प्रिय,
पत्रास कारण की,
काल-परवापासून शिवना नदीच्या पुला खालून पाणी वाहते झाले आहे अन् नेमकाच आषाढ लागलेला आहे...
अंगणातले झाडे आता बहरलीये आणि त्यामुळे मंदिरात फारसा पालापाचोळा होत नाहीये,मंदिराचा परिसर स्वच्छ राहत आहे.कधीतरी सोसाट्याचा वारा आला की,मग चिंता सतावते कारण काही झाडांची उंची फार वाढलेली आहे तसेच पाने,फुले,फळे पडून खराब होऊन जातात...
मी या मताचा आहे की झाडांची फुले,फळे हे पूर्णपणे तयार होण्यापर्यंत झाडावरच असावी हल्ली ते शक्य होत नाहीये...
मलाही दुःख होतेच पण काय करणार अग्नी,जल,आणि वारा यांच्याशी वैर करून आपले काहीही साध्य होत नाही याची मला जाणीव आहे.त्यामुळे मी त्यात फारसा पडत नाही...
हो मात्र नित्य नियमाने ठरवून दिलेल्या वेळीत सकाळ मंदिर आवारातील सर्वच मी सेवाभावे झाडून,पुसून घेत असतो.आता तब्येत साथ देत नाही पण,माझा श्वास आहे तोवर हे मला चुकणार नाहीये....
काल राच्याला एकदमच सोसाट्याच्या वार्यासह पाऊस बरसू लागला,ओसरीत झोपलेलो मी खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी जागा झालो...
उठताच पोटात कळ येऊन गेली,माहीत नाही पण हल्ली पोटपाठ यांचे खोबऱ्याच्या खावटा प्रमाणे झाले आहे,पोटपाठ एकत्र झाले आहे.पोटाचे वरचे कातडे खालच्या कातड्याला चीपकुन जाते हल्ली तब्येत साथ देत नाही,पण सेवेत खंड नको म्हणून सर्व सहन करून घेत असतो...
सांगायचेच बघ कालच ओसरीच्या परिसरात मन रमावे म्हणून मी तीन तुळशीचे रोपे,नऊ मोगर्याचे अन् काही सुटे कलम लावले आहेत...
आनंदाची वार्ता म्हणू की काय पण कालच माझं दुपारी एक पुस्तक वाचून पूर्ण झाले,अन् आज श्लोकने मला दुसरे पुस्तक भेट दिले दुपारपासून त्याचे वाचन सुर्वात करणार आहे...
हल्ली पाऊस पडत असला की पुस्तक वाचन करताना खूप छान वाटते,जुन्या देवांच्या मुर्त्या ठेवलेल्या लाकडी घरात येऊन मी मोडकळीस आलेल्या पालखीत मऊ गादीवर बसून वाचत असतो...
हे स्वर्ग सुख मंदिरात अनुभवायला भेटत आहे,हे कमी नाहीच एक खंत मात्र भासते की आषाढी एकादशीच्या वारीला माझ्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन यावेळी झाले नाही,पण असो जगलो तर जाऊत पुढच्या वेळेस....
माय माऊलीचे आशीर्वाद कायम आहेच सोबत....
नुकतच दगडांच्या चुलीवर भगर करायला टाकली आहे,शाबुदाना आता मला सहन होत नाही शेंगदाणे चावत नाही मग उपवासाला भगर करत असतो.मग माझं धोतर,पटका,अन् पाणी प्यायची शिशी धुवून घेतली सर्व आवरून मग हे पत्र तुला लिहायला घेतले आहे...
अजून एक सांगायचे राहिलेच बघ,यावर्षी नदीला पाणी फार असल्यामुळे आणि वाट सटकती झाल्यामुळे माझे शिवना मायच्या पुलावर येऊन तिला १०८ बेल वाहणे होणार नाही...यावर्षी शिवना मायला क्षमस्व माफी मागतो,शिवना माय तुझं वाहने असेच निरंतर असू दे,माझे उरे दिवस पुरे आहे आता...
बस माझे चित्त आता या ओसरीत आणि मंदिरात लागले आहे,पुस्तकांच्या सहवासात हा शेवट होतो हे नव्हे थोडके....
तुझाच लेकरू...
श्री:.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा