मुख्य सामग्रीवर वगळा

धोंड्याईचा गाव - भाग २


धोंड्याईचा गाव - भाग २

      धोंड्याई एका हातानं कोऱ्या चहाचा कप सावरत दुसऱ्या हाताने लांब झुबक्याची नथ सावरत चहा पित होती,चुलीचा धुर सर्व घरात मावत नव्हता,खिडकीच्या तावदानातून बाहेर पडणार धूर मला मी बसलेल्या पारावरून दिसु लागला होता...

आतापर्यंत सांजचा देऊळातला हरिपाठ झाला अन् मंदिरातील माझ्या आज्याच्या वयातील म्हातारी लोकं आपापल्या घराला जाण्या वाटेला लागली होती.गावाला गावपण या शेवटच्या घटका मोजणाऱ्या वडीलबाप  माणसांमुळेच होतं,जाता जाता दगडु आज्यानं मला हटकलं अन् प्रश्न केला,काय लका कधी आलासा शहरावरून...? 
अन् त्याच्या सोबतच्या आज्याला माझी ओळख करून देऊ लागला...

शामराव हा रामा आणाचा मधल्या लेकाचा धाकटा लेक हायसा,कालिजाला जिल्ह्याच्या शहराला अस्तूया,मी त्यांच्याकडे बघतच आदराने मान झुकवत नमस्कार केला अन् तब्येतीची विचारपूस केली,हाल हावाल विचारपू्स झाली अन् दगडु आज्याने मला येतू लका म्हणत काढता पाय घेतला...
एरवी मी नदीच्या किनाऱ्यावर बसून कधीचाच न्याहाळत असलेल्या पाण्याला अन् अलवार शांत वाहणाऱ्या पाण्याला नजरेत सामावून घेत होतो...

चेहऱ्यावर खोटे भाव आणून जगणं मला कधी रुचणार नव्हतं,त्यामुळं माझी झालेली अवस्था खूप वाईट होती पण कुणाला काय सांगणार.गावचा लेक शहराला राहतूया म्हंटल्यावर गावच्या वडील लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा असणारच ना...

पण सध्याचा चालू असलेला काळ अन् माझ्या मनाची होणारी कोलाहाल मी तरी कुणाला सांगणार होतो,म्हणुन येऊन बसलो होतो या शिवना मायच्या तीरावर तीच एक सोबती अन् तीच सध्या माझी मैत्रीण होती जी मला समजुन घेईल....

धोंड्याई भाकरी करायला लागली होती,भाकरी थापण्याचा आवाज माझ्या कानावर आला तसा मी धोंड्याईच्या घर कम झोपडीकडे निघालो दाराच्या उंबरठ्यावर राहुन आईला आवाज दिला...
अय आजे काय करायली..?
झाली का भाकरी,कोड्यास..?
तितक्यात धोंड्याई दचकून डोक्यावर असलेला पदर सावरत मला म्हणाली कुण बा..? 
माझ्या नातवा सारखा तू पण मी काय वळखीलं नाय बा तुला...
मी म्हंटले:अगं आजे मी झुंबर्या माळणीचा नातू हायसा सूनि आक्‍काचा धाकटा लेवूक...

तितक्यात धोंड्याई बोलली: अरे माझ्या कर्मा माझी नजर अशी हाय बाबा दळभदरी गावच्या लोकासणी ओळखिना.मग कसा हायसा बाळा तू अन् पराच्या दिसाला तुझी माय भेटली होतीसा मला बाजारात,ती बी बोली की धाकटा लेक आला हायसा शहरावरून ...
मी बोलता झालो: हाव गं माय आईनं सांगले मला की,धोंड्याई भेटली हूती म्हणून तुझी तब्येत चांगली नस्तिया आता म्हणून भेटून यायला सांगितलं मायना...
मग आलूया तुला भेटाया...

बरं झालं लका आलासा..! 
आला हायसां तर पिठलं भाकर खावून जा तुझ्या गरीब आजीच्या घरचा...
नगं नगं...आजी मायनं घरला माझी भाकर केली असल उगाच शिळी होईल तुझी विचारपूस झाली यातच माझं पोट भरलं...
धोंड्याई भाकर खात माझ्या संगत गप्पा मारत बसली होती माझ्या रुपात तिला तिचा नातू गवसला होता...

तिला तिच्या नाताची आठवण आली अन् तिच्या डोळा पाणी आले मी बघून न बघितल्या सारखं केलं अन् आईला म्हंटल आई काळजी घे स्वतःची येतुया आता खूप वख्त झाला हायसा पुन्हा झुंबऱ्या माळीन माझ्या नावानं बोंबाटा करल साऱ्या गावात...

धोंड्याई बोलती झाली,बाळा माझा नातू पण तुझ्या इतकाच असतारं पण लहानपणी खंडेरायाच्या गावच्या जत्रंला हारला,तसा गवसला नाय खूप धुंडला पण नाय गाव्हला...
बिच्चारा कुठं असल अन् काय खात असल खंडेरायालाच माहीत अन् आजीने पदराने डोळे पुसत एका ताटलीत पिठलं दिलं अन् बोलती झाली 
झुंबऱ्या माळनीला माझ्या हाताच पिठलं लई आवडत तु बी खा अन् तुझ्या आजीला पण दी अन् सावकाश जारं बाळा...

मी पण तिला येतूया काळजी घे म्हंटले अन् पुढच्या वख्ताला शहरावरून आलो की भेटायला येईल म्हणून निघालो...
मी किती दूरवर जास्तोवर धोंड्याई मला बघत राहिली,दाराच्या उंबठ्यावर बसून अन् डोक्यावरचा पदर सावरत डोळ्यातील नातवाच्या येणाऱ्या आठवणीतले आसवे सावरत,पदरानं पुसत....
Written by,
©®Bharat sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...