#सैर_पर्यटनाची....
औरंगाबाद ते चाळीसगाव महामार्गावरील कालिमठ फाट्यापासुन मध्ये 2 कि.मी.असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत कालिकामाता मंदिर आहे. कन्नड तालुक्यातील या निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक भव्य कलाकृती लाभलेलं कालीमातेचे मंदिर...
कन्नड शहरापासून अवघ्या 9 कि.मी.अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मुळचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला वास्तव्यास आले. तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी कालिमठ येथे जागा विकत घेऊन तेथे हे मंदिर उभं केलं.
कालिकामातेचे मंदिर हे आधुनिक स्थापत्य कलेचा,शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हे मंदिर बर्याच मोठ्या क्षेत्रात व्यापलेलं असून परिसरात आंब्याची अनेक झाडे आहेत. मंदिर बांधणीसाठी शास्त्राचा आधार घेऊन प्रामुख्याने 9 अंकाला महत्व दिले आहे. मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण झाले. प्रत्येक बांधकामाची रचना,बांधणी ही नऊच्या पटीत आहे,9 अंकाला जोडुन केलेली आहे. ओटा, कॉलमचे अंतर,प्रदक्षिणेचा मार्ग,गाभारा,सभामंडप आणि मंदिरावरील कळसांची संख्यादेखील नऊ आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कन्नड ते कालीमठ अंतरदेखील 9 कि.मी. आहे.
मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती देवीची प्रसन्नमुर्ती. मुर्तीच्या एका हातात रक्तपीस नावाच्या राक्षसाचे शीर, तर दुसऱ्या हातात तलवार आहे. देवीच्या पायाखाली निद्रिस्त शंकर आहेत. कालिकामातेची 6 फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे.मंदिराच्या पाठीमागे स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे.
(लेखन-कृष्णा केंडे-एबीपी माझा औरंगाबाद).
देशभरातून कालीकामातेच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सतत या ठिकाणी असते.मंदिरात रोज नित्यनेमानं सकाळी अभिषेक ,पुजा,आरती करण्यात येते,संध्याकाळी महाआरती होते. या मंदिरात गुरूपोर्णिमा, महाशिवरात्री,नवरात्रात,दसरा सणाला मोठा उत्सव असतो.
मंदिराची किर्ती दिवसेंदिवस वाढत असून, इथं भाविकांची गर्दीही वाढली आहे. देशभरातून इथं भाविक येतात आणि कालिकामाते चरणी लीन होतात...
या तीर्थ क्षेत्रावर येताना कन्नड तालुक्यातील अनेक बघण्यासारखे स्थळ आपल्याला बघायला भेटतात.यातील कन्नडपासुन चाळीसगाव रोडने पुढे आले की अंधानेर फाट्यापासुन आत अंधानेरकडे गेल्यावर,अती प्राचीन महादेवाचे संगमेश्वर मंदिर व भामासाद महाराच यांची समाधी,आश्रम आपण बघु शकतो.
यापुढे आपण कन्नड चाळीसगाव मार्गावर उभारलेला भव्य अंबाडी प्रकल्प आपण बघु शकतो.या ठिकाणी आपल्याला सरकारी नर्सरी बघायला मिळते,येथे अनेक वनस्पती,औषधी वनस्पती बघायला भेटतात वनस्पती शास्त्रा विषयीची बरीचशी माहिती,वनस्पती लागवड याबद्दलचे ज्ञान आपल्याला या ठिकाणी भेटु शकते...
कालीमठ फाट्यावरुन आपण पुढे येऊन कालिकामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो की,आपल्याला याच मार्गावर पुढे 8 कि.मी. अंतरावर जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी बघायला भेटते...
वरील माहिती दिलेली स्थळं ही सर्व आपण एका दिवसात पाहु शकतो,यामुळे वेळेचे योग्य नियोजन केल्यास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कन्नड वास्तवातील अनेक ठीकाणांना आपण बघु शकतो....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा