काय तो रोग आलाया म्हणे करुणा...कोरोणा म्हण ओ हौशे...
आपल्याला कसला हुतो आहे बाई रोग अन् राग....
आपल्याकडे बघून आपल्याला होणार बी नाय त्यो....आपल्याच पोटाची खळगी भराया काम नाय इथं कुठं सफरचंद आणायला पैसा घालू रोग बोलून लक्षे....
बोलणं ऐकून मी थांबलो,तालुक्याच्या गावाला माझं राहणीमान माझ्या डोळ्यासमोरून गेलं.इथे हे काय चालू आहे हा प्रश्न पडला....
चालत चालत शिवनामायच्या किनारी येऊन थांबलो,गावात पाऊस येवो म्हणुन जसं महादेवाच्य मंदिरात पाणी भरून,मंदिर बंद करून ठेवता तसे कडी कुलूप लावून सर्व मंदिर बंद करून,देवाला राखण एक पोलिस ठेवला होता....
चालत चालत नदी पुलावर गेलो,माझ्या वयातल्या दोन-तीन तरण्या नवीन लग्न झालेल्या सूना धूने धोपटीत माहेरच्या गोष्टी करत होत्या...
मी थांबलो अन् त्यांच्या जवळ जाऊन गप्पा ऐकत बसलो,"काय वो दिर साहेब कुठं फीरायले इकडं ?"वहिनीचा आवाज कानी आला,कुणी येतंय का काय भेटायला माझ्या दिराला असं बोलून त्या हसायला लागल्या...
नाय वो वहिनी बघायलो,गावचे हाल-हवाल आमच्या सारख्या शहरी माणसाला कोण यतंया भेटायला इथं,मग भटकायलो एकटा एकटा... बरं हायसा जास्त फिरु नका दुपारच्याला घरला या जेवायला वहिनी बोलती झाली....
अन् मी निघालो माझ्या आवडत्या जागेकडे जायला,रस्त्यानं सर्व हिरवेगार झाडे झुडपे दिसत होती.नदीच्या काठावर असलेले बेसरमं बेसुमार वाढली आहे,शिवनामायीचे संथ वाहणारे पाणी काळजाचा ठाव घेत होते...
हिरवीगार वनराई संपली अन् बोडक्या झाडांची वाट सुरू झाली,लाल मती हवेत उडून डोळ्यांना स्पर्श करायची अन् डोळे चुर चुर करत मी चालत होतो.दूरवर असलेलं धरण मला खुणावू लागलं, बोलावू लागलं खुप दिवस झाले त्या धरण पाळेवर विसावा घेतला नव्हता....
पाऊले त्याच दिशेने चालत होती अन् नकळत आज अनपेक्षित त्या बकऱ्या चारणाऱ्या रामा बाबांचे दर्शन झाले.त्याच्या त्या चार-पाच बकऱ्या अन् तो फिरत होते कोरड्या झालेल्या धरणात हिरव गवत बकर्या चरत होत्या.तो अधून मधून शिळ घालत त्यांना आवाज देत त्यांच्या रेडूवर चालणाऱ्या गाण्याशी ठेका धरत होता....
आता मी धरण पाळेवर येऊन बसलो अन् रामा बाबा जवळ जवळ येत होते.तसं धरणात अजून दोन वर्ष पुरल इतकं पाणी आहे,पण माणसंच जगली नाहीतर या पाण्याचा असून काय फायदा ? एक प्रश्न पडून गेला या पाण्यात जर तो विषाणू आला अन् पाण्यामार्फत साऱ्या शहरा,गावात तो पसरला मग काय होईल ?
तितक्यात रामा बाबांनी आवाज दिला काय सरकार आज कुठं वाट चुकला....मी माझ्यातल्या शास्त्रज्ञाला सावरत बोलो,काय नाय आलो तुम्हाला भेटायला. तुम्हाला नाय का एकवीस दिवस सुट्टी रामा बाबा मी बोलो,रामा बाबा बोलता झाला....
अरे आम्हाला कसली सुट्टी,या बकऱ्या आहेत तोवर नाही सुट्टी.अशे किती रोग आले अन् गेले काय नाय झालं आम्हाला,हो रं बाबा सगळ खरं आहे तुझं पण तरी घरी थांबायचं बाबा...
नायरे जमत मी थांबलो तर माझ्या या विठू अन् माऊलीला कोण चारा देईल,त्यांची पोट नाही भरली तर माझं कसं पोट भरल.... हे ऐकताच मी अवाक झालो अन् खरच हे सर्व शक्य आहे का ? असे मनात येऊन गेलं...
तितक्यात रामा बाबा बोलला हे बघ लेका,जितकं माझ्या कडून होतं ते मी करतो,काल तालुक्याच्या गावाला गेलो तिकडून हा रुमाल आणला आहे....तोंडाला बांधून घेत असतो अन् उपरनं डोक्याला ऊन लागत नाय मग मला.
मी म्हणलो रामा बाबा तू हुशार आहे यार....तू इतकं तरी करतो,आमच्या शहरात लोकांना सुट्ट्या देऊन लोकं रस्त्यांन उघड्या तोंडानं हिंडायली.... रामा बाबा बोलता झाला शहरातली लोक बाबा ती,मोठी लोक त्यांना कसला होतो रोग अन् कसला काय अन् तो रेडूवर गाणे ऐकत पुढे निघून गेला....
मी ही विचार करत करत न्याहाळत बसलो त्या विस्तीर्ण धरणाला व त्या दोन माणसांना एक शहरी अन् एक माझा लाडका माझा गावातल्या माझ्या माणसाला....
Bharat Sonwane....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा