मुख्य सामग्रीवर वगळा

धोंड्याईचा गाव..!

धोंड्याईचा गाव..!


सुर्य सांजेकडे कलायला लागला तसं रानातल्या लोकांनी घराच्या वाटा धरल्या,जसजसा सुर्य अस्ताला जातो आहे तसतसा पायांचा वेग वाढत आहे.घराची लागलेली ओढ अन् घरी गेल्यावर कधी एकदा कोरा काळा चहा पिऊन पाठ घंटाभर ओसरीला लांब करू असे धोंड्याईला वाटत होतं...

उतरत्या वयात वावरातले बैठे काम आता तिला सहन होत नव्हते पण आले दिवस कसेतरी ढकलायचे अन् चालू शरीराला घास कुटका खाऊन तगते जगते ठेवायचं.
इतकचं काय धोंडाईच्या रोजच्या जगण्यातील दिनक्रम होता...

धोंडाईने रानाचा रस्ता मागं टाकला अन् गावच्या वाटाला धोंडाई लागली,डोक्यावर रस्त्यानं चालता-चालता जमा केलेल्या काटक्यांच पेंडक घेऊन धोंडाई त्याला सावरत चालली होती.
इतक्यात धोंडाईला समिणाबी आपा,अंजुम खाला अन् शांता आक्का भेटली,धोंडाईने सरपनाला सावरत शांत आक्काला पुसले...

अय शांते कुठशिक गेली होती ओ माय कामाला..?
शांता आक्का बोलायला लागली : अगं व माय ते लक्ष्मी आयच्या देऊळा खाल्ल्या रांनची झुंब्रा माळीन हायना तिच्या वावराले गेली होती...
धोंडाई:काय काम करायला गेली होती ओ माय..?
समिणाबी आपा: अरे ओ बुड्डी ओ कपास चुंनने को गयेल थे...
धोंडाई: बरं बरं माय लेकी अंजुम तू  इन्के सोबत गेलती का..?
अंजुम खाला - हां जी बुड्डी घरपे भी क्या करे..?
सलम्या का बुढ्ढा काम को नाहीं जाता,तो खानेको कोण देगा..?
तो करती हू थोडा बहुत...

इतक्यात शांता आक्का बोलायला लागली: मायवं चल जातू गं मलाबी मुसनमान मोहल्यात जायचं हायसा शब्बीर मामु च्या घरला कापुस यचला त्याचं पैकं आणाया...

धोंडाई मारुतीच्या देवळापासून एकटी वाटेनं घराकडे निघाली.
दिवसभर गावात शुकशुकाट असतो पण सांजेच्या वेळेला मात्र गावात जीव लागतो,रस्त्यानं कोणी गाडीवर दुधाची क्यान घेऊन घरला जात होते तर कुणी गाडीबैलात जात होते.
धोंडाई बिच्चारी चालली होती एक एक पाऊल टाकत,दिवस कलला होता अंधारून आलं होतं.

पाटलाचा शिवाज्या मारुतीच्या देवळात दिवा घेऊन चालला होता,सावता माळ्याच्या मंदिरात पाच-सहा धोंडाईच्या पिढीतले म्हातारे हरिपाठ म्हणत बसले होते,त्यातल्या आसऱ्या बाबांनी धोंडाईला आवाज दिला...
अय धोंडाई आज एकटीच का,लेवुक कुठशिक गेला अन् पार बोडक्या बाभळीगत झाली हायसा ते लाकडाचं पेंडक कश्याला घेऊन यु राहिली..

धोंडाई एक नाय का दोन नाय मुकाट्यानं मान हालत तिच्या घराच्या गल्लीने निघुन गेली....

धोंड्याई जात होती तिच्या मार्गाला मी बसलो होतो देवळा महुरच्या पारावर    गावचा येता-जाता माणूस मला ईचारत हुता...
काय छोटे सरकार कौशिक आलासा शहरावरून..?
मी एकच उत्तर देत होतो काल संच्याला.

शिवणामाय भर उन्हाळ्यात ही अजून तुडंब भरुन वाहत होती,यावर्षी पावसाची कृपा म्हणुन गाव खुश होता.माझ्या मनात शहरातले असंख्य प्रश्न होती त्यांना या नदी पात्रात नजर लावून उत्तर शोधत होतो,पूर्वी असलेले शहराचं आकर्षण आता कमी होवू लागलं होतं.पण कुठलाही विलाज नव्हता कारण माझा गाव मला कधीच परका झाला होता,मी बसलो होतो शिवणामायच्या पात्रात डोळे लावून बघत कधीचाच...

धोंड्याई घरला पोहचली अन् डोक्यावरचं पेंडके अंगणात टाकून कटूर्यात पाणी घेऊन अंगणातल्या दगडावर हातपाय धुवत,घासत बसली.हातपाय धुवून देवाला दिवाबत्ती करून धोंड्याईन चूल पेटवली,धगधगता चुलीच्या निखाऱ्याने धोंड्याईला जरा बरं वाटलं...

चुल्हीवर कोरा चहा उकळत होता,साऱ्या घरात त्या कोऱ्या चहाचा सुगंध दरवळत होता...
धोंड्याईन सांडशित पातीले पकडुन ढवळ्या कपात चहा गाळून घेतला,चुल्हीच्या उजेडात एक हाताने बशी सावरत अन् एका हाताने नाकातली लांब झुबक्याची नथ सावरत धोंड्याई चहा पित होती...
चहा पिऊन झाली अन् धोंड्याईने भाकरी थापायला परातीत पीठ घेतलं भाकरी थापायचा आवाज माझ्या बसल्या पारा पहूर येत होता अन् मी त्यात गुंग होवून माझ्या शिवणामायला न्याहाळत बसलो होतो....

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...