजचे आहे हे आपले.त्याचं एक विशेष अप्रूप यासाठीही वाटलं की तो टापटीप पोशाख असलेल्या गाडीवाल्यांना कधीच हात देत नाही किंवा लिफ्ट मागत नाही.
कारण मी समजू शकतो,एक अनामिक समाधान त्याला भेटलं की मला वाटते.त्यामुळे असं त्याचं रोजचं वाट बघणं असतं खडकावर बसून..!

दर सोमवारी बाजाराच्या दिवशी एखाद्या आठवड्याला त्याची भेट होत नाही पण एखाद्या सोमवारी झाली की त्या दिवशी तो खूप छान टापटीप असा असलेला भेटतो.त्याच्या हातात असलेली बाजाराची पिशवी घेऊन तो चालत असतो,त्याच गतीने ज्या गतीने तो रोज चालतो.लोकांना हात देतो कुणी भेटले की निपचित गाडीवर बसतो अन त्याच्या घराकडे निघतो.यात त्याला काहीही वाटत नाही कींवा कुठला आनंद,त्याला भेटलेली लिफ्ट मी बघितली की मला मात्र हल्ली आपसूकच आनंद होतो..!

मग मी विचार करत बसलेलो असतो त्याच खडकांवर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना न्याहाळत..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...