#पाऊस_छत्री_आणि_मी...
वादळ,वारा,पाऊस सगळं मनासारखे चालु आहे तरीही काहीतरी मागे राहून गेलं आहे.गवतावरचे पाण्याचे दव जसं आपले प्रतिबिंब त्याच्या आत दाखवू शकत नाही,तसेच मागे काय राहून गेले हे माहीत असूनही सांगता येत नाहीये इतकं अस्वस्थ झालंय सर्वच...
रस्त्याच्या बाजूला असलेली छोटी-छोटी झाडं जगण्यासाठी स्पर्धा करताय.एखादा नाकतोडा येतो अन् भर्रकन उडत जाऊन दोन-तीन झाडांची पानं त्याच्या उडण्याने तोडून टाकतो अन् स्वस्थ बसून राहतो त्या वाटसरू बसलेल्या पुलावर येऊन,त्याला दिसते का काय माहित नाही पण त्याला खूप काही समजते...
दुसरीकडे एक तो जो शेणाचे गोल,गोल गोळे करून त्यांना लोटत-लोटत घेऊन चालला आहे...
कुठे जातो माहित नाही पण त्याला बघायला खूप आवडते,जगातला सर्वाधिक प्रामाणिक जीव कोणता असेल तर तो हाच असे मला वाटते.कारण त्याच्या आसपास दूरदूर त्याच्या जातीतले कुणीच नसते तर एकटाच तो हे सर्व करत असतो...
बाजूला पावसाच्या पाण्याने ओढ्यातून एक चप्पल वाहून आली आहे आर्धी तुटलेली,पण वाहून आल्याने ती मस्त स्वच्छ झालीये.तिला घालून जरासा चौफेर फटकारा मारून आलो तिथेच आजूबाजूला,मऊ मऊ चप्पल एका पायाला भारी दिसत होती...
रुईच्या झाडाला छान निळसर पांढरे फूल आलेली आहे,त्यातील परागकण शोशून घेण्यासाठी निळसर काळा रंग असलेली गांधीली त्या फुलावर येऊन हेलिकॉप्टर सारखं बुंग-बूंग करत बसलीये...
हे सर्व कॅमेरात कैद करायला मला आवडत नाही,कारण त्यांचा तो आनंद मला फक्त एकट्याला अनुभवायचा असतो.त्या आनंदाला पार्टनर असला की मग विविध चर्चा निघत राहतात.परत नैसर्गिक ते नैसर्गिक न राहता डिजिटल होऊन जाईल मग बरेच त्या मोबाईलशिवाय मुक्त सैर करणे या मोकळ्या मैदानात....
चला सर्व छान चालू झाले आहे,सर्व ठिकाणी कामाची गरबड चालूय.पण मला नकोय हे सर्व थोड लेट पण थेट करायचं,म्हणून मी अजून तरी थोडा आनंद घेणार आहे...
हे किती छान आहेना निसर्ग त्याची मुक्त उधळण करतोय,अंगावर हिरवी शाल पांघरून असंख्य रूप तो दाखवतोय पण आपल्याला हे सर्व अनुभवायला वेळ नाहीये याची खंत वाटते...
शेवाळलेल्या काळ्या खडकावर पिवळसर बारीक-बारीक कसली छोटीशी ब्लँकेट वर असलेल्या मऊ सुतासारखी झालर पसरली आहे.
निळसर बारीक-बारीक फुले अगदी त्या खडकाला खेटून उगलेलिये,मला त्या खडकावर बसायचंय पण ती झालर अस्तव्यस्त होईल म्हणून उभ्यानेच मी ते बघणार आहे....
खूप दिवसांपूर्वी टेकडीवरच्या एका बोडक्या झाडाला दोरा बांधून आलो होतो,त्याची वाढ होते की नाही ते बघायचं होते.आज बघितले तर ते छानपैकी दोन ते तीन फुटपर्यंत वाढलेले आहे,तो दोर शेवटी तुटून तिथेच खाली पडून राहिला...आता या झाडावर मुंग्यांनी आक्रमण केलंय याचा फोटो मी तुम्हाला देईल पुढच्या वेळी गेलो की,कारण हा प्रयोग पाच सहा महिन्यांपासून चालू होता शेवटी वाढ होत आहे म्हणून आनंद आनंद आहे....
शेजारी असलेले डोंगर खुणावतेय पण सध्या काही दिवस नकोच.आजू बाजूचा परिसर,जवळची टेकडी यांच्यावर भ्रमंती होणार आहे काही दिवस...
खदानित हिरवट पाणी दिसतंय खदानीच्या उंच उंच काळ्या खडकांच्या भिंतीत असलेले लिंबाचे,पिंपळाचे झाडं छानपैकी वाढीस लागले आहे.लवकर हे सर्व पाणी काळेशार झाले की आत डोळे टाकून बघत बसायचं मस्त भारीच जग असते ते.. शेवाळ,खेकडे,पाणकोंबडी,मासे,बेडूक, विविध पाण्यातील वनस्पती यांचे होणारे दर्शन हे विलोभनीय असणार सर्वच.....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा