कसं असते नाही का वयाची साठी ओलांडून गेली की,आयुष्यात कायमचा येऊन जाणारा हळुवारपणा हा आपल्याला भूतकाळातील आठवणींना सोबत करत जगायचा काळ असतो.
नेमकं हे तारुण्यात आपल्याला उलगडत असते,म्हातारपणाची जाणीव होत असते,थकलेले शरीर व आठवणीतले विचार घेऊन जगणारे म्हातारपण हे खूप सुंदर एका वलयात राहून हे सर्व अनुभवणे हे खूपच अलवार अशी असलेली ही प्रोसेस आहे.
याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली,तो क्षण....
पेपर बाबा पेपर...
पेपरवाल्याने दोन-तीन वेळा आवाज देऊन तो पेपर त्याने त्या गॅलरीमध्ये फेकून दिला,आणि तो पेपरवाला पुढे चालता झाला.हे सर्व दृश्य ते आजोबा किचनमध्ये जाळीचे तावदान असलेल्या खिडकीतून बघत होते...
गॅसवर तुळशीचे पान,आणि गवतीचहाची पाने घातलेला चहा ठेवलेला,सर्व किचनमध्ये त्याचा सुगंध पसरलेला होता.चहा उकळण्याचा आवाज कानावर पडतोय पण किचन ट्रॉलीमध्ये डब्ब्यात ठेवलेले बिस्कीट काही भेटत नव्हते,अखेर बरीच शोधाशोध आणि डब्बे उघडून बघितल्यावर एका डब्ब्यात बिस्कीट सापडले अन् जरासा उशीर झाला असता तर चहा उतू गेला असता हे ही कळाले.गॅस कमी करत चहा हलवून कपात ओतली आणि सुटकेचा श्वास त्यांनी सोडला,हो सोडलाच हल्ली अलीकडे काही दिवसांत खूप सहज दम लागून जातो त्यांना...
काहीवेळ तसेच बसून राहिल्यावर कपबशीमध्ये ओतलेला चहा थरथरत्या हाताने हॉलमध्ये घेऊन ते आले आणि चहाचा फक्कड स्वाद घेत बसले,चहामुळे आलेले हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते.हॉलमध्ये असलेला मनीप्लॅन खूप वाढला आहे अन् रात्री त्यामुळे मच्छर चावतात त्यामुळे त्याची कटाई करून घ्यावी लागणार आहे,हा ही विचार त्यांच्या मनात येऊन गेला...
हे त्यांच्या हावभावावरून स्पष्ट झाले होते...
बिस्कीट आणि फक्कड चहा घेऊन शरीरात जरा तरतरी आल्यासारखे वाटले म्हणून,मग ते आजोबा गॅलरीत पडलेला पेपर आणायला गेले.रात्रीच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात मस्त उगवत्या सूर्याच्या सोबतीला गर्मी निर्माण झालेली आहे गॅलरीत बरेच पाने,सदाफुलीचे फुलं पडलेली आहेत आणि लाईटच्या उजेडामुळे रात्री माश्यांना आलेले पंख अन् त्यांचा बराच सडा पडलेला होता अलीकडे कंबर साथ देत नाही पण झाडून घेणे हे त्यांचे नित्याचेच होते...
आज जरा आजोबा खुशच होते कारण की,पेपरमध्ये त्यांनी लिहलेला लेख छापून आलेला होता अन् ही शुभवार्ता मला काल रात्रीच संपादक साहेबांनी दिलेली होती,त्यामुळे सकाळी मी पण वाटच बघत होतो पेपरची... आजोबा पेपर हॉलमध्ये घेऊन आले आणि पहिले त्याला नीटनेटके स्टेपलर करून घेतले ही त्यांची नित्याची सवय आहे,त्यांना पेपर वाचतानी अस्तव्यस्त झालेला कधीच आवडलेला नाही...
त्यामुळे तो स्टेपलर करणे,नीटनेटका घडी घालून ठेवणे हे ते नियमित करत आले जेव्हा पेपरची रद्दी विकायची असते तेव्हाही ती रद्दी ते व्यवस्थित बांधून देत असतात. कारण पेपर खूप काही शिकवत असतो त्यांच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना,हळुवार जगण्याचा तो एक आधारच असतो त्यांच्यासाठी...
पहिले पेपरमध्ये छापून आलेला त्यांचा लेख बघितला आणि आनंद झाला हे माझ्यासाठी नवे नव्हते पण फार जूनेही नव्हते,आजोबासारख्या म्हाताऱ्याचे लेखन आज कित्येक तरुण वाचून आनंदी होणार हे खूप काही देणारे होते माझ्यासाठी.कारण ते नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी असते...
प्रत्येक पेज वाचून झाले सोबत आलेली आवडती पुरवणी अन् त्यातील काही ठराविक लेख यांची कात्रणे काढून वहीत चीपकवून ठेवली,आणि पेपर घडी करून ठेऊन दिला आज मी खुश होतो....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा