कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो.....
त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लिखित स्वरूपात तरी माझ्याकडे आठवणीत राहतील. कधी कधी ती डायरीचे पान पलटी केली तर येईल ते पानही समोर अन् ती आठवणही.....
तर तो दिवस नेहमी सारखाच भासत होता,मी पण आवरले अन् परिक्षा असलेल्या ठिकाणी वेळेच्या एक तास आधीच जाऊन तिथं उपस्थित होतो.....
म्हणजे माझी ही सवय आहे,की मी कुठंही ठरवून दिलेल्या वेळेच्या कमीत कमी ३०मिनिटे आधी जातो मग काम कोणतेही असो कुणाला भेटणे असो,केव्हा कामा निमित्त असो पण दिलेली वेळ पाळायला मला आवडते.....
नेहमीप्रमाणेच मी तिथे पोचलो,मग पुन्हा एकदा पाठांतर म्हणून मोबाईल मध्ये असलेली पीडीएफ फाईल मी वाचत बसलो होतो.परीक्षेचे टेन्शन होतेच,सवयी प्रमाणे परिसर न्याहाळत होतो.....
समोर इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं मुली ये-जा करत होत्या,परीक्षसाठी साठी येणारे मुलंही हळू हळू येत होती. मी झाडाला केलेल्या त्या छोटेखानी भिंती वर बसून वाचत होतो.....
कुणी हातात चहाचा कप घेऊन चाले होते,कुणी मोबाईल मध्ये काड्या करत चाले होते,कुणी चमच्याने पोहे खात चाले होते,कुणी चहा टोस्ट खात चाले होते,एकूण ही इंजिनिअरींगचे मुल- मुली फार व्यस्त भासत होते.....
माझेही माझा वाचनाकडे लक्ष होते,तितक्यात मला एक मुलगा मुलगी दिसले.त्यांना बघून वाटले लिहून टाकावे काही तरी यांच्या बद्दल डायरीत,म्हणजे त्यांच्या बद्दल मला प्रश्नच भरपूर पडले ज्यांना नेहमी प्रमाणे उत्तरे नव्हती.....
तर झाले असे की तो साधारण बाविशितला तरुण अन् ही साधारण वीस एकवीस वर्षाची तरुण मुलगी असेल.तो सुद्धा परीक्षेला आलेला होता असे मला वाटत होते,तो माझा आधी इथे येऊन बसला होता.....
काही वेळानी ती तरुण मुलगी आली त्याच्या जवळ बसली,हा साधारण गरीब साधा काहीतरी टेन्शन मध्ये भासत होता. तिनं सोबत आणलेल्या पिशवीतून प्लॅस्टिकचा डब्बा काढला ज्यात पोहे होते अन् एक चमचा होता,तिने तो डब्बा त्याला दिला अन् तो चमचा बाजूला ठेऊन,हातानेच एखाद्या खुप भुक लागलेल्या मुलासारखे त्या डब्यावर तुटून पडला.....
ती फक्त त्याला बघत राहिली तिच्या चेहऱ्यावर समाधान झाल्याचे भाव दिसत होते.ती या कॉलेजची वाटत नव्हती कारण ती आली तेव्हा साधारण सिंपल नाईट ड्रेस अन पारोशी आलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते सुख बघण्यात जो आनंद होता तो शब्दात व्यक्त नाही करू शकत......
त्याने डब्बा संपवला अन् तो तिच्याशी साधारण पाच मिनिट काहीतरी गप्पा मारत बसला.तिच्या राहणीमाना वरून ती सुशिक्षित घरण्यातली वाटत होती, मग बोलणं झाल्यावर त्याने तिला सेल्फी फोटोसाठी विचारल तिने होकार दिला.दोघांनी सेल्फी घेतला मी बघत होतो यात ती मात्र खुश होती,मग अखेर याने तिचा निरोप घेतला,तिने डबा बॅग मध्ये ठेऊन त्याला बाय केला......
तो पुढे म्हणजे माझा दिशेने फार पुढे निघून गेला, पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त त्रास,काही तरी चुकल्याचे भाव दिसत होते.मागून तिने आवाजही दिला पण याने तिला हवा तसा रिप्लाय ही दिला नाही.ती मात्र याला नजेसमोरून जास्तोवर बघत राहिली,नंतर तो पण कुठे गेला समजले नाही.....
मग ती पण काही वेळ तिथे थांबून तेथून निघून गेली,आता मात्र तिचा चेहरा खुप काही गमावल्यारखा भासू लागला होता.ती कॅन्टीन जवळ आली काही वेळ तिथे थांबली,माझा मनात ही विचार येऊन गेला तिला विचारपूस करावी.....
पण विषय नव्हता अन् काय विचारणार हा प्रश्न होता,तिलाही हीच अपेक्षा होती की काय असे काही क्षण मला वाटले.कारण तिने मला त्यांच्याकडे बघताना खुप वेळा बघितले,पण तिने तो जोवर होता ते लक्षात येऊ दिले नाही,नंतर काही वेळ थांबून माझ्याकडे बघत ती कॉलेज बाहेर पडली......
पण जाताना मात्र तिची नजर पुन्हा त्याला शोधत होती,जो नंतर मलाही भेटला नाही.नंतर रोज त्याच वेळेला दोन दिवस या दोघांची वाट मी बघितली पण ते दोघंही मला नाही भेटले अनेक प्रश्न तसेच राहून गेले कायमचे......
#संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट.....
लेखन: भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा